People Born on These Dates Are Made for Each Other : आपल्या आजूबाजूला विविध स्वभावाचे लोक असतात. काही प्रेमळ, काही रागीट, तर काही संशयी, तर काही खूप चांगले, तर काही जळू वृत्तीचे असतात. त्यापैकी अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांची जन्मतारीख ४, १३ किंवा २२ आहे त्यांचा मूलांक ४ आणि जन्मतारीख ७, १६ किंवा २५ आहे, त्यांचा मूलांक ७ असतो. या लोकांचे वैवाहिक आणि प्रेम जीवन खूप कठीण असते, असे अनेकदा म्हंटले जाते. पण, आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की, अंकशास्त्रानुसार, मूलांक ४ आणि मूलांक ७ असलेले लोक एकमेकांसाठी चांगले जोडीदार ठरतात.

४ या मूलांकाचा स्वामी राहू आणि ७ या मूलांकाचा स्वामी केतू मानला जातो. पौराणिक कथेनुसार, राहू आणि केतू हे दोन वेगळे ग्रह नसून, स्वर्भानू नावाच्या एका राक्षसाचे दोन भाग आहेत. देवांनी त्याचे शरीर दोन तुकड्यांत विभागले. त्याचा डोके असलेला भाग ‘राहू’ आणि धड असलेला भाग ‘केतू’ म्हणून ओळखला जाऊ लागला. म्हणूनच जेव्हा मूलांक ४ आणि ७ असणारी मंडळी भेटतात. तेव्हा त्यांच्यात एक खास नाते निर्माण होते. हे लोक फक्त चांगले मित्रच नसतात; तर एकमेकांसाठी उत्तम आणि यशस्वी जोडीदार ठरतात. या नात्याचे इतरांनाही अनेकदा उदाहरण दिले जाते. चला तर, ४ आणि ७ मूलांक असलेल्या लोकांना उत्तम जोडीदार बनवणारे गुण जाणून घेऊया…

व्यावहारिक मन आणि भावनिक हृदय

मूलांक ४ असणारी मंडळी अत्यंत व्यावहारिक आणि वास्तववादी असतात; तर ७ मूलांक असणारी मंडळी भावनिक, संवेदनशील आणि आध्यात्मिक असतात. जेव्हा या दोन्ही व्यक्ती एकत्र येतात. तेव्हा त्यांच्यात एक सुंदर नाते निर्माण होते, ज्यात आर्थिक सुरक्षिततेपासून ते आदर आणि प्रेमापर्यंत सर्व काही समाविष्ट असते. ४ मूलांक असलेले लोक नात्याला आर्थिक सुरक्षा आणि ७ मूलांकाच्या व्यक्ती नात्यात प्रेम, सखोलता व समाधान आणतात.

एकमेकांना देतात आधार

जेव्हा मूलांक ४ असणारी मंडळी विचार करून गोंधळून जातात, चिडचिड करतात. तेव्हा मूलांक ७ त्यांच्या शांत स्वभावाने आणि सखोल समजुतीने त्यांना हाताळतात. याउलट, जेव्हा मूलांक ७ नैराश्याने ग्रस्त होतात. तेव्हा मूलांक ४ चा व्यावहारिक स्वभाव त्यांना नवीन ऊर्जा देतो.

न बोलता समजून घेणे

या दोन्ही मूलांक असणाऱ्या मंडळींचे नाते खूप घट्ट असते. त्यांना भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज नसते. ते न बोलताही एकमेकांच्या भावना त्वरित समजून घेतात.

लक्षात ठेवा या गोष्टी

मूलांक ७ च्या लोकांनी मूलांक ४ च्या लोकांच्या संवेदनशीलतेची आणि एकटे राहण्याच्या स्वभावाची चेष्टा करू नये. तसेच, मूलांक ४ च्या लोकांनी मूलांक ७ च्या व्यक्तींच्या प्रत्येक गोष्टीत चुका काढण्याच्या आणि शंका घेण्याच्या सवयीचा राग न धरता समजून घ्यावे.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)