Shani Nakshatra Gochar 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना कर्मफलदाता आणि न्यायाची देवता मानले जाते. व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देणारा हा ग्रह जेव्हा राशी किंवा नक्षत्र बदलतो, तेव्हा त्याचा प्रभाव सर्व १२ राशींच्या व्यक्तींवर वेगवेगळ्या स्वरूपात जाणवू शकतो, असे ज्योतिषशास्त्र सांगते. आता ऑक्टोबर महिन्यात शनिदेवांच्या नक्षत्रातील बदलामुळे पुन्हा एकदा काही राशींच्या व्यक्तींच्या जीवनात महत्त्वाचे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

द्रिक पंचांगानुसार, सध्या शनिदेव रेवती नक्षत्रात आहेत. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजून २८ मिनिटांनी ते उत्तराभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करतील, असे मानले जाते. विशेष म्हणजे या नक्षत्राचे स्वामी स्वतः शनिदेव आहेत. त्यामुळे हा नक्षत्र गोचर ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या विशेष मानला जातो.

वर्षअखेरपर्यंत म्हणजेच जवळपास ८३ दिवस हा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. या काळात काही राशींच्या व्यक्तींना आर्थिक स्थितीत सुधारणा, कामाच्या ठिकाणी नवीन संधी, व्यवसायात प्रगती किंवा रखडलेली कामे मार्गी लागण्याचे संकेत मिळू शकतात. मात्र, हे ज्योतिषीय अंदाज असून, त्याकडे निश्चित भविष्यवाणी म्हणून पाहू नये. या काळात कोणत्या पाच राशींच्या व्यक्तींना कोणत्या प्रकारचे बदल अनुभवायला मिळू शकतात ते आता पाहूया…

वृषभ

गेल्या काही काळापासून आर्थिक गणित बिघडले असेल किंवा एखादे महत्त्वाचे काम सतत पुढे ढकलले जात असेल, तर परिस्थिती हळूहळू बदलण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे एखादे अतिरिक्त साधन निर्माण होऊ शकते. रखडलेले पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असून, कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढण्यासोबतच मान-सन्मानही मिळू शकतो. कुटुंबातील वातावरणात सकारात्मक बदल जाणवू शकतात. योग्य नियोजन केल्यास बचतीकडेही लक्ष देता येण्याची शक्यता आहे.

मिथुन

नवीन संधींच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन पर्याय मिळण्याची शक्यता असून, व्यवसाय करणाऱ्यांना एखादा रखडलेला व्यवहार पूर्ण होण्याची संधी मिळू शकते. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची भेट किंवा मिळालेले मार्गदर्शन पुढील काळासाठी फायदेशीर ठरू शकते. मेहनतीला योग्य दिशा मिळाल्यास प्रगतीची दारे उघडण्याची शक्यता आहे.

कन्या

दीर्घकाळापासून सुरू असलेल्या धावपळीतून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यास अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकते. स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना मेहनतीचे सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्याच्या संधी वाढू शकतात. एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने पावले पडू शकतात. आर्थिक बाबतीतही परिस्थिती हळूहळू स्थिर होण्याची शक्यता आहे.

तूळ

छोट्या प्रयत्नांचे भविष्यात मोठे परिणाम मिळू शकतात, असा ज्योतिषीय संकेत या काळासाठी दिला जातो. कार्यक्षेत्रात केलेल्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते आणि वरिष्ठांकडून कौतुक किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एखादी संधी समोर येऊ शकते. व्यवसायात नवीन ग्राहक किंवा व्यवहार मिळण्याची शक्यता असून, आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. सामाजिक वर्तुळात मान-सन्मान वाढण्याचीही शक्यता आहे.

मकर

शनिदेव हे या राशीचे स्वामी असल्याने या नक्षत्र परिवर्तनाचा विशेष उल्लेख केला जातो. दीर्घकाळापासून मनात असलेली एखादी योजना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळू शकते. परदेश प्रवास, परदेशाशी संबंधित काम किंवा व्यवसायाच्या दृष्टीने नवीन मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये बदल किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नफा वाढवण्याची संधी मिळू शकते. आर्थिक लाभासोबतच प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. मात्र, या काळात कामाचा ताण वाढू नये यासाठी दैनंदिन जीवनशैलीकडेही लक्ष देणे महत्त्वाचे ठरू शकते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)