वाद घालणे ही वाईट गोष्ट नाही. आपले मत मांडणे गरजेचे आहे. पण काही लोकांसोबत वाद घालणे म्हणजे आपला वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया घालवणे. ज्योतिषशास्त्रानुसार, ३ अशा राशी मानल्या जातात, ज्या आपल्या मतावरून सहज मागे हटत नाहीत. या लोकांनी एखादी गोष्ट मनाशी ठरवली, तर त्यांना समजावणे कठीण होते.
समोरचा कितीही समजावून सांगत असला, तरी हे लोक लगेच ऐकून घ्यायला तयार होत नाहीत. तुमच्या आजूबाजूलाही अशी एखादी व्यक्ती असेल, तर तिची रास या तीनपैकी एक असू शकते. चला जाणून घेऊया, कोणत्या राशीच्या लोकांशी वाद घालणे महागात पडू शकते.
वृषभ रास – एकदा हट्ट धरला की मागे हटणे कठीण
वृषभ राशीचे लोक त्यांच्या हट्टी स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांनी एखादी गोष्ट ठरवली, तर आपला निर्णय बदलणे त्यांच्यासाठी सोपे नसते. समोरचा कितीही समजावून सांगत असला, तरी ते आपल्या मतावर ठाम राहतात. वादामध्ये आपली बाजू सोडणे त्यांना आवडत नाही. अनेक वेळा आपली चूक लक्षात आली तरी ती लगेच मान्य करणे त्यांच्यासाठी कठीण असते. त्यामुळे त्यांच्यासोबत वाद वाढवण्यापेक्षा योग्य वेळ पाहून बोलणे चांगले.
सिंह रास – आत्मविश्वास कधी कधी हट्टीपणासारखा वाटतो
सिंह राशीचे लोक खूप आत्मविश्वासी असतात. त्यांना आपल्या निर्णयांवर विश्वास असतो. हाच आत्मविश्वास अनेक वेळा हट्टीपणासारखा दिसू शकतो. कोणी त्यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला, तर ते लगेच आपली बाजू मांडू लागतात. विशेषतः स्वाभिमानाचा प्रश्न असेल, तर ते मागे हटायला तयार होत नाहीत. वादामध्ये आपली बाजू योग्य असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना चुकीचे सिद्ध करण्यापेक्षा शांतपणे बोलणे योग्य ठरते.
वृश्चिक रास – शांत राहतात, पण सहज झुकत नाहीत
वृश्चिक राशीचे लोक प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. ते आधी समोरच्याचे म्हणणे समजून घेतात. पण एकदा एखादा निर्णय घेतला, तर त्यापासून मागे हटणे त्यांच्यासाठी सोपे नसते. आपल्या विचारांबद्दल आणि तत्त्वांबद्दल ते खूप ठाम असतात. वादामध्ये ते तर्क आणि अनुभवाच्या आधारावर आपली बाजू मांडतात. समोरची व्यक्ती फक्त वाद जिंकण्यासाठी बोलत आहे, असे त्यांना वाटले, तर ते आणखी हट्टी होऊ शकतात.
अशा लोकांशी कसे वागावे?
वृषभ, सिंह किंवा वृश्चिक राशीच्या लोकांशी प्रत्येक गोष्टीवर वाद घालू नका. आधी त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. त्यांना लगेच चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. रागात उत्तर दिल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते. शांतपणे आपले मत मांडा. गरज असेल तर त्यांना थोडा वेळ आणि मोकळीक द्या. प्रत्येक वाद जिंकणे गरजेचे नसते. अनेक वेळा नाते आणि मनःशांती जपणे अधिक महत्त्वाचे असते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
