Shani Transit Benefits: फ्यूचर पंचांगनुसार सुमारे ३० वर्षांनंतर न्यायाधीश शनीदेव १७ मे रोजी रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार रेवती नक्षत्राचे स्वामी बुधदेव आहेत. बुध आणि शनीदेव यांच्यात मैत्रीचे नाते आहे. त्यामुळे शनीचा हा बदल अनेक राशींच्या जीवनात महत्त्वाचे परिवर्तन घडवू शकतो. विशेषतः मिथुन, कन्या आणि मकर राशीच्या लोकांसाठी हा गोचर करिअर, नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकतो.
शनीला कर्म, शिस्त आणि न्यायाचा कारक मानले जाते, तर बुध हा बुद्धी, वाणी, व्यापार आणि संवादाचा ग्रह आहे. जेव्हा शनी बुधाच्या नक्षत्रात येतो, तेव्हा योजना, मेहनत आणि योग्य रणनीतीचे फळ मिळण्याची शक्यता वाढते. चला जाणून घेऊया, याचा या तीन राशींवर काय परिणाम होऊ शकतो.
ज्योतिषात रेवती नक्षत्राचे महत्त्व
वैदिक ज्योतिषानुसार रेवती हे २७वे आणि शेवटचे नक्षत्र मानले जाते. ते मीन राशीच्या शेवटच्या टप्प्यात असते आणि जीवनाची पूर्णता, समाप्ती व नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. या नक्षत्राचा स्वामी ग्रह बुध आहे, जो बुद्धी, वाणी, संवाद आणि तर्कशक्ती दर्शवतो. रेवती नक्षत्राचे अधिष्ठाता देवता पुषण आहेत, ज्यांना प्रवाशांचे रक्षक आणि मार्गदर्शक देव मानले जाते. याचे प्रतीक चिन्ह मासा आहे, जो संवेदनशीलता, प्रवाह आणि आध्यात्मिक खोलपणा दर्शवतो.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
तुमच्यासाठी शनीदेवांचे नक्षत्र परिवर्तन फायदेशीर ठरू शकते. कारण मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे करिअरमध्ये बर्याच दिवसांपासून येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. तसेच नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात किंवा सध्याच्या कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे.
जे लोक मीडिया, लेखन, मार्केटिंग, आयटी किंवा कम्युनिकेशन क्षेत्रात काम करतात, त्यांना विशेष फायदा होऊ शकतो. व्यापाऱ्यांसाठी नवीन ओळखी आणि नवीन प्रोजेक्ट मिळण्याचे संकेत आहेत.
कन्या राशी (Virgo Horoscope)
शनीदेवांचे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकते, कारण कन्या ही देखील बुधाचीच राशी आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या लोकांच्या कामाचे कौतुक होऊ शकते. तसेच बर्याच दिवसांपासून प्रमोशन किंवा बदलीची वाट पाहणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते.
तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अनुकूल असू शकतो. मात्र या काळात मेहनत करावी लागेल, तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळेल.
मकर राशी (Capricorn Horoscope)
तुमच्यासाठी शनीदेवांचे नक्षत्र परिवर्तन फायदेशीर ठरू शकते, कारण मकर राशीचा स्वामी स्वतः शनी आहे. त्यामुळे करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तसेच या काळात सरकारी क्षेत्र किंवा प्रशासकीय सेवांमध्ये काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो.
याच काळात व्यवसाय वाढवण्याच्या संधीही मिळू शकतात. मात्र कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल. तरीही या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तसेच देश-विदेश प्रवासाचीही संधी मिळू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
