Venus-Saturn Conjunction in Pisces 2026 Impact on Zodiac Signs: होळी म्हणजे केवळ रंगांचा सण नाही, तर अनेकांच्या मते तो नशिबालाही नवा रंग देणारा क्षण असतो. २०२६ मधील होळी काहीशी वेगळी ठरू शकते, अशी चर्चा ज्योतिषी वर्तुळात सुरू आहे. कारण- ४ मार्च रोजी होळीच्या दिवशी शुक्र आणि शनी हे दोन महत्त्वाचे ग्रह मीन राशीत एकत्र येणार असल्याचे सांगितले जाते. हा संयोग अचानक चमत्कार घडवणारा नसून, शांतपणे आणि स्थिरपणे बदल घडवू शकणारा मानला जातो.
ज्योतिष्यांच्या मते, शुक्र हा प्रेम, ऐश्वर्य, पैसा व सुखसोई यांचा कारक ग्रह आहे; तर शनी हा मेहनत, संयम व दीर्घकालीन स्थैर्य यांच्याशी संबंधित मानला जातो. मीन राशीत शुक्र तुलनेने अनुकूल मानला जातो; तर शनी त्याला गांभीर्य व जबाबदारीची जोड देतो. त्यामुळे या काळात दिखाव्यापेक्षा खऱ्या प्रगतीकडे लोकांचा कल वाढू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जाते. विशेषतः ज्या व्यक्ती दीर्घकाळ प्रयत्न करत आहेत; पण त्यांना अपेक्षित फळ मिळत नव्हते. त्यांच्यासाठी हा काळ हळूहळू गती देणारा ठरू शकतो.
होळीपासून ६ राशींवर शुक्र-शनी युतीचा खास प्रभाव
वृषभ
ज्योतिषांच्या मते, या दिवशी वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी करिअरमध्ये नवे दार उघडले जाण्याची शक्यता आहे. तुमच्या कामातील सातत्य आणि शिस्त वरिष्ठांच्या नजरेत भरू शकते. त्यामुळे साहजिकच तुमच्या पदोन्नतीची चर्चा होणे किंवा अतिरिक्त जबाबदारीची संधी निर्माण होणे या बाबींची शक्यता आहे. तसेच आर्थिक स्थितीत सुधारणा जाणवू शकते; मात्र त्याच वेळी घर, सजावट किंवा आरामदायी वस्तूंवरील खर्च वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. योग्य रीतीने नियोजन केल्यास हा काळ दीर्घकालीन स्थैर्य देऊ शकतो.
मिथुन
या दिवशी मिथुन राशीच्या व्यक्तींच्या कौशल्याची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. लेखन, अभिनय, संगीत, डिझाईन यांसारख्या सर्जनशील क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना नवी संधी मिळू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींकरिता मुलाखतींच्या संधी वाढू शकतात. घरातील वातावरणातही सौम्यता येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जुने मतभेद निवळू शकतात.
तूळ
या दिवशी तूळ राशीच्या व्यक्तींनी संयम राखल्यास फायदा होऊ शकतो. कार्यस्थळी स्पर्धा किंवा राजकारण असले तरी शांतपणे आणि नीट नियोजनाने पुढे गेल्यास परिस्थिती अनुकूल होऊ शकते. कुटुंबाकडून आर्थिक किंवा भावनिक पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आरोग्याबाबत दुर्लक्ष टाळावे, अशी सूचना केली जाते.
वृश्चिक
या दिवशी वृश्चिक राशीच्या व्यक्तींची एकाग्रता वाढण्याची शक्यता आहे. शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा दिवस साह्यकारी ठरू शकतो. परदेशात शिक्षण किंवा नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक घडामोडी दिसू शकतात. व्यवसायात पूर्वी आखलेली योजना हळूहळू आकार घेऊ शकते.
मकर
हा दिवस मकर राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. बैठकीत किंवा चर्चेत त्यांचे मत महत्त्वाचे ठरू शकते. आर्थिक बाबतीत स्थिरता येण्याची शक्यता आहे आणि बचतीकडे अधिक लक्ष जाऊ शकते. काही जण साईड बिझनेस किंवा गुंतवणुकीच्या नव्या कल्पनांना मूर्त रूप देण्याचा विचार करू शकतात.
कुंभ
या महत्त्वपूर्ण दिवशी कुंभ राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक व्यवसाय, मालमत्ता किंवा जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. बराच काळ प्रलंबित असलेली कामे होळीनंतर हळूहळू पुढे सरकू शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाल्यास मानसिक ताण कमी होऊ शकतो.
ज्योतिष्यांच्या मते ग्रह केवळ शक्यता निर्माण करतात; अंतिम परिणामासाठी व्यक्तीची कृती, संयम आणि नियोजन महत्त्वाचे असते. त्यामुळे या दिवशी घाईघाईने निर्णय न घेता, शिस्तबद्ध फद्धतीने प्रयत्न केल्यास या संयोगाचा परिणाम अधिक स्पष्टपणे जाणवू शकतो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)

