-सोनल चितळे

March Monthly Horoscope Lucky Zodiac Signs: मार्चमध्ये ४ ग्रहांच्या हालचालीत काही बदल होणार आहे. त्यानुसार मंगळ ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार तर शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. शिवाय १५ मार्चला सूर्यदेव मीन राशीत गोचर करणार असून दुसऱ्याच दिवशी बुध मीन राशीत प्रवेश करणार आहे. याशिवाय यंदाच्या वर्षातील पहिला शनी नक्षत्र बदल सुद्धा १५ मार्चला होणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार या महिन्यात होळी, चैत्र नवरात्री, गुढीपाडवा असे शुभ योग सुद्धा घडून येत आहेत. ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे यांच्या माहितीनुसार येत्या मार्च महिन्यातील ३१ दिवसात १२ राशींपैकी कोणाला धनलाभाचे योग आहेत व कोणाला काय काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊयात..

मार्च महिन्याचे १२ राशींचे भविष्य (March Monthly Horoscope)

मेष (Aries Zodiac)

व्यवसाय, उद्योगात कोणालाही शब्द देताना विचारपूर्वक द्यावा. न झेपणारे वायदे करू नका. ताण तणाव वाढेल. तृतीय स्थानातील मंगळाचे भ्रमण आत्मविश्वास वाढवेल. कोणत्याही चुकीच्या मार्गाचा वापर मात्र करू नका. मेष राशीतील शुक्र प्रलोभनांना बळी पाडू शकतो. सावधान!, अभ्यासावर लक्ष ठेवा. पचन सांभाळा. हवामानातील बदलाचा परिमाण आरोग्यावर दिसून येईल. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवावे. कामाच्या ठिकाणी नव्या संकल्पना आणण्याचा विचार कराल.

Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : २४ तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब, एका महिन्यात मिळणार भरघोस पैसा अन् यश
April 2024 Monthly Horoscope in Marathi
३० एप्रिलपर्यंत सोन्याचे दिन; १२ राशींपैकी कुणासाठी गुढीपाडवा ठरेल गोड व कुणाला लाभेल रामनवमी? वाचा राशी भविष्य
28 March Panchang Sankashti Chaturthi Mesh To Meen
आज संकष्टी चतुर्थीला मेष ते मीनपैकी कुणाच्या कुंडलीत मोदक पेढ्यांचा गोडवा? बाप्पा वर देणार की दंड, वाचा

वृषभ (Taurus Zodiac)

आपला राशी स्वामी शुक्र राहू आणि हर्षलसह भ्रमण करणार आहे. संगतीच्या दोषानुसार चुकीचा मार्ग स्वीकारावा असे प्रलोभन पडेल. परंतु विवेकबुद्धी जागरूक ठेवावी. वागण्या बोलण्यात कठोर शब्द टाळावेत. जोडीदारासह जुळवून घ्यावे. विद्यार्थीवर्गाने मन लावून केलेल्या अभ्यासाचे चीज होईल. गुरुची साथ चांगली मिळत आहे. परेदशासंबंधीत कामे मार्गी लागतील. भावंडांची मदत मिळेल. नोकरी व्यवसायात कनिष्ठ वर्गाची महत्त्वाची कामगिरी पूर्णत्वास जाईल. यशाकडे वाटचाल कराल.

मिथुन (Gemini Zodiac)

मंगळ मिथुन राशीत प्रवेश करत आहे. बुद्धीमत्तेचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करावा. वाईट आणि चुकीच्या विचारांना वेळीच अटकाव करावा. विद्यार्थ्यांना गुरुजनांचा सल्ला, मार्गदर्शन कामी येईल. नोकरी, व्यवसायात बुध, गुरूच्या शुभ योगामुळे कामाला गती येईल. वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. जोडीदाराच्या कामाची समाजात वाहवा होईल. मुलाबाळांच्या उत्कर्षाच्या वार्ता समजतील. कामानिमित्त प्रवास कराल. राहू हर्षलसह शुक्राचे भ्रमण अनपेक्षित लाभ देणारे असेल. वातावरणातील बदलांमुळे श्वसनाचा त्रास संभवतो.

कर्क (Cancer Zodiac)

अष्टमतील रवी , शनीचे भ्रमण संभ्रम निर्माण करेल. निर्णय घेताना तारांबळ उडेल. भाग्यातील गुरू, शुक्र बलवान आहेत. त्यांच्या साहाय्याने मोठी मजल माराल. जोडीदाराला अडचणींचा सामना करावा लागेल. एकमेकांना समजून घेणे आवश्यक ! संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करावेत. नोकरी व्यवसायासाठी प्रवास कराल. परदेशासंबंधीत कामे मार्गी लागतील. कामाचा बोजा वाढेल. विद्यार्थी वर्गाने खचून जाऊ नये. धीर धरा. परीक्षा आता जवळ येत आहे. साथीजन्य आजारांपासून सावधगिरी बाळगा.

सिंह (Leo Zodiac)

अष्टम स्थानातील रवी, गुरू, शुक्र मेहनतीचा योग्य मोबदला देण्यास असमर्थ ठरतील. त्यामुळे अधिकाधिक मेहनत आणि सातत्य फार गरजेचे ठरेल. रात्र आहे वैऱ्याची, जागा रहा. सप्तमातील शनी, बुध आणि तृतीयेतील मंगळ या परिस्थितीवर मात करू शकतील. आधीपासूनच कामाचे वा अभ्यासाचे नियोजन केलेत तरच अडचणींतून सहीसलामत बाहेर पडाल. ऐन वेळची धावपळ कामी येणार नाही. जोडीदारासह मिळते जुळते घ्याल. झटपट श्रीमंतीचा मोह टाळा.

कन्या (Virgo Zodiac)

शुक्राचे सप्तम आणि अष्टम स्थानातील भ्रमण आर्थिक दृष्ट्या संमिश्र फळ देईल. खर्चावर नियंत्रण ठेवलेत आणि पैसा योग्यप्रकारे गुंतवलात तरच लाभदायक ठरेल. अन्यथा कमावलेल्या पैशाला हजार वाटा फुटतील. नोकरी व्यवसायात आपले स्पष्ट मत खूप उपयोगी ठरेल. मोठ्या व्यक्तींना प्रभावित कराल. विद्यार्थी वर्गाने धीर सोडू नये. गुरुचे पाठबळ चांगले आहे. आत्मविश्वासाने पुढे जा. जोडीदाराच्या कामाचे कौतुक होईल. विवाहोत्सुक मंडळींना विवाह जमण्यास ग्रहबल चांगले आहे.

तूळ (Libra Zodiac)

बुध शनीच्या प्रभावाने नव्या जबाबदाऱ्या उत्तम रित्या पार पाडाल. आयोजन, नियोजन चांगले कराल. विद्यार्थी वर्गाला ग्रहांचे पाठबळ चांगले मिळेल. षष्ठ आणि सप्तम स्थानातून या महिन्यातील शुक्राचे भ्रमण आत्मविश्वास वाढवेल. पण तो गरजेपेक्षा जास्त वाढू देऊ नका. नाहीतर हातातील संधी निसटून जाईल. जोडीदाराच्या अपेक्षा वाढतील. संवादात्मक चर्चा करणे गरजेचे ठरेल. गुंतवणूकदारांनी प्रलोभनांना बळी पडू नये. आर्थिक चढ उतार होतील. अपचनाच्या तक्रारी वाढतील.

वृश्चिक (Scorpio Zodiac)

महिन्याच्या मध्यापर्यंत चतुर्थातील शनिसह रवीदेखील भ्रमण करत असेल. कौटुंबिक वाद विकोपाला जाऊ देऊ नका. बुधाच्या साथीने पर्यायी मार्ग निवडून गृहशांती कायम ठेवावी. विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक विषयांसोबत कलात्मक गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. राहू हर्षलसह शुक्र मेष राशीत प्रवेश करत आहे. चहू बाजूंनी प्रलोभने आपल्याला विळख्यात घेऊ पाहतील. वेळीच सावध व्हा. क्षणिक सुखापेक्षा कायम स्वरूपी आनंद मिळावा. उत्सर्जन संस्थे बिघाडाची शक्यता.

धनु (Sagittarius Zodiac)

मनाची चंचलता वाढेल. ताण वाढेल. शांत डोक्याने विचार करून मगच निर्णय घ्यावा. गुरुची साथ चांगली आहे. विद्यार्थी वर्गाचे चित्त विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी असतील. या सगळ्या गर्दीतून आपल्याला आपल्याच वाटेवरून निर्धाराने पुढे जायचे आहे हे ध्यानात असू द्या. नोकरी व्यवसायात आपल्या हुशारीचे आणि कष्टाचे चीज होईल. जोडीदारासह तत्वासाठी वाद होतील. त्यात कटुता नसेल. प्रेमसंबंधात डोळसपणे वागा. प्रलोभनांना बळी पडू नका. डोकेदुखीचा आणि पित्ताचा त्रास वाढेल.

मकर (Capricorn Zodiac)

विद्यार्थी वर्गाला परीक्षेच्या दृष्टीने खूप चांगले ग्रहमान आहे. कष्टाचे चीज होईल. गुरुजनांचे मार्गदर्शन लाख मोलाचे ठरेल. नोकरी व्यवसायात कामानिमित्त प्रवास कराल. नवे करार लाभकारक ठरतील. राहू हर्षलसह शुक्राचे भ्रमण धोक्याची सूचना देणारे आहे. वेळीच सावध व्हावे. प्रलोभनांपासून दूर राहा. जोडीदाराच्या कामकाजात उनत्ती होईल. गुंतवणूकदारांसाठी अभ्यासपूर्वक पैसे गुंतवणे अपेक्षित आहे. मान, गळा आणि थायरॉईड ग्रंथीच्या संबंधीत प्रश्न उदभवेल. वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील.

कुंभ (Aquarius Zodiac)

द्वितीय स्थानातील ग्रहस्थितीचा आपल्या वक्तृत्वावर खूप चांगला परिमाण होईल. शब्दाचे वजन वाढेल. पैसा, प्रसिद्धी मिळेल. नोकरीतील सादरीकरण अत्यंत प्रभावी ठरेल. व्यवसायाच्या निमित्ताने नव्या ओळखी वाढतील. व्यवसायात वाढ होईल. विद्यार्थी वर्गाला वेळेचे गणित नव्याने बसवावे लागेल. बुद्धिमत्तेसह व्यवहारज्ञानाचा उपयोग केल्यास अधिक लाभदायक ठरेल. ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी संगीत, कला यांचा आधार घ्यावा.

हे ही वाचा<< “उद्याची शिवसेना निर्माण होईल पण उद्धव ठाकरेंची कुंडली दोन वर्ष…” ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्तेंची मोठी भविष्यवाणी

मीन (Pisces Zodiac)

द्वितीय स्थानातील राहू हर्षलसह शुक्राचे भ्रमण धोकादायक ठरेल. आर्थिक उलाढाल करू नका. कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्यासाठी शब्द जपून वापरावेत. नोकरीच्या ठिकाणी रवी, गुरू साहाय्यकारी ठरतील. विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. विद्यार्थी वर्गाला शनी, बुधाच्या मदतीने अभ्यासात विशेष प्रगती साधता येईल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. विवाहोत्सुक मंडळींना सुयोग्य जोडीदार मिळेल. रोगप्रतिकारशक्ती वाढवावी लागेल. उन्हाचा त्रास वाढेल.