Venus Mercury Conjunction 2025: ज्योतिषशास्त्रात ग्रहांची प्रत्येक हालचाल महत्त्वाची मानली जाते. मात्र, दोन ग्रह एकाच वेळी एकाच राशीत प्रवेश करतील असा योग निर्माण झाला तर त्याचे परिणाम अधिक प्रभावी ठरू शकतात असे ज्योतिषशास्त्र सांगते. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस असा दुर्मीळ संयोग घडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दृक् पंचांगानुसार, २३ नोव्हेंबर रोजी शुक्र आणि बुध हे दोन्ही ग्रह तूळ राशीत एकत्र येणार असून या विशेष युतीला ‘लक्ष्मी–नारायण योग’ असे नाव दिले जाते. या दिवशी बुधाचा तूळ राशीत गोचर होणार असून ज्योतिषीयदृष्ट्या हा एक महत्त्वपूर्ण क्षण मानला जातो. हे दोन प्रभावी ग्रह एकत्र आल्यानं काही राशींना या काळात धनलाभ, प्रगती आणि आकस्मिक लाभाचे योग तयार होणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

शुक्र-बुध युतीने घरात येऊ शकतं धन, सुख आणि शुभवार्ता!

मेष

ज्योतिषीय मते, २३ नोव्हेंबरचा शुभ संयोग मेष राशीसाठी काही सकारात्मक बदलांची दारं उघडू शकतो. ज्या कामांमध्ये बराच काळ अडथळे येत होते, त्या कामांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त होते. दाम्पत्य जीवनात संवाद आणि सौहार्द वाढताना दिसू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. व्यापारी वर्गाची नवीन करार, चर्चांमुळे आर्थिक स्थिरतेकडे वाटचाल होऊ शकते, असा ज्योतिषांचा अंदाज आहे.

तूळ

हा संयोग सर्वाधिक प्रभाव तूळ राशीवर टाकू शकतो, कारण दोन ग्रहांचा मिलाप थेट या राशीत घडणार आहे. नोकरी क्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या, भूमिका किंवा पदोन्नतीची शक्यता ज्योतिषांच्या मते निर्माण होते. व्यवसायाच्या क्षेत्रात भरपूर नफा कमवू शकता. आर्थिक लाभाच्या अनेक शक्यता आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास अनुकूल ठरू शकतो. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. स्पर्धा परीक्षांमध्येही यशाची शक्यता वाढू शकते, असा विचार काही ज्योतिष मांडतात. घरातील वातावरणही शांत, सौहार्दपूर्ण राहू शकते.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्र-बुध युती काही सकारात्मक संकेत देऊ शकते. अडकलेली कामे पुन्हा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नवीन व्यावसायिक संधी, संयुक्त प्रकल्प किंवा विश्वसनीय सहकारी मिळण्याचे संकेतही ज्योतिषशास्त्रात वर्तवले जातात. अडलेला पैसा परत मिळू शकतो. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंद, सौहार्द आणि मनःशांती वाढू शकते.

या दोन ग्रहांचे एकाच राशीत एकाच वेळी आगमन म्हणजेच बुध-शुक्र युती ज्योतिषशास्त्रात शुभ, समृद्धीकारक आणि संतुलन देणारी मानली जाते असा विश्वास व्यक्त केला जातो. पण, प्रत्यक्षात परिणाम व्यक्तिनिहाय, कुंडलीनिहाय बदलू शकतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)