Rahul Gandhi Astrology: समकालीन भारतीय राजकारणात राहुल गांधींचा राजकीय प्रवास खूपच वेगळा राहिला आहे. देशाच्या राजकीय इतिहासातील सर्वांत प्रसिद्ध नेहरू-गांधी कुटुंबातून आलेल्या राहुल गांधींनी २००४ मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यावेळी काँग्रेस पक्ष देशातील प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक होता. राहुल गांधी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकले आणि काही काळातच काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकार सत्तेवर आले. त्यांच्या आई सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या, तर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. तरुण वयातच राहुल गांधींकडे काँग्रेसचे भावी नेतृत्व म्हणून पाहिले जाऊ लागले. त्यांनी काँग्रेसला सत्तेत येताना आणि पुन्हा निवडून येताना पाहिले, तसेच पक्षाचा मोठा पराभवही अनुभवला.
या काळात त्यांनी काँग्रेसमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि पक्षाचे अध्यक्षपदही भूषवले. मात्र, निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ज्या अमेठी मतदारसंघातून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली, तिथेही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून देशभर हजारो किलोमीटर प्रवास केला. एका प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्यांना काही काळ संसद सदस्यत्व गमवावे लागले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुन्हा त्यांना संसद सदस्यत्व बहाल केले गेले.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी दोन मतदारसंघांतून विजयी झाले आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनले. त्यामुळे राहुल गांधींची राजकीय कारकीर्द ही सातत्याने यशाची कथा नाही. यश, अपयश, संघर्ष आणि पुन्हा उभं राहणं, असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. आता प्रश्न असा आहे की, काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीत मागील वेळेपेक्षा चांगली कामगिरी करेल का? राहुल गांधी पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ठरतील का? २०२९ मध्ये ते पंतप्रधान होऊ शकतील का? राहुल गांधींची कुंडली याबाबत काय संकेत देते? ज्योतिषतज्ज्ञ विक्रम चंदीरामानी यांच्याकडून जाणून घेऊया…
राहुल गांधींची कुंडली त्यांच्या आयुष्यात वारंवार चढ-उतार का आले, हे समजून घेण्यास मदत करते. त्यांच्या कुंडलीनुसार तूळ लग्न असून, सूर्य-मंगळ मिथुन राशीत, चंद्र धनु राशीत, बुध वृषभ राशीत, गुरू तूळ राशीत, शुक्र कर्क राशीत, शनी मेष राशीत, राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत आहे. तूळ लग्नामुळे त्यांचा स्वभाव समतोल राखणारा, नातेसंबंध जपणारा आणि संयमी असू शकतो. ते विनाकारण संघर्ष करणारे व्यक्ती नसून, एखाद्या विषयाकडे वेगवेगळ्या बाजूंनी पाहण्याचा प्रयत्न करतात. तूळ राशीचा संबंध न्याय, समतोल, संवाद आणि जुळवून घेण्याशी आहे. त्यामुळे राहुल गांधी राजकारणाकडे केवळ सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने न पाहता, न्याय, लोकांचे प्रतिनिधित्व, संस्थांचा समतोल आणि समाज कसा असावा, या मुद्द्यांच्या आधारे पाहत असल्याचे ज्योतिषशास्त्रातून सांगितले जाते. या ग्रहस्थितीमुळे ते सामाजिक प्रश्नांबाबत जागरूक राहू शकतात. तसेच केवळ आक्रमकपणापेक्षा विचार, तत्त्वे आणि योग्यतेच्या आधारावर लोकांचा विश्वास मिळवण्याकडे त्यांचा कल असू शकतो.
ही कुंडली पाहिल्यावर राहुल गांधींचा राजकीय प्रवास सरळ आणि सोपा नसून, संघर्ष, बदल आणि पुन्हा उभं राहण्याचा राहिला आहे, असं ज्योतिषशास्त्रातून सांगितलं जातं. मिथुन राशीतील सूर्य आणि मंगळ त्यांना सतत प्रश्न विचारणारे, नवीन गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असलेले आणि आपल्या मतांसाठी ठामपणे लढणारे बनवतात. ते एखाद्या मुद्द्यावर थेट आक्रमक होण्यापेक्षा प्रश्न विचारणे, चर्चा करणे आणि युक्तिवादातून विरोध करणे पसंत करू शकतात. त्यामुळे त्यांचा राजकीय दृष्टिकोन सतत बदलणारा किंवा वेगवेगळ्या बाजू तपासणारा वाटू शकतो.
वृषभ राशीतील बुध मात्र त्यांच्या विचारांना स्थिरता देतो. नवीन गोष्टी जाणून घेतल्यानंतर एखादा निर्णय घेतला की, त्यावर ठाम राहण्याची क्षमता त्यांच्यात असू शकते. म्हणजेच मिथुनचा शोध घेणारा स्वभाव आणि वृषभचा ठामपणा यांचा संगम त्यांच्या कुंडलीत दिसतो.
धनु राशीतील चंद्रामुळे त्यांच्यात मोठ्या विचारांची, स्वातंत्र्याची आणि वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा वाढू शकते. प्रवास, नवीन लोकांना भेटणे आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे याकडे त्यांचा कल असू शकतो. चंद्र आणि गुरूच्या योगामुळे समाजाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची आणि मोठ्या प्रश्नांचा विचार करण्याची वृत्ती निर्माण होऊ शकते. अपयश आले तरी त्यातून सावरून पुन्हा पुढे जाण्याची क्षमता मिळू शकते.
मात्र, चंद्र-प्लुटोच्या योगामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक भावनिक आणि गंभीर बाजूही दिसते. वरून ते शांत आणि सहज वाटले तरी, एखाद्या घटनेचा त्यांच्या मनावर खोल परिणाम होऊ शकतो. सत्ता, नुकसान, विश्वासघात यांसारख्या विषयांकडे ते गांभीर्याने पाहू शकतात. कठीण अनुभवांमधून ते स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतात.
मेष राशीतील शनी संघर्षातून आत्मविश्वास आणि नेतृत्व विकसित होण्याचे संकेत देतो, असे ज्योतिषशास्त्र मानते. म्हणजेच त्यांना सुरुवातीपासूनच आत्मविश्वास मिळण्याऐवजी अपयश आणि अडचणींमधून तो अधिक मजबूत होऊ शकतो.
