October 2026 Monthly Horoscope : काही दिवसांनी ऑक्टोबर महिना सुरु होईल. या महिन्यात अनेक महत्त्वाचे सण आणि ग्रहांच्या राशीपरिवर्तनामुळे खास ठरणार आहे. नवरात्री, दसरा यांसारख्या महत्त्वाच्या सणांसोबतच या महिन्यात ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीतही बदल होणार आहेत. याचा परिणाम १२ राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येऊ शकतो. काही राशींना नोकरी-व्यवसायात संधी मिळतील, तर काहींना आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत सावध राहावे लागू शकते. चला, जाणून घेऊया ऑक्टोबर महिना तुमच्या राशीसाठी कसा असेल याबद्दल सोनल चितळेंकडून जाणून घेऊ…

मेष

पितृ पंधरवड्यात सामाजिक कार्यातून मानसिक समाधान मिळेल. १२ ऑक्टोबरला होणारी घटस्थापना आर्थिक लाभ देईल; तर दसरा आनंदासोबत प्रगतीचा मार्ग दाखवेल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. अनेक प्रलोभनांमुळे आपले अभ्यासवरील लक्ष विचलित होईल. नोकरीच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करून दाखविण्याची गरज भासेल. विवाह जुळण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी ठरतील. विवाहितांना उत्तम दाम्पत्यसुख मिळेल. जमिनीचे व्यवहार सावधगिरीने करा. नातेवाइकांचा रोष पत्करावा लागेल. आपली बाजू ठामपणे मांडाल. कुटुंबासह प्रवास करण्याचा आनंददायी योग येईल. व्यायाम, आहार व विश्रांती या त्रिसूत्रीचा सातत्याने अवलंब केल्यास आरोग्य उत्तम राहील. ३१ ऑक्टोबरला गुरू सिंह राशीत प्रवेश करणार आहे.

वृषभ

या महिन्यातील पितृपक्षात महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ येईल. ११ ऑक्टोबरला घटस्थापनेच्या दिवशी कला, क्रीडा, न्याय क्षेत्रात मोठे नाव कमवाल. विद्यार्थ्यांना अभ्यास आणि परीक्षा यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. उत्तम मार्गदर्शनाचा लाभ मिळेल. नोकरी व्यवसायात जोखीम पत्करून आर्थिक समस्या सोडवाल. विवाहासंबंधीत चर्चा यशस्वी होतील. दसऱ्याच्या दिवशी भाग्याचे दरवाजे उघडतील. गुंतवणूकदारांना भरघोस लाभ संभवतो. गुरुची साथ चांगली मिळेल. प्रवासाची दगदग होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे ताण तणाव वाढेल. वेळेचे योग्य नियोजन करणे गरजेचे ठरेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका. वैद्यकीय सल्ला उपयोगी पडेल. ३१ ऑक्टोबरला गुरू चतुर्थातील सिंह राशीत प्रवेश करेल. गुरुबल कमजोर होईल.

मिथुन

पितृपक्षात धार्मिक कार्यांसह सामाजिक कार्यात सहभागी झाल्याचे अधिक समाधान वाटेल. घटस्थापना आपल्यातील कलागुणांना विशेष उत्तेजन देईल. तर कोजागिरी पौर्णिमा लाभदायक चांदणे पसरवेल. नवी आशा पल्लवीत होईल. विद्यार्थी वर्गासाठी नवी आव्हाने समोर येतील. मेहनत आणि हुशारी यांच्या बळावर यश मिळेल. नोकरी व्यवसायात काही निर्णय घेताना मनात गोंधळ निर्माण होईल. डोकं शांत ठेवणे महत्त्वाचे आहे. विवाहोत्सुक मंडळींचे प्रयत्न यशस्वी होतील. मनाजोगता जीवनसाथी मिळेल. विवाहित मंडळींनी एकमेकांच्या मताचा आदर करावा. आपल्या म्हणण्यानुसारच प्रत्येक वेळी गोष्टी घडतील असे नाही. गुंतवणूकदारांना उत्तम मार्गदर्शन मिळाल्याने भरघोस यश मिळेल. घराची समस्या चर्चेने आणि सामोपचाराने सुटेल. ३१ ऑक्टोबरला गुरू सिंह राशीत प्रवेश करेल.

कर्क

१० ऑक्टोबरपर्यंतचा पितृ पंधरवडा माणुसकीचे धडे शिकवणारा असेल. गरजवंतांना सढळ हाताने मदत कराल. विद्यार्थ्यांना प्रचंड मेहनतीने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मित्रमंडळ, प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे यांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची तयारी कराल. घटस्थापना नवे बळ देईल. दसऱ्याला व्यवसायातील नवे करार होतील. कामकाजाच्या निमित्ताने दूरचे प्रवास कराल. उपवर वधू-वरांचे विवाह जुळतील. सुयोग्य स्थळ मिळेल. कोजागिरी पौर्णिमेला आनंदाचे चांदणे पसरेल. संततीसाठी प्रयत्न केलेत, तर यश मिळेलच. जमिनीचे करार होतील. वाटाघाटी, चर्चा यांना भांडणाचे रूप देऊ नका. गुंतवणूक करताना फार मोठी जोखीम घेतलीत, तर व्यवहार डोईजड होईल. मनाविरुद्ध घटना घडल्यास जीवाला लावून घ्याल. त्यामुळे आरोग्य बिघडेल. ३१ ऑक्टोबरला गुरू आपल्या द्वितीयातील सिंह राशीत प्रवेश करेल.

सिंह

पितृपक्षात मोठे समाज कार्य कराल. उदार आणि दिलदार वृत्तीला साजेसा दानधर्म हातून घडेल. विद्यार्थी वर्गाने एकाग्रतेने अभ्यास करावा. घटस्थापना विशेष फळ देईल. तर दसरा बक्कळ आर्थिक लाभ देईल. नोकरीच्या निमित्ताने मोठा प्रवास कराल. वरिष्ठांच्या पाठबळामुळे करिअर मध्ये खूप चांगली प्रगती होईल. सध्या नोकरी बदलाचा विचार नको. घर, जमीन, प्रॉपर्टी याबाबतचे निर्णय घाई घाईने घेऊ नका. ज्येष्ठ मंडळी, अनुभवी व्यक्ती यांचा सल्ला उपयोगी पडेल. विवाहित दांपत्यांसाठी हा महिना एकमेकांना उत्तम वेळ देण्यासाठी उपयोगी पडेल. दोघांचे सूर जुळतील. सामाजिक आणि लोकोपयोगी कामात आपला सहभाग उल्लेखनीय असेल. सततच्या कंबरदुखीकडे दुर्लक्ष करू नका. व्यायाम आणि आहार विहार याकडे विशेष लक्ष द्यावे. ३१ ऑक्टोबरला गुरू सिंह राशीत प्रवेश करेल.

कन्या

पितृपक्षात व्यवहार, भावना, वैज्ञानिक दृष्टीकोन यांचे एकत्रित मिश्रण होईल. मनाला आनंद मिळेल, समाधान वाटेल असे कार्य कराल. विद्यार्थी वर्गाची आता खरी कसोटी आहे. घटस्थापना आणि दसरा विशेष लाभकारक असतील. नोकरी व्यवसायात व्यवहार सांभाळून गरजूंना मदत कराल. विवाहोत्सुक मुलामुलींचे विवाह ठरतील. बोलणी होतील. विवाहित दाम्पत्यांनी एकमेकांचा विश्वास संपादन करणे ही फार महत्वाची गोष्ट आहे. गुंतवणूकदारांनी थोडे सबुरीने घ्यावे. घाईघाईने घेतलेला निर्णय आपली आधीची मेहनत पार धुळीला मिळवेल. घराचा, जागेचा सौदा फायदेशीर होईल. 3१ ऑक्टोबरला गुरू सिंह राशीत प्रवेश करेल. गुरुबल कमजोर होईल. विचारांच्या गोंधळामुळे डोकं शिणेल. विश्रांतीची गरज भासेल.

तूळ

पितृपक्षात विशेष कार्यशील रहाल. रेंगाळलेली कामे मार्गस्थ कराल. विद्यार्थी वर्गाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळेल. नवे विषय आत्मसात कराल. नव्या संकल्पना नीट समजून घ्याल. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक पावले उचलाल. बढती मिळेल. विवाह जमेल. ओळखीतून नातेसंबंध जुळतील. विवाहित मंडळींनी कामकाज आणि व्यस्त दिनक्रमातून कुटुंबासाठी वेळ राखून ठेवावा लागेल. घटस्थापना, दसरा आणि कोजागिरी पौर्णिमा उत्साह वाढवतील. गुंतवणूक करताना विशेष सतर्कता बाळगावी. नजरचूक झाल्यास मोठा फटका बसू शकतो, सावधान! घराबाबतचे व्यवहार अंतिम निर्णयाप्रत जातील. अडचणींवर मात करत पुढे जावे लागणार आहे हे ध्यानात असू दयावे. नाकाचा घोळणा फुटणे, घसा खवखवणे असे त्रास उदभवतील. वायुप्रदूषणाचा प्रभाव जाणवेल.

वृश्चिक

पितृ पक्षात या राशीच्या लोकांमध्ये काहीशी अस्वस्थता वाढेल. समाजोपयोगी प्रकल्पात स्वतःला झोकून द्याल. विद्यार्थी वर्गाची मेहनत फळास येईल. सराव, सातत्य अंगवळणी पडले पाहिजे. नोकरी-व्यवसायात मोठी मजल माराल. घटस्थापना, दसरा यादरम्यान आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाची कामगिरी पार पाडू शकता. विवाहोत्सुकांना सुयोग्य जोडीदार मिळेल. विवाहित मंडळींच्या जबाबदाऱ्या वाढतील. नातेवाईक, मित्रपरिवार यांची मदत कराल. गुंतवणुकीतून झटपट पैसे मिळविण्याचे प्रयत्न अंगाशी येतील. जमीनजुमल्याबाबत लाभकारक निर्णय घेऊ शकता. न्यायालयीन कामे मार्गी लागतील. ३१ ऑक्टोबरला गुरू सिंह राशीत प्रवेश करेल. गुरूचा हा राशिबदल वृश्चिक राशीसाठी हितकारक असेल.

धनु

पितृपक्षात नवे कार्य हाती घ्याल. होतकरू मंडळींना मदतीचा हात द्याल. विद्यार्थी वर्गाची खरी कसोटी आहे. एकाग्रतेने केलेला अभ्यास कामी येईल. घटस्थापना लाभकारक ठरेल. दसऱ्याला धनलाभ होईल. नोकरी व्यवसायात मानाची जागा भूषवाल. खुर्चीचा आदर करून योग्य निर्णय घ्याल. सर्वांच्या हिताचा विचार कराल. विवाहित मंडळींना कुटुंबासाठी मोठा आणि महत्वाचा निर्णय घेता येईल. वाहन खरेदी कराल. आर्थिक उन्नती होईल. गुंतवणूकदारांच्या मेहनतीला उत्तम फळ मिळेल. सबुरी आणि सातत्य कामी येईल. जमिनीचे, वडिलोपार्जित इस्टेटीचे व्यवहार सांभाळून कराल. ३१ ऑक्टोबरला गुरू भाग्यातील सिंह राशीत प्रवेश करेल. सिंहस्थ गुरू असेल. गुरुबल चांगले मिळेल. प्रयत्नांना पुष्टी मिळेल. आरोग्य चांगले राहील.

मकर

पितृपक्षानिमित्त समाजसेवा, दानधर्म कराल. घटस्थापना आणि दसरा या दिवशी भाग्याचे दरवाजे उघडतील. विद्यार्थी वर्ग कसून मेहनत घेईल. जिद्द आणि चिकाटी वाखाणण्याजोगी असेल. नोकरी-व्यवसायात प्रगतिकारक घटना घडतील. सहकारी वर्गाची मदत मिळेल. परदेशासंबंधित कामे मार्गी लागतील. विवाहोत्सुक मंडळींचे विवाह जुळतील. चांगला जीवनसाथी मिळेल. विवाहितांचे आर्थिक आराखडे खरे ठरतील. भविष्याचे नियोजन उत्तम प्रकारे कराल. गुंतवणुकीचा भरघोस परतावा मिळेल. फसव्या योजनांपासून स्वतः तर दूर राहालच; पण इतरांनाही सावध कराल. जागेच्या व्यवहारात हळूहळू प्रगती होईल. ओळखीच्या व्यक्तींमार्फत काम पुढे जाईल. वायुप्रदूषण आणि सतत बदलत्या तापमानामुळे श्वसनाचे आजार बळावतील. ३१ ऑक्टोबरला गुरू अष्टमातील सिंह राशीत प्रवेश करेल.

कुंभ

पितृपक्षात गरजूंना मदतीचा हात पुढे कराल. सामाजिक बांधिलकी जपाल. विद्यार्थी वर्ग अनेक क्षेत्रात कार्यरत असतील. अभ्यासात देखील मन रमेल. परीक्षा, मुलाखती, प्रात्यक्षिके यात विशेष चमकाल. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची पावले उचलाल. घटस्थापना आणि दसरा विशेषतः लाभकारक असतील. हितशत्रूंचे डाव हाणून पाडाल. साडेसातीचा प्रभाव अगदी कमी असेल. गुरुचे चांगले पाठबळ मिळेल. गुंतवणूक लाभकारक ठरेल. अविचाराने कोणत्याही ठिकाणी आपण गुंतवणूक करणार नाहीत. विवाहोत्सुक मंडळींनी वधुवर संशोधन सुरू ठेवावे. कौटुंबिक गरजा भागवताना स्वतःकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. जमिनीच्या कागदपत्रात असलेल्या त्रुटी, कमतरता भरून काढण्यासाठी सरकारी कार्यालयात खेपा घालाल. रक्ताभिसरण संस्थेच्या कार्यात बिघाड झाल्याने पेटके येणे, हातापायाला मुंग्या येणे असे त्रास उदभवतील. ३१ ऑक्टोबरला गुरू सिंह राशीत प्रवेश करेल.

मीन

पितृपक्षात कामकाजासह सामाजिक कार्यातही सहभागी व्हाल. घटस्थापना आणि दसरा विशेष लाभकारक दिवस ठरतील. कोजागिरी पौर्णिमा धनसंपत्तीच्या राशी देईल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासावरील लक्ष विचलित होऊ न देता परीक्षेची तयारी करायला लागेल. नोकरी व्यवसायात प्रगतिकारक पावले उचलाल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्कर्ष होईल. जुने येणे वसूल होईल. विवाहोत्सुकांचे विवाह योग जुळतील. चांगल्या जीवनसाथीची निवड कराल. विवाहित दांपत्यांचे संतती प्राप्तीचे प्रयत्न सफल होतील. जमीन जुमल्याबाबत सध्या हालचाल नको. प्रश्न सुटणार नाहीत तर फक्त डोक्याचा ताप वाढेल. ३१ ऑक्टोबरला गुरू षष्ठातील सिंह राशीत प्रवेश करेल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.