Vastu Tips for Home: हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील वातावरण सकारात्मक आणि आनंददायी ठेवणे आवश्यक आहे. आपल्या घरात सुख-शांती, समृद्धी नांदावी आणि घरातील वाईट व नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी यासाठी वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टींचं पालन करणं हेदेखील तितकंच गरजेचं आहे. आपल्या आयुष्यात चढ-उतार येतच असतात; पण कधी-कधी अचानक चांगले दिवस वाईटात बदलतात आणि आपल्याला काहीच कळत नाही. तुमच्याही आयुष्यात असंच काही घडत असेल, तर त्यामागे घरातल्या काही लहानशा गोष्टी कारणीभूत असू शकतात. वास्तुशास्त्रानुसार, काही विशिष्ट वस्तू जर घरात सतत रिकाम्या ठेवण्यात आल्या, तर त्या नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि त्यामुळे आर्थिक संकट, मानसिक अशांती आणि अडथळ्यांची मालिका सुरू होते. जाणून घ्या अशा पाच गोष्टी ज्या कधीच रिकाम्या ठेवू नयेत…
घरातील ‘या’ गोष्टी कधीच ठेवू नका रिकाम्या!
१. अन्नाचा साठा कधीही ठेवू नका रिकामा
वास्तुशास्त्र सांगतं की, घरात अन्नधान्याचा साठा नेहमी भरलेला असावा. अन्नपूर्णा देवीचं पूजन करून, अन्न साठविल्यास घरात लक्ष्मीचं वास राहतो. अन्नाचा रिकामा डबा किंवा कंटेनर नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं.
२. बाथरूममधली रिकामी बादली
तुमच्या बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवली असेल, तर त्वरित ती भरून ठेवा. वास्तूनुसार रिकामी बादली घरात दारिद्र्य आणते. त्यात पाणी भरून ठेवणं आवश्यक आहे. तसेच निळ्या रंगाची बादली शुभ मानली जाते आणि जुनी किंवा तुटलेली बादली वापरणं टाळा.
३. पूजाघरातील जलपात्र नेहमी भरलेली ठेवा
पूजाघरात ठेवलेलं जलपात्र रिकामं असेल, तर ते दुर्भाग्याचं लक्षण असू शकतं. त्यामुळे जलपात्रात रोज ताजं पाणी, गंगाजल व एक तुळशीचं पान ठेवा. असं मानलं जातं की, देवतांनाही पाणी लागतं आणि रिकामं जलपात्र नकारात्मक शक्तींना आकर्षित करतं.
४. तिजोरी किंवा पाकीट कधीच ठेवू नका रिकामं
वास्तुशास्त्र सांगतं की, रिकामी तिजोरी म्हणजे संपत्तीचा नाश. त्यामुळे तुमच्या तिजोरीत किंवा पाकिटात नेहमी काही न काही ठेवावं. ते धन असो किंवा गोमती चक्र, शंख किंवा कौडी, ज्यामुळे धनप्राप्तीचे दरवाजे उघडतात.
५. कोणालाही अपशब्द बोलू नका
तुमचं बोलणंही तुमचं नशीब ठरवतं. जर तुम्ही कोणालाही कठोर किंवा अपमानास्पद शब्द वापरले, तर लक्ष्मी देवी रुष्ट होऊ शकते. विशेषतः घरातील वडीलधाऱ्यांशी आदरानं वागा आणि बोलणं नेहमी प्रेमळ ठेवा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)