Vrishchik May Rashibhavishya 2026: वृश्चिक ही मंगळाची रास आहे. मंगळाचा बिनधास्तपणा, लढाऊ वृत्ती या राशीच्या लोकांमध्ये दिसून येते. दुसऱ्यांवर हुकुमत गाजवणे, आपल्या मताप्रमाणे वागणे हा यांचा नैसर्गिक स्वभाव आहे. हे लोक कर्तबगार, संशोधक, उत्तम प्रशासक असतात.

काही वेळा त्यांच्या निश्चयीपणाचे रूपांतर हट्टामध्ये आणि चिकित्सेचे शंका-कुशंकांमध्ये होते. अफाट निरीक्षण शक्ती, हळवेपणा, राग अशा गुणांचे संमिश्रण असलेल्या वृश्चिक राशीच्या लोकांना मे महिना नेमका जाईल याचा आढावा घेऊया….

वर्षभरातील महत्त्वाच्या ग्रहांचे भ्रमण, राशिबदल असे आहेत

यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल सप्तमातील वृषभ राशीतून भ्रमण करेल. नेपच्यून आणि शनी यांचे पंचमातील मीन राशीत भ्रमण असेल. गुरू अष्टमातील मिथुन राशीत असेल. त्यावेळी गुरुबल अत्यंत कमजोर असेल. १ जूनला गुरू भाग्यातील कर्क राशीत प्रवेश करेल. उत्तम गुरुबल प्राप्त होईल.

पुढे ३१ ऑक्टोबरला गुरू दशमातील सिंह राशीत प्रवेश करेल. सिंहस्थातील गुरूचे बलही आपणासाठी चांगलेच असेल. तृतीयातील मकर राशीत प्लूटो वर्षभर भ्रमण करेल. २५ नोव्हेंबरला राहू आणि केतू वक्र गतीने अनुक्रमे तृतीयातील मकर राशीत आणि भाग्यातील कर्क राशीत प्रवेश करतील.

वृश्चिक राशीचं मे महिन्याचं राशिभविष्य (Scorpio Horoscope May 2026)

बुद्ध पौर्णिमा प्रेरणादायी ठरेल. मनात ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होतील. मोठे प्रवास घडतील. शिक्षक आणि मार्गदर्शकांना आपला अभिमान वाटेल. नोकरी-व्यवसायात मेहनतीचे अपेक्षित फळ मिळाले नाही तरी निराश होऊ नका. सध्या नोकरीबदलाचे योग नाहीत. विवाहितांचे सहजीवन सुखमय असेल. एकत्रित प्रवास कराल.

कौटुंबिक समारंभात हिरिरीने सहभागी व्हाल. गुंतवणूक करताना विशेष सावधगिरी बाळगावी. आर्थिक गणिते पुन्हा नव्याने करतील. घर, जमीनजुमला याबाबत गोंधळ वाढवणारी विधाने चर्चेदरम्यान मांडली जातील. तज्ज्ञांच्या सल्ल्याने अडचणीतून मार्ग निघेल. नुकसानीचा सौदा करू नका. परदेशासंबंधित कार्य विनाकारण लांबेल. हातातोंडाशी आलेली संधी हुकेल. उष्णतेचे विकार बळावतील. पित्ताचा त्रास, डोळे तळवणे असे विकार उद्भवतील.

– ज्योतिषी सोनल चितळे