Aries and Pisces September Horoscope : पुढच्या महिन्यात लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार असून, सण-उत्सवांच्या उत्साहात सप्टेंबर महिना खास ठरणार आहे. या महिन्यात होणारे ग्रह-नक्षत्रांचे बदल १२ राशींच्या जीवनावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करू शकतात. काही राशींना करिअर आणि आर्थिक बाबतीत चांगल्या संधी मिळतील, तर काहींना नातेसंबंध आणि आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. तर मेष ते मीन, तुमच्या राशीसाठी सप्टेंबर महिना कसा असेल, याबद्दल सोनल चितळे यांच्याकडून जाणून घेऊयात.

मेष

सण, उत्सव यांनी नटलेला हा महिना सामाजिक बांधिलकी शिकवेल. ४ तारखेची कालाष्टमी उत्साह निर्माण करेल. गणेशोत्सवादरम्यान श्रद्धा आणि सबुरी पणास लागेल. विद्यार्थिवर्गाला नव्या क्षेत्रात अभ्यास करता येईल. परदेशी शिकण्याचा योग येईल. नोकरी-व्यवसायात हितशत्रूंचा डाव हाणून पाडाल. आपल्या व्यक्तिमत्त्वाची प्रभावी चुणूक दाखवाल. विवाहित मंडळींना कुटुंबासाठी वेळ देता येईल. गुंतवणूकदारांनी थोडी विश्रांती घेणे योग्य ठरेल. घर, जमीन, वडिलोपार्जित इस्टेट यांबाबत सकारात्मक बोलणी होतील. पोटाचे आरोग्य सांभाळा. दूषित पाण्याचा त्रास होईल. अनंत चतुर्दशीला विशेष बातमी समजेल.

वृषभ

आपण उत्सवप्रिय असल्याने या महिन्यात अनेक लोकांच्या भेटीगाठी होतील. जमेल तशी मदत करणे तर आपल्या रक्तातच आहे. स्वतः आनंद घेत इतरांना आनंद द्याल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणे कठीण वाटत असले तरी त्या वाचून आता पर्याय नाही. स्वतःचे स्वतंत्र वेळापत्रक करून त्याचे पालन कराल. नोकरी व्यवसायात महत्वाचे निर्णय घेताना त्याच्या दीर्घकालीन परिणामांचा जरूर विचार करावा. उठवळपणा कामाचा नाही. उपवर मुलामुलींना मनपसंत स्थळाकडून होकार येईल. कृष्णजन्माष्टमी लाभकारक ठरेल. गणेशोत्सवात सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. देश विदेशात प्रवास योग संभवतो. घराची कागदपत्रे, वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे व्यवहार धीम्या गतीने पुढे सरकतील. तज्ज्ञ वकिलांचा सल्ला उपयोगी ठरेल.

मिथुन

सणवार, समारंभांनी नटलेला महिना उत्साह वाढवेल. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोठी खरेदी कराल. विद्यार्थी वर्गाच्या मेहनतीला उत्तम फळ मिळेल. संशोधन कार्य जोमाने पुढे जाईल. नोकरीच्या ठिकाणी हितशत्रूंचा त्रास वाढेल, पण त्यांना सडेतोड उत्तरे द्याल. काही ठिकाणी डोळे उघडे ठेवून तोंड बंद ठेवल्यास भरपूर लाभ होईल. विवाहोत्सुक मंडळींनी वधूवर संशोधन सुरू ठेवावे. विवाहितांचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. गुंतवणूक करताना अनावधानाने झालेली लहानशी चूक भारी पडेल. घर, प्रॉपर्टीचे व्यवहार पुढे सरकतील. कागदपत्रांची सखोल छाननी कराल. प्रवास करताना मौल्यवान वस्तू हरवणे वा विसरणे असे प्रकार घडतील. योग्य ती काळजी घ्यावी. जबाबदऱ्यांचा ताण न घेल्यास आरोग्य चांगले राहील.

कर्क

हा महिना खूप व्यग्रतेचा असेल. २ सप्टेंबरची कृष्ण जन्माष्टमी विशेष लाभदायक ठरेल. गणेशोत्सवाचे दिवस प्रचंड मेहनतीचे आणि जिकिरीचे असतील. विद्यार्थिवर्गाने अभ्यासावरील लक्ष ढळू देऊ नये. एकदा का एकाग्रता विचलित झाली, तर पुन्हा मनापासून अभ्यास करणे खूप कठीण जाईल. नोकरी-व्यवसायात हाताखालच्या लोकांना मदतीचा हात पुढे कराल. वेळप्रसंगी त्यांच्याकडून झालेल्या चुकांवर पांघरूण घालाल; परंतु याचा पुढे आपणास त्रास होईल हे ध्यानात असू द्या. विवाहोत्सुक मंडळींचे विवाह जुळतील. तोलामोलाची सोयरीक जुळेल. विवाहितांचे संतानप्राप्तीचे प्रयत्न सफल होतील. वैद्यकीय उपचार कामी येतील. जागा, मालमत्तेमधील गुंतवणूक लाभकारक ठरेल. दीर्घकालीन गुंतवणूक जबरदस्त परतावा देणारी ठरेल. प्रलोभनांपासून सावध राहा. व्यग्र दिनक्रमात तब्येतीकडे दुर्लक्ष होईल.

सिंह

जबाबदार्‍या आणि कर्तव्य यांचे एकत्रीकरण या महिन्यात असेल. या सगळ्यांचे ओझे न मानता उत्सवाचा आनंद लुटता आला पाहिजे. विद्यार्थ्यांना विशेष करून अभ्यास, परीक्षा आणि मुलाखतीची तयारी करणे भाग पडेल. नोकरी व्यवसायात देखील महत्त्वाच्या भेटीसाठी आणि चर्चा यांसाठी मुद्देसुद टिपण्णी तयार ठेवाल. आपल्या रूबाबावर व्यक्तिमत्वाला ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची झालर खुलून दिसेल. विवाहित मंडळी आपल्या जोडीदारावर छाप पडतील. कृष्णाष्टमी विशेष फलदायी ठरेल. गणेश चतुर्थीला आत्मविश्वास वाढेल. तर अनंत चतुर्दशीला केल्या कष्टाचे समाधान वाटेल. गुंतवणूकदारांना तंत्रज्ञानाची साथ मिळेल. मोठमोठ्या आकडेमोडी आणि रंगीत आलेखामध्ये हरवून जाऊ नका. दीर्घकालीन आणि शाश्वत गुंतवणूक कराल. आरोग्यदृष्ट्या हा महिना चांगला असला तरी सणवारांची दमणूक जाणवेल.

कन्या

सणवार, उत्सवांनी नटलेला हा महिना आपल्या हिताच्या गोष्टी घेऊन येईल. मनातील विचार कृतीत आणाल. विद्यार्थी वर्ग अभ्यासासोबत सामाजिक कार्य, कला क्षेत्र यातही हिरीरीने सहभागी होईल. नोकरी व्यवसायात बढतीचा योग आहे. गुरुचे पाठबळ चांगले असल्याने प्रयत्नांना यश मिळेल. उपवर मुलामुलींनी सुयोग्य जोडीदाराची निवड करावी. विवाहित दाम्पत्यांना एकमेकांचा सहवास सुखकर वाटेल. प्रवास योग येईल. भावंडे, नातेवाईक यांची मर्जी राखाल. गुंतवणूक करताना प्रलोभांना बळी पडू नका. अवास्तव परतावा म्हणजे फक्त पोकळ आश्वासन असते याची जाण ठेवा. घराच्या, जमिनीच्या निर्णयाबाबत एकत्रित चर्चा होईल. तब्येतीच्या तक्रारी लगेच दूर होतील.

तूळ

जबाबदारी आणि कर्तव्ये यांची सांगड घालण्यातच हा महिना चटकन पूर्ण होईल. एकापाठोपाठ एक कामाची यादी सुरू राहील. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात मन एकाग्र करणे क्रमप्राप्त आहे. अभ्यासाव्यतिरिक्त अनेक गोष्टींकडे लक्ष जाईल. कला, क्रीडा, साहित्य यात विशेष प्राविण्य मिळवाल. नोकरीमधील समस्या सोडवताना नवनवीन अनुभव येतील. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशाचे शिखर गाठाल. विवाहोत्सुक मंडळींना आपल्या आवडीनुसार जोडीदार मिळेल. गणेशोत्वाच्या कालावधीत लाभकारक घटना घडेल. विवाहित दाम्पत्यांचे सूर जुळतील. संतान प्राप्तीच्या प्रयत्नांना यश मिळेल. गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळेल. घर, जमीन स्थावर जंगम यात गुंतवणूक कराल. कामाची दगदग, ताणतणाव यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वरखाली होईल. वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील. व्यायाम, आहार व विश्रांती या त्रिसूत्रीचा अवलंब विशेष उपयुक्त ठरेल.

वृश्चिक

कृष्ण जन्माष्टमी या राशीसाठी विशेष महत्त्वाची ठरेल. मोठे निर्णय घेणे सोपे जाईल. विद्यार्थी वर्ग अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. ध्येयाकडे वाटचाल करतील. मेहनतीला यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी आपल्या स्पष्टवक्तेपणाची झलक दाखवू शकता. याचा अप्रत्यक्षपणे नक्कीच फायदा होईल. विवाहोत्सुक मंडळींचे नवे नाते जुळेल. जोडीदार ओळखीतला असण्याची शक्यता आहे. विवाहित दाम्पत्यांना कुटुंबसुख चांगले मिळेल. आपलेपणा वाढेल. नाती दृढ होतील. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्यातील कलागुणांना वाव मिळेल. गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळेल. सध्या तरी थोडक्यात समाधान मानावे. घराबाबतचे निर्णय घेताना तज्ज्ञांसह सल्ला-मसलत करावी. कामाचा आणि जबाबदाऱ्यांचा ताण जाणवेल. आपले छंद जोपासावेत. मन आनंदी राहील.

धनु

कृष्ण जन्माष्टमी आर्थिक लाभ देणारी आहे. तर गणेशोत्सव उत्साह आणि आनंद देणारा असेल. विद्यार्थी वर्ग सांस्कृतिक माध्यमातून आयोजन, नियोजन, तंत्रज्ञान यांचे प्रत्यक्ष धडे घेईल. अभ्यासावरील लक्ष ढळू देऊ नका. परदेशी शिक्षणाचे प्रयत्न सुरू ठेवा. नोकरी व्यवसायात नाविन्यपूर्ण संकल्पना अमलात आणाल. वरिष्ठांच्या सल्ल्याने हिरीरीने आगेकूच कराल. त्यांचा विश्वास सार्थ ठरवाल. विवाहित मंडळींच्या मागण्या पूर्ण होतील. सुख स्वप्ने आकार घेतील. गुंतवणूकदारांनी थोडा ब्रेक लावावा. अपेक्षित परतावा मिळण्यासाठी वाट बघावी लागेल. जमिनीच्या कागदपत्रांसाठी कोर्टाची मदत घ्यावी लागेल. व्यवहार पारदर्शक असावा. लघवीचे विकार सतावतील. ओटीपोटाचे दुखणे आटोक्यात ठेवावे.

मकर

कृष्ण जन्माष्टमी विशेष उत्साहवर्धक असेल. योजलेली कामे या महिन्यात मार्गी लागतील. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. अपेक्षित यश मिळेल. शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन मिळाल्याने विषयाची गोडी वाढेल. नोकरी-व्यवसायातील खाचाखोचा नेमक्या ओळखाल. राजकारणी चाल खेळाल. विवाहोत्सुकांना मनाजोगता जोडीदार मिळेल. ओळखीचे नात्यात रूपांतर होईल. विवाहित मंडळींना कौटुंबिक समस्या भेडसावतील. एक घाव दोन तुकडे न करता, डोकं शांत ठेवून निर्णय घ्यावा. गणेशोत्सवात संमिश्र मानसिकता असेल. गुंतवणुकीसाठी थोडी विश्रांती घ्यावी. तज्ज्ञांचा सल्ला उपयुक्त ठरेल. जमिनीच्या व्यवहारात काही अडचणी उदभवतील. कोर्टकचेरीचा आधार घ्यावा लागेल. यकृत व मूत्रपिंडाचे प्रश्न, समस्या निर्माण होतील.

कुंभ

कृष्ण जन्माष्टमीच्या सुमारास मानसिक स्थिती दोलायमान असेल. गणेशोत्सवात पुन्हा नवा उत्साह वाटेल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासाची ओढ वाटेल. विषयांचे आकलन चांगले होईल. शिक्षकांचे मार्गदर्शन मिळेल. नोकरी व्यवसायात मेहनत आणि चिकाटीचे फळ मिळेल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. विवाहोत्सुकांचा विवाह योग जुळून येईल. थोडी तडजोड केलीत तर सुयोग्य जोडीदारासह नाते जुळेल. विवाहितांच्या सहजीवनाची गाडी रुळावर येईल. वैचारिक मतभेद दूरच ठेवावेत. गुंतवणूकदारांचे भाग्य फळफळेल. पैशाने पैसा वाढेल. बक्कळ धनसंपत्ती कमवाल. घराचे आणि जमिनीचे व्यवहार करताना काही अडचणी येतील. तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रश्नांची उकल सापडेल. छाती भरून येणे, अपचन होणे असे त्रास दुर्लक्षित करू नका.

मीन

कामातील रस वाढल्याने उत्साह वाढेल. विद्यार्थी वर्गाला विषयाचे आकलन चांगले होईल. अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल. परीक्षा, मुलाखती, सादरीकरण यात बाजी माराल. स्वत:ला सिद्ध करून दाखवाल. कृष्ण जन्माष्टमीला आत्मविश्वास बळावेल. गणेशोत्सवात सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरी व्यवसायात महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण होतील. ओळखीचा फायदा होईल. गुरुबल चांगले आहे. विवाहोत्सुकांना आपल्या योग्यतेचा जोडीदार मिळेल. विवाहित दांपत्यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून जोडीदारासाठी वेळ राखून ठेवला पाहिजे. संतती सुख प्राप्त होईल. गुंतवणूकदारांना गुंतवणूकीचा भरघोस परतावा मिळेल. घराबाबतचे कामकाज पुढे जाईल. वेळ, ऊर्जा आणि पैसा अनाठायी खर्च होण्याची शक्यता दिसते. कामाच्या व्यापात स्वतःकडे दुर्लक्ष कराल. परिणामी छाती भरून येईल. काळजी घ्यावी.