Vasubaras Wishes In Marathi: आज वसुबारस, म्हणजेच दिवाळीचा पहिला दिवस. आजपासून खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू झाली. आजच दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो. हिंदू धर्मामध्ये गाईला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. गाईला गोमाता म्हणजेच आई समजून तिचा सेवा केली जाते. असं म्हणतात की, गाईमध्ये ३३ कोटी देवता वास करतात. दिवाळीची खरी सुरुवात गाईची पूजा करून म्हणजेच वसुबारस या सणापासून होते. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच गोवत्स द्वादशीला हा सण साजरा केला जातो. यंदा ५ नोव्हेंबर रोजी वसुबारस साजरा केला जाईल. ‘दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी’ असे म्हणत वसुबारसचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

वसुबारस शब्दाचा अर्थ काय?

हिंदू पंचांगानुसार वसुबारस हा सण अश्विन पक्षातील द्वादशी तिथीला साजरी केला जातो. या दिवशी घरोघरी गाईची आणि वासराची पूजा केली जाते. वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस. त्यामुळे या दिवसाला वसुबारस, असं म्हटलं जातं. हा सण महाराष्ट्रासह भारतातील इतर काही राज्यांमध्येही साजरा केला जातो. या दिवशी घरातील विवाहित स्त्रिया कुटुंबाच्या आणि मुलांच्या कल्याणासाठी गाईची पूजा करतात. तिला नैवेद्य खाऊ घालतात. परंतु, हल्ली शहरात गाईच्या मूर्तीची पूजा केली जाते.

दरम्यान, पौराणिक मान्यतेनुसार समुद्रमंथनातून ज्यावेळी १४ रत्ने बाहेर पडली, त्यातून कामधेनूचीही उत्पत्ती झाली. त्यामुळेच गाईला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. गाईची सेवा केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.

वसुबारस पूजेचा शुभ मुहूर्त

वसुबारसच्या दिवशी द्वादशी तिथीला विशेष महत्त्व असते. या दिवशी पूजा करण्यासाठी पुढीलप्रमाणे मुहूर्त देण्यात आला आहे.

  • द्वादशी तिथी प्रारंभ : ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३५ वाजता
  • द्वादशी तिथी समाप्ती : ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता
  • वसुबारस पूजेचा शुभ मुहूर्त: संध्याकाळी ५:३३ ते रात्री ८:१० पर्यंत

वसुबारसची पूजा कशी करावी?

  • या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
  • स्वच्छ वस्त्र परिधान करून घराबाहेर गोपद्म रांगोळी काढावी.
  • तुमच्या घरी गाई आणि वासरू असेल, तर त्यांची पूजा करावी. परंतु, जर तुम्ही शहरी भागात राहत असाल, तर गाई आणि तिच्या वासराच्या मूर्ती किंवा फोटोची पूजा करावी.
  • गाईला निरांजनाने ओवाळून गाईला पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालावा.

वसुबारसेच्या शुभेच्छा…

गोपूजनाचे महत्त्व आपण साजरे करू, तिच्या कृपेने यशाचे स्वप्न पूर्ण करू. वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा!

गोमातेच्या आशीर्वादाने आपल्या घरात सदा सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो! वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!

वसुबारस हा गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबाला वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!

गाय-वासराच्या प्रेमासारखा स्नेह तुमच्या आणि कुटुंबाच्या नात्यांमध्ये कायम राहो. वसुबारस व गोवत्स द्वादशीच्या हार्दिक शुभेच्छा!