Taurus March Horoscope 2026 : वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा कलेचा , सौंदर्याचा कारक ग्रह आहे. त्याच प्रमाणे वृषभ राशीच्या व्यक्तींनाही कलेची जाण असते. त्यांच्या वागण्या- बोलण्यात सहजता आणि आपलेपणा असतो. या व्यक्ती समूहात सर्वांना हव्याहव्याशा असतात. त्यांच्या असण्याने घरात देखील जिवंतपणा आणि चैतन्य असते. तर आता येणारा मार्च महिना तुमच्यासाठी कोणत्या सुखसोयी घेऊन येणार हे आपण ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे यांच्याकडून जाणून घेऊया..

महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच २ मार्चची होळी तुमच्या राशीसाठी विविध रंगांची उधळण करणारी ठरेल. १९ मार्चला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अपेक्षित लाभ होईल. अर्थात जे आधी पेरले होते तेच उगवले हे ध्यानात असावे. विद्यार्थ्यांना आता अभ्यासात गढून जाण्याशिवाय तरणोपाय नाही. नोकरीत प्रगती कराल. आर्थिक उन्नती अपेक्षित आहे. अनुभवी वरिष्ठांचे मार्गदर्शन कामी येईल.

विवाहोत्सुक मंडळींना वधु-वर संशोधनाचा लाभ होईल. गुंतवणूक करताना पैशाची योग्य प्रकारे विभागणी कराल, भविष्यात खूप फायदा होईल. जमिनीच्या व्यवहारात लहान मोठ्या गोष्टी नजर चुकीने निसटून जातील. त्यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे. डोकेदुखी आणि त्वचेची ॲलर्जी याची काळजी घ्यावी लागणार आहे. तर वृषभ राशीचा मार्च महिना असा असणार आहे.

वृषभ राशीबद्दल काही खास गोष्टी सांगायच्या झाल्यास परिस्थितीची चाचपणी करून त्यांना आपले काम योग्यप्रकारे साधता येते. वृषभ राशीच्या व्यक्तींना नाविन्याची आस असते. सतत काही ना काही करण्यात त्या मग्न असतात. कामाच्या वेळी भरपूर काम करणारी वृषभ रास आरामाच्या वेळी भरपूर आरामही करते. आपले जीवन सुखी आणि संपन्न करण्याकडे या व्यक्तींचा कल असतो. या व्यक्ती खऱ्या अर्थाने जीवनाचा उपभोग घेतात. वेळप्रसंगी कष्ट सोसायची देखील त्यांची तयारी असते.