Success Traits Numerology: अंकज्योतिषानुसार प्रत्येक अंकामागे एक विशिष्ट ऊर्जा आणि स्वभाववैशिष्ट्य दडलेलं असतं. काही अंक शांत, संयमी; तर काही अंक अतिशय ऊर्जावान आणि धाडसी स्वभावाशी निगडित मानले जातात. अशाच एका मूलांकाबद्दल सध्या विशेष चर्चा होताना दिसते. योग्य दिशादर्शन मिळाल्यास ही मुलं लहान वयातच मोठी कामगिरी करू शकतात, अशी धारणा व्यक्त केली जाते.

क्रिकेटच्या मैदानावरील अतुलनीय कामगिरीमुळे चर्चेत आलेल्या वैभव सूर्यवंशी याचा उल्लेखही या संदर्भात केला जातो. त्यामुळे या मूलांकाविषयी उत्सुकता वाढताना दिसते.

अंकज्योतिषात या मूलांकाचा संबंध मंगळ ग्रहाशी जोडला जातो, असं मानलं जातं. मंगळ म्हणजे ऊर्जा, धैर्य व कृतिशीलता म्हणूनच या मूलांकाच्या मुलांमध्ये लहानपणापासूनच उत्साह आणि धाडस दिसून येतं, अशी समजूत आहे.

म्हटलं जातं की, या मुलांमध्ये एखादं काम पूर्ण करण्याची तीव्र जिद्द असते. अडचणी आल्या तरी ध्येयापासून मागे हटण्याऐवजी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याची वृत्ती त्यांच्यात दिसते. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास आणि ठामपणा जाणवतो.

या मूलांकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दृढ इच्छाशक्ती. कठीण परिस्थितीतही प्रयत्न सुरू ठेवण्याची सवय त्यांच्यात असते, अशी मान्यता आहे. त्यामुळे स्पर्धात्मक क्षेत्रांमध्ये ते आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतात.

तसेच, शिस्त पाळण्याची प्रवृत्तीही या मुलांमध्ये आढळते, असं म्हटलं जातं. ठरवलेलं ध्येय गाठण्यासाठी ते वेळ आणि ऊर्जा यांचा योग्य पद्धतीनं वापर करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच अनेकदा ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात.

मात्र, या गुणांसोबत काही गोष्टींची काळजी घेणंही महत्त्वाचं मानलं जातं. या मुलांमध्ये ऊर्जा जास्त असल्यानं ती योग्य दिशेला वळवणं गरजेचं असतं; अन्यथा चिडचिड किंवा आक्रमकपणा वाढू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जाते. त्याचप्रमाणे स्वाभिमान जास्त असल्यानं टीका सहन करणं त्यांना अवघड जाऊ शकतं.

तज्ज्ञांच्या मते, लहानपणापासून या मुलांच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन, संयम व समजूत या गोष्टी जुळून आल्यास हीच ऊर्जा त्यांच्या यशाचा पाया ठरू शकते.

आता प्रश्न असा आहे की, हा मूलांक नेमका कोणता?
अंकज्योतिषानुसार महिन्याच्या ९, १८ व २७ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ९ मानला जातो.

एकूणच, या मूलांकाबाबत सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी या ज्योतिषशास्त्रीय शक्यतांवर आधारित आहेत. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि यशाचा मार्ग वेगळा असतो हे लक्षात ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)