Shani Sade Sati 2027: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी हा कर्म, न्याय, शिस्त आणि जबाबदारीचा ग्रह मानला जातो. शनीची साडेसाती हा असा कालावधी आहे, ज्याबद्दल अनेकांच्या मनात भीती, उत्सुकता आणि संभ्रम असतो. एखाद्या व्यक्तीच्या जन्मराशीच्या आधी, त्या राशीत आणि त्यानंतरच्या राशीत शनीचा प्रवास होत असताना साधारण साडेसात वर्षांचा हा कालखंड तयार होतो. यालाच साडेसाती असे म्हटले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार साडेसातीचे तीन टप्पे मानले जातात. पहिला टप्पा उदय, दुसरा शिखर आणि तिसरा अस्त टप्पा म्हणून ओळखला जातो. यापैकी शिखर टप्पा सर्वाधिक प्रभावी मानला जातो. अर्थात, हे सर्व ज्योतिषशास्त्रीय समजुतींवर आधारित असून प्रत्येक व्यक्तीवर त्याचा परिणाम वेगळा असू शकतो.
सध्या मीन राशीवर शनीच्या साडेसातीचा शिखर टप्पा सुरू असल्याची चर्चा ज्योतिष वर्तुळात होत आहे, त्यामुळे या काळात आर्थिक निर्णय, करिअर, आरोग्य आणि कौटुंबिक बाबतीत अधिक सावध राहण्याचा सल्ला काही ज्योतिष अभ्यासकांकडून दिला जातो.
या कालावधीत काही लोकांना कामांमध्ये विलंब जाणवू शकतो. अनेकदा प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळण्यास वेळ लागू शकतो. नोकरीत जबाबदाऱ्या वाढणे, व्यवसायात नियोजनाची गरज भासणे, खर्च वाढणे किंवा मानसिक तणाव जाणवणे अशा शक्यता काही ज्योतिष तज्ज्ञ व्यक्त करतात. मात्र, हे परिणाम प्रत्येकासाठी सारखेच असतील असे नाही.
विशेष म्हणजे, हा टप्पा कायमस्वरूपी नसतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा प्रत्येक गोचर व्यक्तीला काही महत्त्वाचे धडे शिकवतो. संयम, शिस्त, मेहनत आणि जबाबदारी या गुणांची परीक्षा घेणारा काळ म्हणूनही त्याकडे पाहिले जाते.
दरम्यान, २०२७ हे वर्ष शनीच्या गोचरामुळे विशेष चर्चेत येऊ लागले आहे. कारण जून २०२७ नंतर साडेसातीच्या शिखर टप्प्याचे केंद्र बदलणार असल्याचे ज्योतिष गणित सांगते, त्यामुळे सध्या ज्या राशीवर हा प्रभाव असल्याचे मानले जाते, त्या राशीसाठी काहीसा दिलासा मिळू शकतो. पण, त्याचवेळी दुसऱ्या एका राशीसाठी नव्या आव्हानांची सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार ही रास स्वभावाने धाडसी, उत्साही आणि वेगाने निर्णय घेणारी मानली जाते. मात्र, शनीचा प्रभाव वाढल्यास घाईघाईने घेतलेले निर्णय, राग, मतभेद किंवा कामातील अडथळे यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज भासू शकते, अशी मान्यता आहे.
म्हणूनच अनेकांच्या मनात आता एकच प्रश्न आहे – २०२७ नंतर नेमकी कोणती रास शनीच्या साडेसातीच्या शिखर टप्प्यात प्रवेश करणार?
ज्योतिषशास्त्रीय गणनांनुसार ३ जून २०२७ पासून मेष राशीवर शनीच्या साडेसातीचा शिखर टप्पा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते, त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी आगामी काळात संयम, नियोजन आणि सावधगिरी यांना अधिक महत्त्व देणे उपयुक्त ठरू शकते, असे काही ज्योतिष अभ्यासकांचे मत आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
