Hanging clothes behind the door Meaning in Vastu Shastra: आपल्या घरात सुख-शांती, समृद्धी नांदावी. तसेच, घरातील वाईट आणि नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी यासाठी वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वास्तुशास्त्रानुसार, घरात अनेकदा संकटे ओढवतात. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अशा वेळी घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर करणं गरजेचं आहे. घरातील प्रत्येक वस्तू कोणत्या दिशेला असावी याचा वास्तुशास्त्रात उल्लेख आढळतो. हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर तुमचं घर आणि घरातील वस्तू या वास्तुशास्त्राच्या नियमांप्रमाणे ठेवलेल्या असतील, तर तुमच्या घरात सुखशांती आणि समुद्धी येते, असं मानलं जातं. मात्र, जर तुमचं घर हे वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमांप्रमाणे नसेल, तर तुमच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात.
आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक सवयी आहेत, ज्या नकळतपणे आपल्या घराची ऊर्जा आणि समृद्धी यांवर परिणाम करतात. अशीच एक सामान्य सवय म्हणजे दारामागे कपडे लटकवणे. अनेकदा लोक सोई किंवा जागेअभावी दारामागे कपडे लटकवतात; परंतु वास्तुशास्त्रानुसार, ही सवय घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकते. या लेखात, आपण दारामागे कपडे लटकवल्याने कोणते नकारात्मक परिणाम होऊ शकतात आणि ते कसे सुधारायचे याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊ.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना एक सवय हमखास असते आणि ती म्हणजे कपडे दरवाजावर ठेवणं किंवा दरवाजामागे लटकवणं, जे वास्तुशास्त्रात चुकीचं मानलं गेलंय. घरात येताच कपडे योग्य ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे; अन्यथा वास्तुदोष निर्माण होतो. दारामागे कपडे लटकवण्याची सवय, जी आपल्याला सामान्य आणि सोईस्कर वाटते; पण ती वास्तुशास्त्रानुसार घराची सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी यांवर नकारात्मक परिणाम करू शकते. वास्तुशास्त्रानुसार दरवाजामागे कपडे टांगल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अडतो, ज्यामुळे मानसिक तणाव, कुटुंबातील मतभेद व आर्थिक अडचणी होऊ शकतात. मान्यतेनुसार, घरातील दरवाजाच्या वरच्या भागात धनाची देवी लक्ष्मीचा वास असतो. या ठिकाणी कपडे लटकवल्याने देवीची कृपा लाभत नाही. म्हणून दरवाजाच्या मागे कपडे टांगण्यास मनाई आहे. म्हणून ही सवय बदलून, कपडे ठेवण्यासाठी योग्य जागा निवडा आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राखा. छोट्या छोट्या सवयी बदलून, आपण आपल्या घराचे वातावरण आनंददायी आणि समृद्ध बनवू शकतो.
वास्तुशास्त्रात दारांचे महत्त्व
वास्तुशास्त्रात घराच्या प्रत्येक दरवाजाला विशेष महत्त्व आहे. घराचे दरवाजे घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यास मदत करतात. वास्तुशास्त्रानुसार, घराचे दरवाजे हे सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश व्हावा आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जावी यांसाठी असणारे मुख्य मार्ग आहेत. दारांमधून घरात ऊर्जा येते, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य, समृद्धी व मानसिक शांती प्रभावित होते. जर कपडे दाराच्या मागे लटकवले, तर ते ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा आणतात, ज्यामुळे घरात नकारात्मकता वाढते, असे मानले जाते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)