Shani Asta: नवग्रहांमध्ये न्यायदेव मानला जाणारा शनी हा खूप प्रभावी ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार शनी साधारण अडीच वर्षे एका राशीत राहतो आणि सुमारे ३० वर्षांनंतर पुन्हा त्याच राशीत येतो. त्यामुळे १२ही राशींवर त्याचा परिणाम बराच काळ टिकतो.
सध्या शनी गुरूच्या मीन राशीत आहे आणि तो २ जून २०२७ पर्यंत याच राशीत राहणार आहे. या काळात शनी वक्री, मार्गी, अस्त आणि उदित होईल. तसेच १३ मार्चला शनी मीन राशीत अस्त होणार आहे.
शनी अस्त झाल्याचा परिणाम सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो. मात्र, या काळात तीन राशींच्या लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. हे विश्लेषण चंद्रराशीवर आधारित आहे. चला जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…
द्रिक पंचांगानुसार, शनी १३ मार्च २०२६ रोजी, शुक्रवार संध्याकाळी ७:१३ वाजता मीन राशीत अस्त होणार आहे. सुमारे ४० दिवस अस्त राहिल्यानंतर, २२ एप्रिल २०२६ रोजी, बुधवार पहाटे ४:४९ वाजता तो पुन्हा उदित होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनी अस्त झाल्यामुळे त्याचे काही कठोर परिणाम कमी होऊ शकतात.
मेष राशी (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी मीन राशीत शनी अस्त होणं अनेक बाबतीत महत्त्वाचं ठरू शकतं. तुमच्या गोचर कुंडलीतील बाराव्या भावात शनी अस्त होणार आहे. तसेच या राशीत साडेसातीचा पहिला टप्पाही सुरू आहे.
अशा परिस्थितीत शनी अस्त झाल्यामुळे त्याचे काही कठोर परिणाम कमी होऊ शकतात. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवता येईल आणि आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा दिसू शकते. जुने आरोग्याचे त्रास कमी होण्याची शक्यता आहे.
शनिदेवाच्या कृपेने परदेश प्रवासाची किंवा परदेशाशी संबंधित संधी मिळू शकते. तुमच्या अनेक जुन्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. परदेशातून पैसे मिळण्याचे संकेत आहेत. तसेच परदेशात नोकरी किंवा करिअर करण्याचं स्वप्नही पूर्ण होऊ शकतं.
साडेसातीमुळे आयुष्यात ज्या अडचणी येत होत्या, त्या कमी होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही संयम आणि मेहनत कायम ठेवली, तर नक्कीच यश मिळू शकते. तुमच्या विचारसरणीत आणि काम करण्याच्या पद्धतीतही सकारात्मक बदल दिसून येऊ शकतो.
नोकरी करणाऱ्या लोकांनी कामाच्या ठिकाणी उगाच वादविवाद आणि निरर्थक चर्चांपासून दूर राहून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावं. तसेच शत्रूंपासून सावध राहणंही गरजेचं आहे.
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
या राशीच्या लोकांसाठी शनी अस्त होणं अनेक क्षेत्रांत फायदेशीर ठरू शकतं. बराच काळ रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. या राशीच्या पाचव्या भावात शनी अस्त होणार आहे.
यामुळे आत्मविश्वास आणि धैर्य वाढू शकतं. खूप दिवसांपासून थांबलेली कामं पुन्हा सुरू होऊ शकतात. कामाच्या निमित्ताने प्रवासही करावा लागू शकतो. कार्यक्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळू शकतात. बढती मिळण्याची किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचीही शक्यता आहे.
मात्र मुलांच्या बाबतीत थोडी चिंता वाटू शकते. शिक्षणाच्या क्षेत्रात काही नकारात्मक परिणाम दिसू शकतात. त्यामुळे आधीपेक्षा जास्त मेहनत करणं फायदेशीर ठरेल. तसेच उगाच होणाऱ्या खर्चामुळेही त्रास होऊ शकतो.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
या राशीच्या लोकांसाठी शनी अस्त होणं फायदेशीर ठरू शकतं. या राशीच्या दुसऱ्या भावात शनी अस्त होणार आहे. तसेच या राशीत शनीची साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे.
अशा वेळी या राशीच्या लोकांना अनेक प्रकारचे फायदे मिळण्याचे योग आहेत. उत्पन्नाचे नवे स्रोत सुरू होऊ शकतात. मात्र, उगाच होणाऱ्या खर्चामुळे त्रास होऊ शकतो.
नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळू शकतं. तुमच्या कामामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खूश होऊ शकतात. मालमत्ता खरेदी-विक्रीतून फायदा होऊ शकतो. तसेच वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मात्र शनी अस्त झाल्यामुळे बोलण्यात कडकपणा येऊ शकतो. त्यामुळे काहीही बोलताना नीट विचार करून बोला, नाहीतर तुमचंच नुकसान होऊ शकतं. तसेच कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. पैसेही विचारपूर्वक खर्च करा.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)

