Taurus Monthly Horoscope 2026 : वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. कलात्मकता, रसिकता आणि नाविन्याची ओढ हे शुक्र ग्रहाचे गुणधर्म वृषभ राशीतही पुरेपूर दिसून येतात. आपले जीवन कसे समृद्ध होईल याकडे तुमचा कल असतो. निर्मितीक्षमता आणि सर्जनशीलता आपल्यामध्ये आढळतात. भरपूर काम करणे जसा आपला स्थायी भाव आहे तसाच आपल्याला आराम सुद्धा मनापासून आवडतो. जे चांगले, उत्तम ते आपल्याला हवे असा आपला ध्यास असतो. दीर्घोद्योगी, आशावादी आणि व्यवहारकुशल अशा या वृषभ राशीला एप्रिल महिना कसा असणार आहे जाणून घेऊयात…
या व्यक्ती समूहात सर्वांना हव्याहव्याशा असतात. त्यांच्या असण्याने घरात देखील जिवंतपणा आणि चैतन्य असते. परिस्थितीची चाचपणी करून त्यांना आपले काम योग्यप्रकारे साधता येते. या व्यक्ती खऱ्या अर्थाने जीवनाचा उपभोग घेतात. वेळप्रसंगी कष्ट सोसायची देखील त्यांची तयारी असते. तर येत्या महिन्यात तुम्हाला वेळप्रसंगी कष्ट घ्यायला लागणार की, जीवन सुखी व संपन्न होणार याबद्दल आपण ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे यांच्याकडून जाणून घेणार आहोत…
ग्रहमान साथ देईल
२ एप्रिलची हनुमान जयंती तुमच्यासाठी विशेष लाभ होणाऱ्या घटना तर अक्षय्य तृतीया संमिश्र अनुभव घेऊन येणार आहे. याचबरोबर रवी आणि शुक्र या ग्रहांचा सकारात्मक प्रभाव सुद्धा काही प्रमाणात दिसून येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयारी करताना उत्साही वाटेल, मेहनतीचे फळ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी प्रभावीपणे आपले मत मांडाल. सादरीकरण उत्तम कराल.
विवाह जुळण्यास ग्रहमान साथ देईल. कौटुंबिक नाते संबंध जोपासण्याचा प्रयत्न कराल. गुंतवणूकदारांना धोक्याचा इशारा मिळेल. त्यामुळे सावधगिरी बाळगा. मोठी जोखीम पत्करू नका. जमिनीचे व्यवहार अर्ध्यावर थांबतील. मूत्रविकार सतावतील. वेळेवर वैद्यकीय मदत घ्यावी. तर असा वृषभ राशीचा एप्रिल महिना असणार आहे.
