Suryakumar Yadav Daughter Name: भारतीय टी-२० संघाचा स्टार क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. मैदानावर आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या सूर्यकुमारच्या आयुष्यात आता एका नव्या आनंदाची एंट्री झाली आहे. कारण- सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा यांच्या घरात एका गोंडस मुलीचा जन्म झाला आहे.

७ मे रोजी त्यांच्या घरी या चिमुकलीचं आगमन झालं आणि त्यानंतर यादव कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. ही बातमी समोर येताच चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव सुरू केला. मात्र, या आनंदाच्या क्षणात सर्वांत जास्त चर्चा झाली ती त्यांच्या मुलीच्या नावाची.

सूर्यकुमार यादवनं सोशल मीडियावर आपल्या मुलीची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली. हॉस्पिटलमधील फोटोमध्ये सूर्यकुमार आणि देविशा दोघेही खूप आनंदी दिसत होते. पोस्टमध्ये त्यानं आपल्या आयुष्यातील “सर्वांत मोठा आनंद” चाहत्यांना दाखवला. पण, अनेकांच्या मनात एकच प्रश्न घोळत होता आणि तो म्हणजे अखेर या चिमुकलीचं नाव काय ठेवलं असेल?

दरम्यान, सोशल मीडियावर सूर्यकुमार यादवचा आणखी एक व्हिडीओही तुफान व्हायरल होत आहे. मुंबई इंडियन्ससोबत सामना खेळण्यासाठी रायपूरला पोहोचलेल्या सूर्यकुमारनं विमानतळावर चाहत्यांमध्ये मिठाई वाटून आपला आनंद साजरा केला. विशेष म्हणजे त्यानं स्वतःच्या हातानं फोटोग्राफर्स आणि चाहत्यांना मिठाई देऊन आनंद व्यक्त केला. त्याचा साधा आणि प्रेमळ स्वभाव पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं.

अखेर सूर्यकुमार यादवनं आपल्या मुलीचं नाव जाहीर केलं आणि ते ऐकून चाहतेही भारावून गेले. त्यानं आपल्या मुलीचं नाव ‘रिद्धिमा’ असं ठेवलं आहे.

रिद्धिमा हे नाव संस्कृतमधून घेतलं गेलं आ त्याहे.चा अर्थ प्रेम, समृद्धी, यश व सकारात्मकता, असा होतो. हिंदू धर्मग्रंथांमध्ये या नावाचा संबंध देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वतीशी जोडला जातो. त्यामुळे हे नाव केवळ सुंदरच नाही, तर धार्मिक आणि शुभही मानलं जातं.

अनेक पालक आपल्या मुलांसाठी अर्थपूर्ण आणि सकारात्मक ऊर्जा देणारं नाव शोधत असतात. अशा लोकांमध्ये ‘रिद्धिमा’ नाव सध्या खूप चर्चेत आलं आहे. या नावाचा संबंध नवी सुरुवात, यश आणि चांगल्या गुणांशीही जोडला जातो.

त्याशिवाय मुलींसाठी देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मीपासून प्रेरित काही सुंदर नावंही सध्या चर्चेत आहेत. त्यामध्ये वाणी, भारती, शारदा, अक्षरा, मेधा, विभा, श्री, कमला, रमा व इंदिरा या नावांचा समावेश आहे.

सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी “खूप सुंदर नाव”, “देवीचं नाव आहे” व “खरंच खास निवड” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. सूर्यकुमार यादवच्या या गोड बातमीमुळे त्याचे चाहतेही आनंदात असून, क्रिकेटविश्वातूनही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.