scorecardresearch

Ratha Saptami 2023 : रथ सप्तमीला पूजा कशी करायची? जाणून घ्या विधी, आणि मुहूर्त

माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथ सप्तमी साजरी केली जाते. भारतात सर्व ठिकाणी हा दिवस सूर्य जयंती म्हणून साजरा केला जातो

Ratha Saptami 2023
संपूर्ण भारतात रथ सप्तमी हा दिवस भगवान सूर्याची जयंती म्हणून साजरा केला जातो. (Photo : Jansatta)

माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथ सप्तमी साजरी केली जाते. संपूर्ण भारतात सर्व ठिकाणी हा दिवस भगवान सूर्याची जयंती म्हणून साजरा केला जातो. या सप्तमीला अर्क सप्तमी, आरोग्य सप्तमी, माघी सप्तमी असंही म्टलं जातं. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. यावेळी रथ सप्तमी माघ शुक्ल सप्तमीला म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी साजरी केली जात आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्याची पूजा केली जाते.

रथ सप्तमीला दान केल्याने पाप आणि रोगांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. यासोबतच उत्तम आरोग्याचे वरदानही मिळते. रथ सप्तमीच्या दिवशी तिरुपती बालाजी मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या मंदिरांमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.

हेही वाचा- १ महिन्याने तीन ग्रह तयार करणार ‘अद्भुत संयोग’; ‘या’ राशींना मिळू शकतो प्रचंड पैसा

रथ सप्तमीबाबतच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्यापैकी एका पुराणातील कथेनुसार, अदिती आणि ऋषि कश्यप यांचा मुलगा सूर्य याचा हा जन्मदिवस असल्याचे मानले जाते, सर्वांत सामर्थ्यवान, तेजस्वी, युक्तीवान, बुद्धीवान, सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे. शिवाय रथस प्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे. सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य सर्व ग्रह त्याच्यापासून प्रकाश घेतात. सूर्याला ग्रहांचा राजा म्हटलं जात शिवाय नवग्रहांमध्ये सुर्याचे स्थान वरचे आहे.

रथ सप्तमीला अशी करतात पूजा –

या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्याचे दर्शन घ्यावे. त्यानंतर लाल फुले, चंदन, कापूर अर्पण करून छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य द्यावे. तुळशीपुढे सात घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्यरथाचे चित्र काढून त्याची पूजा केली जाते. शिवाय अंगणात दिवा लावून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखविला जातो. सूर्यरथाला असणारे सप्त अश्‍व आठवड्यातील ७ वार दर्शवतात. रथाची बारा चाके बारा राशींचे प्रतिक असल्याचे मानले जाते. अशा पद्धतीने पूजा यादिवशी केली जाते.

हेही वाचा- स्वप्न शास्त्रानुसार ‘या’ गोष्टी स्वप्नात दिसणं तुमच्यासाठी फायदेशीर, धनप्राप्तीसह व्यवसायतही होऊ शकते वाढ

महत्व –

माघ महिन्याच्या शुक्लपक्षाच्या सातव्या तिथीला तीर्थ-स्नान आणि सूर्य उपासना केल्याने रोग दूर होतात आणि दिर्घायुष्य लाभते. ब्रह्म, स्कंद, शिव, अग्नी, मत्स्य, नारद आणि भविष्य पुराणात या रथ सप्तमीचे महत्त्व सांगितलं आहे. या दिवशी दान केल्यास त्याचे शाश्वत फळ मिळते असं मानलं जाते. शिवाय या दिवशी उपवास केल्याने अपत्य प्राप्ती आणि मनातील इच्छा पूर्ण होतात.

मुहूर्त –

आज सूर्योदय ०७ वाजून १३ मिनिटांनी होणार आहे. शिवाय संक्रातीपासून सुरू झालेले हळदीकुंकवाचे, बोरनान्हाचे अन् तीलवणाचे कार्यक्रम आज समाप्त होतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 10:45 IST