Surya Guru Navpancham Yoga 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि देवगुरु बृहस्पति हे दोघेही शक्तिशाली ग्रह मानले जातात. सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा तर गुरु हा ज्ञान, धर्म, भाग्य आणि ऐश्वर्याचा अधिपती मानला जातो. हे दोन्ही ग्रह जेव्हा एका विशिष्ट कोनात येतात, तेव्हा विश्वात एक विलक्षण ऊर्जा निर्माण होते, ज्याचा परिणाम अनेक राशींवर होतो, असं ज्योतिष तज्ज्ञांचं मत आहे.

पंचांगानुसार, १७ नोव्हेंबर २०२५, सोमवार रोजी सकाळी १०:३५ वाजता सूर्य आणि गुरु १२० अंशांच्या कोनात विराजमान होतील. या योगामुळे ‘नवपंचम योग’ नावाचा एक दुर्मीळ आणि शुभ संयोग तयार होणार आहे. हा योग काही राशींना भाग्यवृद्धी, मान-सन्मान आणि आर्थिक प्रगतीचं वरदान देऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जाते. तर पाहूया कोणत्या राशींवर हा दुर्मीळ योग कृपादृष्टी ठेवणार आहे.

नवपंचम योगानं या राशींवर होणार धनवर्षाव!

१. वृषभ (Taurus): आत्मविश्वास आणि नव्या सुरुवातीचा काळ!

नवपंचम योग वृषभ राशीच्या जातकांसाठी ऊर्जा आणि साहस वाढवणारा ठरणार आहे. आतापर्यंत अडकलेली काही कामे या काळात पुढे सरकू शकतात. नवी नोकरी, प्रोजेक्ट किंवा व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश लाभू शकते.

२. कर्क (Cancer): भाग्यवृद्धी आणि नवीन संधींचा योग!

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा योग भाग्य खुलवणारा आणि प्रगतीचा मार्ग मोकळा करणारा ठरू शकतो. जुन्या अडचणींवर मात करता येईल आणि अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. परदेशातून एखादी नवी संधी किंवा व्यावसायिक भागीदारीची ऑफर मिळू शकते. धार्मिक किंवा अध्यात्मिक प्रवासाचाही योग दिसतो. काहींच्या घरात आनंददायी प्रसंग घडण्याची शक्यता आहे.

३. मकर (Capricorn): आत्मसन्मान आणि आर्थिक स्थैर्य वाढेल!

मकर राशीसाठी नवपंचम योग आत्मविश्वास वाढवणारा आणि आर्थिक स्थैर्य देणारा मानला जातो. अडकलेली रक्कम मिळू शकते, तसेच दीर्घकाळ प्रलंबित व्यवहार पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात मोठी ऑर्डर किंवा करार होण्याची शक्यता आहे. मात्र, खर्चात वाढ होऊ शकते, त्यामुळे आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करणे आवश्यक ठरेल.
तुमच्या प्रयत्नांना समाजात मान्यता मिळेल, असेही संकेत आहेत.

४. मीन (Pisces): लाभ, यश आणि प्रतिष्ठेचा काळ!

मीन राशीच्या लोकांसाठी हा संयोग अत्यंत शुभ ठरू शकतो. भाग्य आणि लाभ दोन्ही वाढतील, असं ज्योतिष सांगतात. एखाद्या शुभ कार्याची सुरुवात होईल, समाजात प्रतिष्ठा वाढेल, तसेच मित्र आणि सहकाऱ्यांकडून मोठा पाठिंबा मिळू शकतो. व्यावसायिकांना नवे ग्राहक, ऑर्डर किंवा करार मिळण्याची शक्यता आहे. प्रवासातूनही लाभ मिळू शकतो.

एकूणच, १७ नोव्हेंबरचा हा ‘सूर्य-गुरु नवपंचम योग’ काही राशींसाठी सकारात्मकता आणि आर्थिक प्रगतीचं दार उघडू शकतो. मात्र, हा सर्व अंदाज ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, त्यावर विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)