Shardiya Navratri 2026 : हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. या नऊ दिवसांत आई दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. २०२६ मधील शारदीय नवरात्र ज्योतिषीय दृष्टिकोनातूनही फार महत्त्वाची मानली जात आहे. पंचांगानुसार, नवरात्रीची सुरुवात रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ पासून होणार असून १९ ऑक्टोबर रोजी महानवमीने तिची सांगता होईल. ज्योतिषांच्या मते, नवरात्रीच्या सुरुवातीला हस्त नक्षत्र आणि शुक्ल योगासह गजकेसरी योगही जुळून येत आहे. याच कारणामुळे ही नवरात्र ज्योतिषीय संयोगाच्या बाबतीत अत्यंत विशेष मानली जात आहे.
५८ वर्षांनंतर गजकेसरी योगाचा खास संयोग
नवरात्रीच्या प्रतिपदेला म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हस्त नक्षत्र आणि शुक्ल योगाचा संयोग असेल. याच वेळी गुरु आणि चंद्राच्या केंद्र संबंधामुळे ‘गजकेसरी योग’ निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रात गुरु आणि चंद्राच्या या विशेष स्थितीला अत्यंत शुभ मानले जाते. या योगाचा थेट संबंध ज्ञान, समृद्धी, सन्मान आणि योग्य निर्णयांशी जोडला जातो. नक्षत्र, वार आणि योगाचा असा दुर्मीळ मेळ तब्बल ५८ वर्षांनंतर जुळून येत आहे.
३० वर्षांनंतर शश राजयोगाची स्थिती
या नवरात्रीत केवळ गजकेसरी योगच नाही, तर शनीदेवाची स्थितीसुद्धा लक्षवेधी ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनीदेव आपल्या मूळ त्रिकोण राशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहेत. पंच महापुरुष योगांपैकी एक असलेला ‘शश राजयोग’ शनीदेवाच्या या विशेष स्थितीमुळे तयार होतो. जवळपास ३० वर्षांनंतर नवरात्रीच्या काळात शश राजयोगाची अशी स्थिती निर्माण होत आहे. हा योग शिस्त, स्थिरता, मेहनत, न्याय आणि जबाबदारीच्या कामांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या काळात केलेल्या कामांमध्ये संयम आणि सातत्य ठेवल्यास उत्तम फळ मिळते, तसेच आध्यात्मिक साधना करण्यासाठी हा काळ अतिशय उत्तम मानला जात आहे.
गुरु आणि सूर्याचा शुभ संबंध
नवरात्रीदरम्यान देवगुरु गुरु आणि सूर्य यांचाही शुभ भावांमध्ये परस्पर दृष्टी संबंध असणार आहे. ज्योतिषात गुरुला ज्ञान, धर्म, शिक्षण आणि विस्ताराचा कारक मानले जाते, तर सूर्य हा आत्मविश्वास, सन्मान आणि नेतृत्वाचे प्रतीक आहे, त्यामुळे या दोन्ही ग्रहांचा शुभ संबंध धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रमांसाठी अत्यंत सकारात्मक मानला जात आहे.
सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योग
शारदीय नवरात्रीच्या काळात इतरही अनेक शुभ योग तयार होत आहेत. ज्योतिषीय गणितानुसार नवरात्रीच्या ९ दिवसांपैकी जवळपास ४ ते ५ दिवस ‘सर्वार्थ सिद्धी योग’ असेल, तर २ दिवस ‘अमृत सिद्धी योग’ असणार आहे. नवीन आणि शुभ कामांची सुरुवात करण्यासाठी सर्वार्थ सिद्धी योग अतिशय उत्तम मानला जातो, तर अमृत सिद्धी योगालाही धार्मिक व ज्योतिषीय दृष्टीने विशेष स्थान आहे.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
