Libra May Rashi 2026:  तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. आकर्षकपणा, नेटकेपणा, सौंदर्य आणि कला यांचे उपभोक्ते अशी आपली वैशिष्ट्ये आहेत. व्यापारी तत्वाचे आणि न्यायप्रिय, बुद्धिवादी असे तूळ राशीचे वर्णन सार्थ ठरते. आपण नेहमी संकटातून मार्ग काढत पुढे जाता. कर्तव्य आणि प्रेम यांच्यात आपण योग्य समतोल साधता. नेहमी हसतमुख आणि समाजप्रिय असलेल्या तूळ राशीला मे महिना नेमका जाईल याचा आढावा घेऊया …

वर्षभरातील महत्त्वाच्या ग्रहांचे राशीबदल असे आहेत…

नेपच्यून आणि शनी षष्ठातील मीन राशीतून भ्रमण करतील. चतुर्थातील मकर राशीतून प्लुटो भ्रमण करेल. भाग्यातील मिथुन राशीत गुरू आहे. उत्तम गुरूबल आहे. १ जूनला गुरू दशमातील कर्केत प्रवेश करेल.

कर्क ही गुरूची उच्च राशी असल्याने गुरूबल चांगले मिळेल. पुढे ३१ ऑक्टोबरला गुरू लाभातील सिंह राशीत प्रवेश करेल. गुरूचा हा राशी बदलदेखील लाभकारकच असेल. २५ नोव्हेंबरला राहू आणि केतू वक्र गतीने अनुक्रमे चतुर्थातील मकरेत आणि दशमातील कर्केत प्रवेश करतील.

तूळ राशीचे मे महिन्याचे राशीभविष्य (Libra Horoscope May 2026)

बुद्ध पौर्णिमेला सामाजिक कार्यातील उत्साह वाढेल. लोकोपयोगी प्रकल्पात हिरिरीने सहभागी व्हाल. विद्यार्थी वर्गाच्या मेहनतीला उत्तम फळ मिळेल. उच्च शिक्षणासाठी जय्यत तयारी कराल. तज्ज्ञांचे मार्गदर्शन कामी येईल. नोकरी व्यवसायात संशोधनात्मक कार्यात खूप मोठे यश मिळेल. मानमराताब, धनसंपत्ती मिळेल.

विवाहोत्सुक मंडळींना गुरूबल चांगले असल्याने विवाह योग जुळून येतील. विवाहितांनी आपल्या जोडीदाराला वेळ देणे गरजेचे आहे. रुसवा फुगवा हलकेच काढावा. कामाचा ताण तणाव घरापर्यंत आणू नका.

संततीसाठीचे प्रयत्न सुरू ठेवावेत. गुंतवणुकीतून बक्कळ धन मिळवाल. बाजारभावातील चढ उतार नीट अभ्यासावेत. घर, जागा, प्रॉपर्टी यांबाबत ज्येष्ठ मंडळींच्या सल्ल्यानुसार निर्णय घेता येईल. भटकंतीसाठी मनसोक्त प्रवास कराल. निसर्ग प्रेम वाढीस लागेल. आरोग्याच्या उन्हाळी समस्या डोकं वर काढतील.

– ज्योतिषी सोनल चितळे