scorecardresearch

‘भारत जोडो’ नंतरही राहुल गांधी का ठरतील अपयशी राजपुत्र? ज्योतिषतज्ज्ञांनी मांडली कुंडली..

Rahul Gandhi Future Predictions: २००४ ला राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करून सुद्धा आपले एक स्वतंत्र स्थान त्यांना अद्याप निर्माण करता आलेले नाही, कारण..

Shani Transit In Rahul Gandhi Kundali can Make Him Loose in 2024 Astrology Expert Predicts Future After Bharat Jodo Yatra Ends
राहुल गांधी ठरतील एक अपयशी राजपुत्र? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

-उदयराज साने

Rahul Gandhi Astrology: जगात असेही काही लोक असतात की जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच जन्माला येतात. त्यातीलच एक नाव राहुल गांधी यांचे आहे. ज्या घरात जन्म घेतला, त्या घराने देशाला तीन पंतप्रधान दिले. राहुल गांधींचा राजकीय प्रवास २००४ पासून सुरू झाला व अमेठीमध्ये सर्वप्रथम ते लोकसभेत खासदार झाले. त्यांच्या कुंडलीचा विचार करता, असे दिसून येते की राजयोग कुंडलीत असला तरी, ज्या ग्रहांमुळे तो योग फलद्रुप होतो, त्यांच्या दशा जीवनात प्रमुख वर्षात किंवा उमेदीच्या काळात येत नसल्याने त्यांच्या कोणत्याही प्रयत्नांना म्हणावे तसे यश आजवर लाभलेले नाही.

राहुल गांधी यांच्या कुंडलीतील ग्रहस्थिती

‘राहू-हर्षल’ या ग्रहांचे षडाष्टक त्यांच्या मूळ कुंडलीत आहे. तसेच ‘चंद्र-प्लुटो’ या ग्रहांचा केंद्रयोग आहे आणि हा योग जीवनातील प्रत्येक क्षेत्रात घसरगुंडी करतो. प्लुटोचे मकर राशीतील भ्रमण त्यांच्या तूळ लग्नाच्या कुंडलीत चतुर्थस्थानातून होत असल्याने, लग्नबिंदू व मूळ कुंडलीतील राजयोगकारक गुरु जो राश्याधिपती आहे ह्यांच्या केंद्रयोगात राहणार असल्याने, तूळ राशीतील गुरुची शक्ती कमी करणारा आहे. राहूचे भ्रमण मेष राशीतून सुरू असून मूळ कुंडलीतील हर्षल हा मेषेच्या राहूच्या षडाष्टकात येत असल्याने, त्यांच्या लहरी स्वभावाचा परिचय जनतेला तीव्रतेने होणार आहे.

एप्रिल २०२३ पर्यंत हे राहूचे गोचर भ्रमण व मूळ कुंडलीतील हर्षल यांचे षडाष्टक सुरू राहणार असल्याने राजकीय पटलावर यापासून पक्षाला खूप फायदा झाला असे दिसणार नाही. या ग्रह स्थितीचा परिणाम म्हणून याला भारत जोडो यात्रा सध्या हिमाचल प्रदेशातून काश्मिरात दाखल झाली पण त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. याला आणखी एक ग्रहयोग कारणीभूत ठरणार आहे, तो म्हणजे मूळ कुंडलीतील ‘राहू-शुक्र’ षडाष्टक त्यामुळेच आणखी दोन महिने त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

सोनिया गांधी यांच्या प्रकृतीला जपावे..

१७ जानेवारी २०२३ ला शनिचे कुंभ राशीत आगमन झाले व गोचर गुरू मीन राशीतून पुढे जात आहे. २१ एप्रिल २०२३ ला गोचर गुरु मेष राशीत येणार आहे. या ग्रह स्थितीमुळे त्रिपुरा-मेघालय-नागालँड मध्ये काँग्रेस कोणतीही भरीव कामगिरी करू शकणार नाही. सद्यस्थितीत जरी ते पक्षाचे अध्यक्ष नसले तरी या निवडणूक प्रक्रियेत त्यांचा सहभाग तसा नगण्यच ठरणार आहे. २०२३ मधील राहू-प्लुटो हा केंद्रयोग जून ते नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. राहुल गांधींच्या कुंडलीत हा चतुर्थ व सप्तम स्थानातून होत असल्याने, सोनिया गांधी यांनी प्रकृतीस जपावे, असे संकेत यातून मिळत आहेत.

कदाचित या प्रकृती अस्वास्थ्यामुळेच सोनियांना देशाच्या राजकारणात फार सक्रिय होता येणार नाही. यातील काही राज्यातून ते स्वतः लक्ष देऊ शकतात, पण त्याचा कालावधी हा कमीच राहणार आहे. या सर्वात काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांचा कस लागणार असून, पक्षफूटीचे ग्रहण सध्या जे पक्षाला लागलेले आहे, यातून कसा मार्ग काढायचा यावरच विचारविमर्श करावा लागणार आहे.

भारताची सध्याची परिस्थिती व त्यातून देशाला कशाप्रकारे यातून बाहेर काढू शकतो याबद्दल कोणताही नवा उपाय अथवा नवी कल्पना किंवा आराखडा राहुल गांधी यांच्या जवळ नाही. राजकारणात केवळ टीका करून भागत नाही तर जनतेला पर्याय द्यावा लागतो. असा पर्याय सध्या तरी राहुल गांधी यांच्याकडे नसल्याने जनता त्यांच्यापासून थोडी दूर असल्याचे दिसून येते. त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या सर्व निवडणुकांत वाट्याला पराभवच आलेला आहे. यामुळेच त्यांच्या राजयोगकारक ग्रहांना, पाप ग्रहांच्या ग्रहयोगांनी करकचून बांधल्यासारखी त्यांची अवस्था झाली आहे. कदाचित त्यामुळेच त्यांना चांगले मार्गदर्शक अथवा राजकीय गुरु लाभले नाहीत. त्यांच्या घरातील स्वर्गीय इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्वतःची प्रतिभा होती व यामुळेच त्यांचे फारसे काही कधीच अडले नाही, पण राहुल गांधी यांच्या कुंडलीतील बुध-राहू केंद्र योग आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांना कुठे आणि कसे कैचीत पकडायचे याबद्दलचा कोणताही आराखडा त्यांच्याजवळ नसतो.

हे ही वाचा<< २१ एप्रिलपासून मोदींच्या कुंडलीत कष्टी दिन! ज्योतिषतज्ज्ञ म्हणतात “२०२४ ला सत्ता टिकवण्यासाठी मुस्लिमच..”

भारत जोडोला यश पण राहुल गांधी..

सध्या भारत जोडोच्या माध्यमातून जनतेला सामोरे जाण्यात त्यांना काही प्रमाणात यश आले असले तरी, प्रत्येक राज्याचे, प्रदेशाचे व तेथील स्थानिक लोकांचे महत्त्वाचे प्रश्न असतात आणि अशा सर्व प्रश्नांची जाणीव होण्यास यानिमित्ताने सुरुवात झाली आहे. मात्र समस्येला योग्य तो उपाय अथवा मार्ग काढण्यासाठी तेवढी इच्छाशक्ती याचा मात्र त्यांच्याकडे सध्या तरी अभाव आहे. घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठीही एक आराखडा आधी मनात आणि नंतर प्रत्यक्षात तयार असावा लागतो, या दोन्हींचा अभाव दिसतो आहे. त्याचाच सम्यक परिणाम म्हणून २००४ ला राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करून सुद्धा आपले एक स्वतंत्र स्थान त्यांना अद्याप निर्माण करता आलेले नाही.

राहुल गांधींच्या पत्रिकेतील गुरु-बुध राजयोग कारक असले आणि रवी-गुरु यांचा नवपंचम योग कुंडलित असूनही, राहू-हर्षल षडाष्टक, चंद्र-प्लुटो केंद्रयोग व बुध-राहू केंद्रयोग असल्याने, शुभ ग्रहांवर पाप ग्रहांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. राजकीय कुरुक्षेत्रावर म्हणूनच त्यांना इंचभरही आगेकूच करता आलेली नाही. २०२३ च्या विधानसभांच्या निवडणुकांमध्येही त्यांना फारसे यश मिळेल असे वाटत नाही.

२०२४ पर्यंत राहुल गांधींना काय समस्या येणार?

तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत गोचर मकर राशीतील प्लुटो, कुंभेतील शनि आणि मीनेतील राहू हा राहुल गांधींच्या मूळ कुंडलीतील मंगळाच्या केंद्रात येत असल्याने, मुस्लिम समाजाला स्वतःच्या पक्षाकडे वळवण्यात त्यांना फारसे यश मिळण्याची शक्यता कमीच आहे. याला आणखी एक ग्रह कारणीभूत होणार आहे तो म्हणजे त्यांच्या मूळ कुंडलीतील शनि वरून हर्षल चे भ्रमण होत असल्याने, त्यांच्या विचारात मोठाच फेरबदल झाल्याचे सर्वांना लक्षात येणार आहे. आरोग्याच्या स्तरावरही त्यांची कुंडली फारशी चांगली नाही. डोळ्यांचे तसेच पोटाचे विकार, अपघातभय, शस्त्राघात या पासून सावध राहण्याची गरज आहे. तसेच यापुढे खुशमस्कारांपासून दूर राहून, कठोर परिश्रम करून विवेकी व बुद्धीनिष्ठ निर्णय घेतले तरच राजकारणाच्या कुरुक्षेत्रावर त्यांना चमकता येईल, नाहीतर एका अपयशी राजपुत्राचे जीवन त्यांच्या वाट्याला येईल.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 18:08 IST