Pitru Paksha 2026: पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. २७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत चालणाऱ्या या पक्षात पितरांचे स्मरण, तर्पण आणि श्राद्धविधी केले जातात. ज्योतिषीय मान्यतेनुसार, हा काळ काही राशींच्या लोकांसाठी करिअर आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. या काळात नोकरीत नवीन जबाबदारी, व्यवसायात नवीन संधी आणि अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी पितृपक्षाचा काळ कामाच्या दृष्टीने उत्तम राहू शकतो. तुमच्या जुन्या कामाचे सकारात्मक फळ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील आणि तुमच्या मताला महत्त्व दिले जाईल. व्यावसायिकांना जुन्या ग्राहकांशी पुन्हा जोडले जाण्याची संधी मिळेल. तसेच कोणतेही रखडलेले काम मार्गी लागू शकते. तुमची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी पितृपक्षात नवीन संधी समोर येऊ शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. तर आधीच नोकरी करत असलेल्यांना नवीन जबाबदारी किंवा मोठा प्रोजेक्ट मिळू शकतो. व्यवसायात नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग शोधण्याची संधी मिळेल. मात्र, या काळात वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे ठरेल.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअर आणि कुटुंब या दोन्ही दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करत असलेल्यांना नवीन आणि उत्तम पर्याय मिळू शकतो. व्यवसायातील दीर्घकाळापासून रखडलेले काम पुढे सरकेल. जुन्या समस्येवर किंवा वादावर तोडगा निघू शकतो. कोणताही मोठा निर्णय घाईगडबडीत घेणे टाळा; पूर्ण माहिती घेतल्यानंतरच पुढील पाऊल उचला.
तुळ
तुळ राशीच्या लोकांसाठी पितृपक्ष आर्थिक आणि करिअरशी संबंधित बाबींमध्ये मोठा दिलासा घेऊन येऊ शकतो. कामाचा ताण वाढू शकतो, पण त्याचसोबत प्रगतीचे मार्गही मोकळे होतील. व्यापाऱ्यांना नवीन ग्राहक मिळण्याचे किंवा जुन्या संपर्कातून फायदा होण्याचे योग आहेत. नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढीबाबतची चर्चा पुढे सरकू शकते. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल.
मकर
मकर राशीच्या लोकांना या काळात त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळू शकते. नोकरीत मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. व्यावसायिकांना आपला व्यवसाय विस्तारण्याची संधी मिळेल. नवीन डील किंवा प्रोजेक्टबाबतची बोलणी यशस्वी होऊ शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची आशा आहे. तरीही कागदपत्रांचे काम आणि पैशांच्या देवाणघेवाणीत काळजी घ्या.
पितृपक्षात काय करावे?
पितृपक्षात कुलपरंपरेनुसार पितरांच्या पुण्यतिथीवर श्राद्ध आणि तर्पण करण्याची पद्धत आहे. गरजूंना अन्नदान करण्यासोबतच आपल्या क्षमतेनुसार वस्त्र किंवा उपयोगी वस्तूंचे दान केले जाऊ शकते. जर एखाद्या पूर्वजांची मृत्युतिथी माहीत नसेल, तर सर्वपित्री अमावस्येला त्यांचे श्राद्ध किंवा तर्पण करण्याची परंपरा आहे.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
