Uranus Retrograde in Taurus: वैदिक ज्योतिषशास्त्रापेक्षा आधुनिक आणि पाश्चिमात्य ज्योतिषशास्त्रात यूरेनस म्हणजेच अरुण ग्रहाला विशेष महत्त्व दिलं जातं. या ज्योतिषशास्त्रानुसार, यूरेनस हा अचानक होणारे बदल, अनपेक्षित घटना, नवीन संधी आणि जुन्या परिस्थितीत मोठा बदल घडवून आणणारा ग्रह मानला जातो.

दृक पंचांगानुसार, १० सप्टेंबर २०२६ रोजी यूरेनस वृषभ राशीत वक्री होणार आहे. यूरेनसची ही वक्री चाल ८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत राहणार असल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे यूरेनस सध्या वृषभ राशीत असून, १९ मार्च २०२५ पासून तो या राशीत आहे आणि ६ जुलै २०३१ पर्यंत वृषभ राशीत राहणार आहे. वृषभ राशीचा संबंध शुक्राशी जोडला जातो. शुक्र हा प्रेम, सौंदर्य, सुख-सुविधा, धन आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे यूरेनसची वृषभ राशीतील वक्री चाल काही राशींसाठी अचानक सकारात्मक बदल घेऊन येऊ शकते.

वृषभ राशी: व्यक्तिमत्त्वात नवा आत्मविश्वास, करिअरमध्ये मोठी झेप

यूरेनस (अरूण ग्रह) वृषभ राशीतच वक्री होत असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींवर त्याचा विशेष प्रभाव पडू शकतो, असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात मोठा बदल जाणवू शकतो. आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्याकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टिकोनही बदलू शकतो. नवीन कल्पना आणि वेगळ्या पद्धतीने काम करण्याची क्षमता तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. करिअरमध्ये अनपेक्षित संधी मिळण्याची शक्यता आहे. नाविन्यपूर्ण किंवा क्रिएटिव्ह काम करणाऱ्यांना विशेष फायदा होऊ शकतो. एखाद्या कामातून अचानक प्रसिद्धी किंवा समाजात नवी ओळख मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

कन्या राशी: परदेशगमनाचे योग, आर्थिक स्थितीत सुधारणा

कन्या राशीसाठी यूरेनसची वक्री चाल आर्थिक आणि वैयक्तिक आयुष्यात काही अनपेक्षित बदल घडवू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात परदेश प्रवास किंवा परदेशाशी संबंधित संधी मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन बँक बॅलन्स वाढू शकतो. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींमध्येही रस वाढू शकतो. धार्मिक प्रवास किंवा घरात एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन होण्याची शक्यता आहे.

मकर राशी: विद्यार्थ्यांपासून गुंतवणूकदारांपर्यंत अचानक लाभ

मकर राशीच्या पंचम भावाशी यूरेनसचा संबंध येत असल्यामुळे या राशीसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. विद्यार्थी, फ्रेशर्स, संशोधन क्षेत्रातील व्यक्ती आणि क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. स्कॉलरशिप, बक्षीस किंवा चांगल्या पॅकेजची नोकरी मिळण्याची शक्यता आहे. शेअर बाजार किंवा क्रिएटिव्ह क्षेत्राशी संबंधित लोकांना अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो. याशिवाय संततीकडून एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

कर्क राशी: व्यवसायात नवे मार्ग, कमाईच्या संधी वाढणार?

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी यूरेनसची वक्री चाल व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत अनपेक्षित संधी घेऊन येऊ शकते. या काळात कमाईचे नवीन मार्ग सापडू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन क्लायंट, पार्टनर किंवा नेटवर्कमधील व्यक्तींची मदत मिळू शकते. योग्य वेळी घेतलेले निर्णय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतात. एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते. व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो.

अचानक बदलांची चाहूल; पण निर्णय घेताना सावधगिरीही महत्त्वाची

यूरेनसला ज्योतिषशास्त्रात अचानक बदलांचा ग्रह मानलं जात असल्यामुळे त्याचा प्रभाव नेहमीच एका ठराविक पद्धतीने दिसेल असं नाही. काहींसाठी हे बदल करिअर किंवा पैशांशी संबंधित असू शकतात, तर काहींसाठी नातेसंबंध, प्रवास किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असू शकतात. त्यामुळे या काळात नवीन संधी मिळाल्यास त्याचा विचारपूर्वक फायदा घ्या आणि मोठे आर्थिक निर्णय घेताना योग्य सल्ला घ्या.