-सोनल चितळे

Scorpio Yearly Horoscope 2023 Predictions in Marathi: वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ हा पापग्रह असला तरी तो संरक्षक आहे. लढवैय्या आहे. हट्ट, राग, उतावीळपणासह त्याच्याकडे धडाडी, आत्मविश्वास आणि कर्तृत्व देखील आहे. ही सगळी वैशिष्ट्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये कमी अधिक प्रमाणात आढळून येतात. चंचल मनाच्या, जिद्दी, सत्ता – अधिकार गाजवणाऱ्या या वृश्चिक राशीच्या व्यक्ती आपल्या मनाचा थांगपत्ता कोणाला लागू देत नाहीत. एखाद्यावर प्रेम करतील तर अगदी जीवापाड करतील. अशा या भावनाप्रधान वृश्चिक राशीला २०२३ हे वर्ष कसे असेल ते पाहू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल आपल्या षष्ठ स्थानात आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत या हर्षलसह राहू देखील असेल. नवीन कार्य करण्यास हिंमत मिळेल. स्पर्धात्मक आव्हाने स्वीकाराल. २१ एप्रिलपर्यंत गुरू आपल्या पंचमातील मीन राशीत आहे. उत्तम गुरुबल आहे. कामे झपाझप पूर्ण होतील. नव्या संकल्पना अमलात आणाल. २१ एप्रिलला गुरू षष्ठातील मेष राशीत प्रवेश करेल. गुरुबल थोडेसे कमी होईल. पण गुरुचे पाठबळ मिळत राहील. चिंता नको. प्रयत्न करत राहावे. १७ जानेवारीला शनीचा चतुर्थ स्थानातील कुंभ राशीत प्रवेश झाला आहे. याचे बरे वाईट दोन्ही परिणाम अनुभवायला मिळतील. अजिबात खचून जाऊ नका. अशा या महत्त्वाच्या ग्रह बदलांसह इतर सर्व ग्रहांच्या भ्रमणांचा विचार करता एकंदरीत वृश्चिक राशीचे वार्षिक ग्रहफल असे आहे…

जानेवारी :

लहानमोठे प्रवास करण्यास योग चांगले आहेत. कामानिमित्त वा कामाव्यतिरिक्त प्रवासाचा आनंद घ्याल. स्थावर मालमत्तेसंबंधीत कामे हळूहळू मार्गी लागतील. खरेदी वा विक्री करण्यासाठी प्रयत्न सुरू करावेत. विद्यार्थी वर्गाला गुरुबल चांगले असल्याने प्रयत्नांना उत्तम यश मिळेल. स्पर्धात्मक परीक्षेत उत्तीर्ण व्हाल. जोडीदारासह जुळवून घ्याल. कौटुंबिक परिस्थिती हळुवारपणे हाताळाल. नोकरी व्यवसायात धनलाभ होईल. कष्टाचे चीज झाल्याने हुरूप वाढेल. पित्त, डोकेदुखी, सर्दी यांचा त्रास होईल.

फेब्रुवारी :

आपल्या शब्दामुळे गरजवंताचे काम होईल. विद्यार्थी वर्गाला चांगले ग्रहबल आहे. परदेशात शिक्षण घेण्याची तयारी सुरू करावी. विवाहोत्सुक मंडळींच्या संशोधनाला यश मिळेल. प्रेमसंबंध जुळून येतील. नोकरी व्यवसायात अडचणींवर मात करत पुढे जाल. स्वतःला सिध्द करण्याची चांगली संधी उपलब्ध होईल. विरोधकांना चीत कराल. जोडीदाराच्या आवडीनिवडी जपाल. गुंतवणूकदारांनी मोठी झेप घेऊ नये. ओटीपोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे.

मार्च :

महिन्याच्या मध्यापर्यंत चतुर्थातील शनिसह रवीदेखील भ्रमण करत असेल. कौटुंबिक वाद विकोपाला जाऊ देऊ नका. बुधाच्या साथीने पर्यायी मार्ग निवडून गृहशांती कायम ठेवावी. विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक विषयांसोबत कलात्मक गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. राहू हर्षलसह शुक्र मेष राशीत प्रवेश करत आहे. चहू बाजूंनी प्रलोभने आपल्याला विळख्यात घेऊ पाहतील. वेळीच सावध व्हा. क्षणिक सुखापेक्षा कायम स्वरूपी आनंद मिळावा. उत्सर्जन संस्थे बिघाडाची शक्यता.

एप्रिल :

सप्तमातील वृषभेचा शुक्र जोडीदारासह खेळीमेळीचे नाते प्रस्थापित करेल. स्थावर मालमत्तेसंबंधित कामे धिम्या गतीने पुढे सरकतील. बोलणी लाभदायक ठरतील. विद्यार्थी वर्गाने घेतलेली मेहनत फळास येईल. २१ एप्रिलनंतर गुरू मेष राशीत प्रवेश करेल. गुरुबल थोडेसे कमी झाले तरी हिमतीने पुढे जायची तयारी ठेवाल. नोकरी व्यवसायात जोरदार आगेकूच कराल. उत्तम धनयोग येत आहे. मेहनत कमी पडू देऊ नका. रक्तदाब वाढणे, चक्कर येणे असे त्रास वाढतील. अतिदगदग टाळा. वेळेवर विश्रांती घेणेही गरजेचे आहे.

मे :

षष्ठ स्थानात पाच ग्रह एकत्र आले आहेत. रवी, राहू, हर्षल, बुध आणि गुरू यामुळे आत्मविश्वास डळमळीत होईल. भाग्यातील मंगळ नीच असला तरी बुडत्याला काठीचा आधार नक्कीच देईल. नोकरी व्यवसायात अडीअडचणींचा सामना करत पुढे जावे लागेल. विद्यार्थी वर्गाने सावध राहावे. उच्च शिक्षणाची तयारी जोरदारपणे करता येईल. जोडीदाराच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटेल. विवाहोत्सुक मंडळींनी धीराने घ्यावे. मध्यम गुरुबल आहे. आजाराचे निदान होणे, योग्य उपचार मिळणे यात विलंब होईल.

जून :

कामानिमित्त वा कामाव्यतिरिक्त प्रवास कराल. तसेच वाहन खरेदीसाठी चांगले योग आहेत. भाग्य स्थानातील मंगळ, शुक्र आपल्या आवडीनुसार जगण्याची संधी उपलब्ध करून देतील. विद्यार्थी वर्गाला नव्या विषयांची आवड निर्माण होईल. जोडीदार चार समजुतीच्या गोष्टी सुचवेल. त्याचे ऐकलेत तर सर्वांचाच लाभ होईल. नोकरी व्यवसायात काही गोष्टी मनाविरुद्ध घडतील. संयम ठेवा. चुकीच्या गोष्टींना नक्की विरोध करा. छाती, फुप्फुसे यांचे आरोग्य जपा. प्रदूषणाचा त्रास होईल. वैद्यकीय सल्ला आवश्यक !

जुलै :

एकंदरीत ग्रहमान स्थैर्य देणारे आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल नको. धीर आणि सामंजस्य कामी येईल. नोकरी व्यवसायात महिन्याच्या अखेरीस आर्थिक लाभ होतील. शुभ वार्ता समजतील. विद्यार्थीवर्गाने कायम जागरूक राहावे. चिकाटी गरजेची ! स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी शोधकार्य सुरू ठेवावे. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात नाव गाजवेल. सहकारी वर्गाची साथ सोबत उत्तम मिळेल. कामाचा ताण वाढेल. पाठ, मणका भरून येणे व पित्तविकार बळावतील. वातावरणातील बदलानुसार आहारात बदल करावा.

ऑगस्ट :

जे काम मनात योजाल, ते पूर्णत्वास न्याल. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय चांगले ग्रहमान आहेत. ‘तू पुढे हो, आम्ही पाठीशी आहोत’ असे म्हणणारी ‘सपोर्ट सिस्टीम’ आपली हिंमत वाढवेल. विद्यार्थी वर्गाला कला- तंत्रज्ञान या क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. स्पर्धात्मक परीक्षेची जोरदार तयारी करा. जोडीदार त्याच्या कार्यात व्यस्त असेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाटून घ्याव्यात. कामानिमित्त प्रवास कराल. पित्तविकाराने छातीत जळजळ, डोकेदुखी, अपचन असे त्रास दुर्लक्षित करू नका.

सप्टेंबर :

उत्तम धनलाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. विद्यार्थी वर्गासाठी नव्या वाटा उपलब्ध होतील. नोकरी व्यवसायात आर्थिक उन्नती होईल. मेहनतीचे फळ मिळाल्याने समाधान वाटेल. इतरांशी तुलना करणे मात्र प्रकर्षाने टाळा. अन्यथा जीवनाचा आनंद घेऊ शकणार नाही. जोडीदाराच्या साथीमुळे भाग्य उजळेल. कौटुंबिक वातावरण उत्साही, आनंदी राहील. विवाहोत्सुक मंडळींनी संशोधन सुरू ठेवावे. पण लगेच रेशीमगाठी जुळून येतील असे नाही. आरोग्य चांगले राहील.

ऑक्टोबर :

अनावश्यक आणि अनाठायी खर्च टाळलात, तरच महिन्याचे आर्थिक गणित जुळेल. नोकरी निमित्ताने केलेल्या प्रवासात अडचणी येतील. सर्व बाजूंनी सावधगिरी बाळगावी. जोडीदारासह चांगले जुळेल. विद्यार्थीवर्गाने परीक्षेची कसून तयारी करावी. न डगमगता धीराने पुढे जावे. घरीदारी, कामाच्या ठिकाणी नातेसंबंध जपा. शब्द जपून वापरा. एखाद्याची एखादी कृती चुकीची असली म्हणजे ती व्यक्ती संपूर्ण चूक नसते हे ध्यानात ठेवा. डोळे आणि उत्सर्जन संस्थेचे आरोग्य जपावे.

हे ही वाचा<< Virgo Yearly Horoscope 2023: कन्या राशीला लक्ष्मी कधी देणार धनलाभ? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

नोव्हेंबर :

हिंमत तर आपल्याकडे प्रचंड आहे. धीर धरणे , संयम राखणे यांची साथ मिळाली तर मोठमोठी कामे या महिन्यात पूर्ण होतील. जोडीदाराची खूप छान साथ मिळेल. कौटुंबिक प्रश्न हळुवारपणे हाताळाल. मुलांना शिस्तीसह प्रेमाची ऊब द्याल. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक घटना घडतील. नव्या प्रकल्पाविषयी बोलणी सुरू होतील. कामाला वेग येईल. विद्यार्थी वर्गाच्या कष्टाचे चीज होईल. धनसंपत्ती मिळेल. लहानमोठ्या गोष्टींचा डोक्यात राग घालून घेऊ नका. अनावश्यक चिडचिड टाळा.

हे ही वाचा<<Libra Yearly Horoscope 2023: तूळ राशीला लक्ष्मी कधी करणार श्रीमंत? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

डिसेंबर :

२८ नोव्हेंबरला राहुचा आपल्या पंचमातील मीन राशीत प्रवेश होणार आहे. इतर ग्रहांचे बळ चांगले असल्याने प्रगतीपथावर वाटचाल कराल. यशामुळे आत्मविश्वास वाढेल. स्थावर मालमत्तेबाबत सूत्रे हलतील. तज्ज्ञ मंडळींकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. विद्यार्थीवर्गाकडून अपेक्षा उंचावतील. ताण घेऊ नका. जोडीदारासह शाब्दिक खटके वाजले तरी त्यात कटुता नसेल. प्रेमसंबंध अबाधित राहतील. नोकरी व्यवसायातील स्थिती सुधारेल. धनलाभ होईल. गुंतवणूक लाभदायक ठरेल. थंडीताप, साथीच्या विकारांपासून त्रास होईल.

हे ही वाचा<<Leo Yearly Horoscope 2023: सिंह रास श्रीमंत कधी होणार? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचं राशीभविष्य

२०२३ या वर्षात २१ एप्रिलपर्यंत गुरुबल उत्तम असेल. या काळात महत्वाच्या कामांना गती मिळेल. नातेवाईक, आप्तजन यांच्या भेटीगाठी आनंद देतील. जुने हेवेदावे संपुष्टात आणण्याचा प्रयत्न कराल. जून, जुलै नंतर आर्थिक आलेख उंचावेल. धनलाभ, प्रसिद्धी, लौकीक वाढेल. शिक्षण वा कामानिमित्त परदेशी जाण्याचे योग २१ एप्रिलपर्यंत चांगले आहेत. नंतर मात्र योग कमजोर होतील. शनीचा राशी बदल काही कामांत विलंब करेल. आरोग्याच्या दृष्टीने चढ उतार असला तरी वैद्यकीय मदत मिळून पुन्हा आरोग्यसंपन्न व्हाल. चिडचिड करून स्वतःच्या डोक्याचा ताप वाढवू नका. हिमतीने बऱ्याच गोष्टी साध्य कराल. ज्येष्ठ मंडळींचे पाठबळ मिळेल. २०२३ हे वर्ष वृश्चिक राशीच्या मंडळींना एकंदरीत लाभदायक आणि हितकारक जाईल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scorpio yearly horoscope 2023 predictions vruschik rashi bhavishya in marathi svs
First published on: 23-01-2023 at 10:04 IST