Children Born During This Sacred Period Are Beloved Of Lord Vishnu: हिंदू धर्मात काही महिने अत्यंत पवित्र आणि विशेष मानले जातात. त्यापैकीच एक म्हणजे पुरुषोत्तम मास, ज्याला अधिकमास किंवा मलमास, असेही म्हटले जाते. या वर्षी हा विशेष महिना १७ मे ते १५ जूनदरम्यान असणार आहे. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय मान्यतांनुसार या महिन्याचे अधिपती स्वतः भगवान विष्णू मानले जातात. त्यामुळे या काळात जन्म घेणाऱ्या मुलांमध्ये काही वेगळे आणि खास गुण आढळतात, अशी श्रद्धा व्यक्त केली जाते.

अनेक ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, पुरुषोत्तम मासात जन्मलेली मुलं सामान्य मुलांपेक्षा अधिक शांत, संयमी आणि आध्यात्मिक स्वभावाची असू शकतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळंच आकर्षण असतं. विशेष म्हणजे ही मुलं अनेकदा लहानपणापासूनच विचारांनी प्रगल्भ आणि समजूतदार असल्याचं दिसून येतं.

धर्म आणि अध्यात्माकडे विशेष ओढ

ज्योतिषशास्त्रीय मान्यतांनुसार या महिन्यात जन्मलेल्या मुलांचा धर्म आणि अध्यात्माकडे नैसर्गिक कल असू शकतो. पूजा, प्रार्थना, मंत्र किंवा धार्मिक गोष्टींबद्दल त्यांना लहानपणापासूनच उत्सुकता वाटू शकते. अशी मुलं मनानं स्वच्छ आणि प्रामाणिक असतात, अशीही धारणा आहे.

शांत; पण आतून अत्यंत मजबूत

पुरुषोत्तम मासात जन्मलेली मुलं शांत आणि संयमी स्वभावाची असतात, असं मानलं जातं. ही मुलं कोणताही निर्णय घाईघाईत घेत नाहीत. प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच पुढे पाऊल टाकतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्या निर्णयांमध्ये स्थिरता आणि परिपक्वता दिसून येते.

विशेष म्हणजे कठीण परिस्थितीतही ही मुलं सहजगत्या हार मानत नाहीत. त्यांच्या धैर्य आणि संयमामुळे अनेक जण त्यांच्याकडे प्रेरणादायी नजरेने पाहतात.

‘वेगळा विचार’ हीच त्यांची ओळख?

असं म्हटलं जातं की, या काळात जन्मलेली मुलं अत्यंत जिज्ञासू आणि विचारशील असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीमागचं कारण जाणून घ्यायचं असतं. नवीन गोष्टी शिकण्याची त्यांना इच्छा प्रचंड असते. त्यामुळेच अनेकदा अशी मुलं अभ्यास, संशोधन किंवा ज्ञानाशी संबंधित क्षेत्रांत चांगली प्रगती करू शकतात.

कला आणि सर्जनशीलतेची देणगी

ज्योतिषशास्त्रानुसार, पुरुषोत्तम मासात जन्मलेल्यांमध्ये सर्जनशीलता मोठ्या प्रमाणात असू शकते. संगीत, चित्रकला, लेखन किंवा इतर कलात्मक क्षेत्रांमध्ये त्यांची विशेष रुची दिसून येऊ शकते. काही लोकांच्या मते, ही मुलं आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करतात.

आव्हानांना भिडण्याची ताकद

या महिन्यात जन्मलेली मुलं धाडसी आणि जिद्दी असतात, अशीही धारणा आहे. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद त्यांच्यात असते. सहज हार न मानणं हा त्यांचा मोठा गुण मानला जातो.

(टीप : ही माहिती धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय मान्यतांवर आधारित असून, त्यामध्ये कोणताही वैज्ञानिक दावा करण्यात आलेला नाही.)