Newly Married Women First Vat Purnima : दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट सावित्री व्रत पाळले जाते. वटपौर्णिमेचे व्रत केल्याने विवाहित महिलांना सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते. वट पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने पती व संततीच्या दीर्घायुष्याचे वरदान लाभू शकते अशीही मान्यता आहे. ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे, अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते. तर यंदा १० जून २०२५ ला म्हणजेच उद्या वटपौर्णिमेचे व्रत केले जाणार आहे. तसेच लग्नानंतरची ज्यांची पहिली वटपौर्णिमा असणार आहे; त्यांच्यासाठी हा दिवस आणखीन खास असणार आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्रत (Vat Purnima 2025 ) ठेवणार असाल, तर पुढील काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे…
वट पौर्णिमा २०२५ तारीख आणि वेळ (Vat Purnima 2025 Date And Time)
कॅलेंडरनुसार, पौर्णिमा तिथी १० जून रोजी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांपर्यंत सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ जून रोजी दुपारी १ वाजून १३ मिनिटांपर्यंत संपेल.
वटपौर्णिमा पूजेचं सामान (Vat Purnima 2025 Puja Samagri)
- वटवृक्षाची प्रतिमा किंवा बेल
- सावित्री आणि सत्यवानचा फोटो
- काळे मणी
- कच्चा धागा
- आरतीचे ताट आणि त्यामध्ये धूप, दिवा, अगरबत्ती, तांदूळ, हळद-कुंकू, चंदनमी धूप, दिवा, नारळ, अगरबत्ती ठेवा.
- फुले व पाच फळे, खायची पाने
- नैवेद्यासाठी मिठाई, बताशा (कोणताही गोड पदार्थ)
- पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर)
- पाण्याने भरलेला तांब्या (कलश)
- वट सावित्री व्रत कथा पुस्तक इत्यादी साहित्य तुमच्याजवळ असेल याची खात्री करा.
वटपौर्णिमा पूजा विधी (Vat Savitri Purnima 2025 Puja Vidhi)
- लग्नानंतरची पहिलीच वटपौर्णिमा असल्याने नवविवाहित महिला फारच उत्सुक असतात. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर घरातील देवपूजा करून नवीन किंवा तुमची आवडती साडी नेसून त्यावर शोभेल असे दागिने घालावे. त्यानंतर तुम्हाला आवड असल्यास मेकअप, कपाळावर टिकली, हातात बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र घालून शृंगार करावा.
- त्यानंतर सुपात पाच पाने आणि त्या पानांमध्ये पाच फळे ठेवा आणि वाण तयार करून घ्या.
- नंतर तुम्ही पूजा करायला जाणार त्या वडाच्या झाडाखालची जागा स्वच्छ करून तिथे पूजेची तयारी करायला सुरुवात करा.
- सावित्री आणि सत्यवानच्या फोटोची पूजा करा आणि वटवृक्षाला पाणी अर्पण करा. त्यानंतर वटवृक्षाला धागा बांधून त्याच्याभोवती ७ वेळा प्रदक्षिणा घाला.
- व्रत कथा ऐका आणि आरती करा.
- तुमची इच्छा असल्यास गरिबांना पैसे, अन्न आणि कपडे दान करा.
- वटपौर्णिमेला तुम्ही निर्जल उपवास सुद्धा ठेवू शकता किंवा निर्जल उपवास ठेवणे शक्य नसल्यास फक्त फळे खाऊ शकता.
- पूजा संपल्यानंतर सासूच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घ्या.
- उपवासाच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नका, खोटे बोलू नका आणि भांडणे टाळा.
- तसेच वडाच्या झाडाला कोणत्याही प्रकारे इजा सुद्धा पोहचवू नका.
- त्यानंतर पाच सुवासिनींना हळद-कुंकू लावा आणि वाण द्या.
अशाप्रकारे तुमची पहिली वटपौर्णिमा साजरी करा