Numerology Brother Sister Relationship: भाऊ-बहिणीचं नातं म्हणजे प्रेम, मस्ती, भांडणं आणि आयुष्यभराची साथ यांचं सुंदर मिश्रण! कितीही नोकझोक झाली तरी बहिणीवर संकट आलं की तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा भाऊच असतो. अनेक भाऊ बहिणीच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवायलाही मागेपुढे पाहत नाहीत. अंकशास्त्रानुसार, काही मूलांकाच्या व्यक्तींमध्ये कुटुंबाबद्दलची आपुलकी, जबाबदारीची भावना आणि संरक्षण करण्याची वृत्ती अधिक असल्याचे मानले जाते. त्यामुळे या मूलांकाचे भाऊ आपल्या बहिणीसाठी विशेष काळजी घेणारे असू शकतात. तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ‘हे’ ३ मूलांक…
मूलांक १: बहिणीच्या सुरक्षेसाठी नेहमी पुढे
अंकशास्त्रात मूलांक १चा संबंध सूर्याशी जोडला जातो. या मूलांकाच्या व्यक्तींना आत्मविश्वासी, जबाबदार आणि नेतृत्वगुण असलेले मानले जाते. मूलांक १ असलेले भाऊ आपल्या बहिणीबाबत काहीसे पझेसिव्ह आणि संरक्षण देणारे असू शकतात. बहिणीच्या आयुष्यात कोणतीही अडचण आली, तर तिला एकटं न सोडता तिच्या पाठीशी उभं राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. बहिणीच्या सुरक्षिततेला आणि सन्मानाला ते महत्त्व देतात. कठीण प्रसंगी तिचं मनोबल वाढवणे, योग्य सल्ला देणे किंवा शक्य ती मदत करणे, यासाठी ते पुढाकार घेतात. त्यामुळे बहिणीसाठी हा भाऊ अनेकदा ‘संकटात धावून येणारा आधार’ ठरतो.
मूलांक ६: बहिणीच्या छोट्या-छोट्या इच्छा ओळखणारे
मूलांक ६चा संबंध शुक्र ग्रहाशी मानला जातो. शुक्र हा प्रेम, सुख-सुविधा, सौंदर्य आणि कौटुंबिक आनंदाचा कारक मानला जातो. अंकशास्त्रानुसार, मूलांक ६ असलेले भाऊ प्रेमळ, भावुक आणि स्नेही स्वभावाचे असतात. बहिणीला काय आवडतं, तिला कशाची गरज आहे किंवा ती कशामुळे आनंदी होईल याकडे त्यांचं विशेष लक्ष असू शकतं. या भावांचं बहिणीसोबतचं नातं अनेकदा भावापेक्षा मित्रासारखं असतं. बहिणीच्या गप्पा ऐकणे, तिच्या भावना समजून घेणे आणि गरजेच्या वेळी भावनिक आधार देणे, हे त्यांना सहज जमतं. म्हणूनच मूलांक ६ असलेल्या भावंडांमध्ये मैत्री, जिव्हाळा आणि भावनिक जवळीक अधिक असल्याचं मानलं जातं.
मूलांक ९: बहिणीसाठी ‘रक्षक’ बनून उभे राहतात
अंकशास्त्रात मूलांक ९चा संबंध मंगळाशी जोडला जातो. मंगळ हा साहस, ऊर्जा, पराक्रम आणि धैर्याचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे मूलांक ९ असलेले भाऊ धाडसी आणि संरक्षण देणाऱ्या स्वभावाचे असल्याचं मानलं जातं. बहिणीसमोर कोणतीही अडचण आली तर मदतीसाठी सर्वात आधी पुढे येण्याची त्यांची वृत्ती असू शकते. बहिणीच्या सुरक्षिततेबाबत ते विशेष जागरूक असतात. संकटाच्या काळात तिची साथ न सोडता ‘काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे’ असा विश्वास देण्याचा त्यांचा स्वभाव असतो. कधी-कधी त्यांचा स्वभाव थोडा तापट किंवा रागीट वाटू शकतो; मात्र बहिणीबद्दलचा जिव्हाळा आणि काळजी मनापासून असल्याचं अंकशास्त्रात मानलं जातं.
भावाचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते
भाऊ कितीही मस्करी करो, बहिणीशी कितीही भांडो किंवा तिची चेष्टा करो; पण तिच्यावर संकट आलं की तो सर्वात आधी तिच्या पाठीशी उभा राहतो. मूलांक १, ६ आणि ९ यांच्याबाबत अंकशास्त्रात अशाच प्रेमळ आणि संरक्षण देणाऱ्या स्वभावाचे संकेत दिले जातात.
