Taurus Horoscope September 2026 : वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा कलेचा , सौंदर्याचा कारक ग्रह आहे. त्यामुळे तुम्हाला कलेची जाण असते. तुमच्या वागण्या- बोलण्यात सहजता आणि आपलेपणा असतो. तुम्ही समूहात सर्वांना हव्याहव्याशा असता. तुमच्या असण्याने घरात देखील जिवंतपणा आणि चैतन्य असते. परिस्थितीची चाचपणी करून तुम्ही आपले काम योग्यप्रकारे साधता.

तुम्हाला नाविन्याची आस असते. सतत काही ना काही करण्यात तुम्ही मग्न असतात. कामाच्या वेळी भरपूर काम करणारी आणि आरामाच्या वेळी भरपूर आरामही तुम्ही करता. स्वतःचे जीवन सुखी व संपन्न करण्याकडे तुमचा कल असतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही जीवनाचा उपभोग घेता. वेळप्रसंगी कष्ट सोसायची देखील तुमची तयारी असते. अशा या वृषभ राशीला सप्टेंबर महिना कसा जाणार याबद्दल सोनल चितळेंकडून जाणून घेऊया.

सप्टेंबर महिना कसा जाणार?

तुम्ही उत्सवप्रिय असल्याने या महिन्यात अनेक लोकांच्या भेटीगाठी होतील. जमेल तशी मदत करणे तर तुमच्या रक्तातच आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः आनंद घेत इतरांना आनंद द्याल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणे कठीण वाटत असले तरी त्या वाचून आता पर्याय नाही. स्वतःचे स्वतंत्र वेळापत्रक करून त्याचे पालन कराल. नोकरी व्यवसायात महत्वाचे निर्णय घेताना त्याच्या दीर्घकालीन परिणामांचा जरूर विचार करावा.

उठवळपणा कामाचा नाही. उपवर मुलामुलींना मनपसंत स्थळाकडून होकार येईल. कृष्णजन्माष्टमी लाभकारक ठरेल. गणेशोत्सवात सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. देश विदेशात प्रवास योग संभवतो. घराची कागदपत्रे, वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे व्यवहार धीम्या गतीने पुढे सरकतील. तज्ज्ञ वकिलांचा सल्ला उपयोगी ठरेल.

असा वृषभ राशीचा सप्टेंबर महिना असणार आहे.