Shadashtak Yog: गुरु ग्रह ३१ ऑक्टोबर रोजी कर्क राशीतून बाहेर पडून सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. सध्या गुरु अतिचारी गतीने (वेगाने) भ्रमण करत आहेत. गुरु राशी बदलताच गुरु आणि शनी यांच्यामध्ये षडाष्टक योग तयार होईल. या योगात शनी ग्रह गुरुच्या अष्टम भावात असतील, तर गुरु शनीच्या सहाव्या भावात असतील. या योगाचा नकारात्मक परिणाम कोणत्या राशींवर होऊ शकतो आणि त्यासाठी कोणते उपाय करावेत, ते जाणून घेऊया.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी षडाष्टक योगामुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात. या काळात गुरु तुमच्या त्रिक भावांपैकी द्वादश भावात असतील, तर शनी सप्तम भावात भ्रमण करतील. त्यामुळे पैशांचे व्यवहार खूप विचार करून करा, अन्यथा पैसे अडकू शकतात.
विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होऊ शकते. त्यामुळे योग आणि ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो. नोकरी करणाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नये. उपाय म्हणून भगवान विष्णूची पूजा करावी.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीचा स्वामी शनी असला तरी गुरु आणि शनीचा षडाष्टक योग तुमच्यासाठी शुभ मानला जात नाही. या काळात कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीतही चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांनी चुकीच्या संगतीपासून दूर राहावे, अन्यथा वेळ वाया जाऊ शकतो. आरोग्याची विशेष काळजी घ्या. बाहेरचे तळलेले आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतो. उपाय म्हणून भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करावा.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी गुरु आणि शनीचा षडाष्टक योग आर्थिकदृष्ट्या अनुकूल मानला जात नाही. अचानक येणाऱ्या काही खर्चांमुळे तुमचे बजेट बिघडू शकते. या काळात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा. विद्यार्थ्यांनी शिक्षणात चांगले यश मिळवण्यासाठी गुरुजनांचे मार्गदर्शन घ्यावे. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांनी कागदपत्रांची कामे काळजीपूर्वक करावीत. घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी वाद घालणे टाळावे. उपाय म्हणून केळी, पिवळी डाळ आणि पिवळ्या रंगाचे कपडे दान करावेत.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्यातिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
