Vastu Tips For Kitchen : स्वयंपाकघर हे घरातील असे ठिकाण आहे, जिथून संपूर्ण घरात सकारात्मकता पसरते. येथे देवी अन्नपूर्णा वास करते, जी तुम्हाला अन्न आणि उत्तम आरोग्याचा आशीर्वाद देते. जिथे शिजवलेल्या अन्नाचा आनंद घरातील प्रत्येक व्यक्ती घेते, त्यामुळे वास्तुशास्त्रात स्वयंपाकघर हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. यासाठीच स्वयंपाकघरात वास्तु नियमांचे पालन करणे गरजेचे असते. स्वयंपाकघरात वास्तु नियमांचे पालन न केल्यास धन, आरोग्य आणि नातेसंबंधांवर वाईट परिणाम होतात असे मानले जाते, त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत जाणून घेऊ…

१) स्वयंपाकघरात आरसे लावू नका

वास्तुशास्त्रानुसार, तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात कधीही आरसा ठेवू नका. ही एक सजावटीची वास्तु आहे, त्यामुळे स्वयंपाकघरात आरसा ठेवणे अयोग्य मानले जाते. वास्तुनुसार स्वयंपाकघर अग्नीतत्त्वाशी संबंधित आहे आणि तिथे आरसा ठेवल्याने तुमच्या जीवनात चढ-उतार येऊ शकतात.

२) गॅस शेगडी जवळ ठेवू नका पाणी

पाणी आणि अग्नी हे दोन भिन्न घटक आहेत, त्यामुळे त्यांना स्वयंपाकघरात कधीही एकत्र ठेवू नये. पाणी आणि गॅस शेगडी (अग्नी) खूप जवळ असल्यास, त्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये वादही निर्माण होऊ शकतात.

३) तुटलेली भांडी ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात कधीही तुटलेली भांडी ठेवू नयेत, यामुळे तुमच्या घरातील सुख आणि समृद्धी कमी होऊ शकते. स्वयंपाकघरातील तुटलेल्या भांड्यांमुळे अन्नपूर्णा मातासुद्धा रागावते असे मानले जाते.

४) गॅस शेगडी योग्य ठिकाणी ठेवा

स्वयंपाकघरातील गॅस शेगडी योग्य दिशेला ठेवली पाहिजे. शेगडी ठेवण्यासाठी उत्तर-पश्चिम वायव्य किंवा दक्षिण-पूर्व आग्नेय दिशा योग्य मानल्या जातात. या दिशांना शेगडी ठेवल्याने निरोगी जीवन जगण्यास आणि जीवनात संतुलन राखण्यास मदत होते.

५) स्वयंपाकघरात चुकूनही ठेवू नका चपला

पूजास्थळानंतर स्वयंपाकघर हे सर्वात पवित्र स्थान मानले जाते, त्यामुळे चुकूनही स्वयंपाकघरात बूट किंवा चप्पल घेऊन जाऊ नये. असे केल्याने जीवनात अडचणी येऊ शकतात. घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

(टीप- वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)