सहा महिन्यांपूर्वी पक्षांतर्गत बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं. त्यापाठोपाठ शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या दाव्यांनंतर निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंच्या विरोधात निकाल दिला. त्यामुळे शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्हही उद्धव ठाकरेंच्या हातातून गेलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी प्रलंबित असताना निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातही ठाकरे गटानं याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून उद्धव ठाकरेंना न्यायाची अपेक्षा असतानाच दुसरीकडे टॅरो कार्ड्समधून मात्र उद्धव ठाकरेंनी सतर्क राहण्याचं भाकित वर्तवलं जात आहे. टॅरो कार्डरीडर जयंती अलूरकर यांनी उद्धव ठाकरेंच्या राजकीय भवितव्याबाबत भाकित वर्तवलं आहे.
उद्धव ठाकरेंची संघर्षाची तयारी!
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बोलताना संघर्षासाठी तयार राहण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, यासंदर्भात सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगच बरखास्त करण्याची मागणी केली. “आत्ताचा निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे. निवडणूक प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजेच ही आमची मागणी आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार?
दरम्यान, शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यामुळे शिंदे गटाकडूनच ठाकरे गटातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरेंनी शक्यता फेटाळून लावली आहे. “जेव्हा दोन गटांना मान्यता दिली गेली, तेव्हाच दोन्ही गट असल्याचं मान्य केलं गेलं. त्यानुसार त्यांना आणि आम्हाला वेगवेगळं नाव आणि चिन्ह दिलं गेलं. त्यामुळे आमच्या गटाचा आणि त्यांच्या गटाचा संबंध नाही”, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
एकीकडे उद्धव ठाकरे नजीकच्या भविष्यात वर्तवण्यात येत असलेल्या शक्यतांवर स्पष्ट भूमिका मांडत असताना दुसरीकडे टॅरो कार्ड्समधून त्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. टॅरो कार्डरीडर जयंती अलूरकर यांनी उद्धव ठाकरेंसाठी पुढची दोन वर्ष त्रासदायक ठरणार असल्याचं भाकित टॅरो कार्ड्सच्या सहाय्याने वर्तवलं आहे.
‘हीच उद्धव ठाकरेंनी सावरायची वेळ आहे’!
‘भूतकाळात झालेल्या घटनांचा वर्तमानावर परिणाम होतो. आणि त्या त्या गोष्टी योग्य वेळेवर सावरल्या गेल्या नाहीत तर भविष्यावर सुद्धा त्यांचे गंभीर परिणाम झाल्याशिवाय राहत नाहीत. २०२३ ते २०२५ ही वर्षे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी खूपच त्रासदायक आणि आर्थिक नुकसानीची सुद्धा आहेत. याकाळात एका मागून एक संकटे त्यांच्या दिशेने येताना दिसत आहेत. हीच वेळ आहे त्यांनी स्वतःला सावरायची’, असं भाकित जयंती अलूरकर यांनी वर्तवलं आहे.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही उक्ती लक्षात ठेऊन सर्व धुरा त्यांनी स्वतःच्याच हातात ठेवावी. हितशत्रूंना बरोबर ओळखून त्यांच्यापासून सावध रहावे. कोणतीही गोष्ट अधिक ताणल्यास त्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान संभवते’, असाही अंदाज अलूरकर यांनी उद्धव ठाकरेंचे टॅरो कार्ड्स पाहून वर्तवला आहे.