Taurus Monthly Horoscope for October : राशीचक्रातील दुसरी रास म्हणजे वृषभ रास. वृषभ ही शुक्राची रास आहे आणि शुक्र हा कलेचा , सौंदर्याचा कारक ग्रह आहे. त्यामुळे तुम्हालाही कलेची जाण असते. कलात्मकता, रसिकता आणि नाविन्याची ओढ हे शुक्राचे गुणधर्म तुमच्या राशीतही पुरेपूर दिसून येतात. तुमचे जीवन कसे समृद्ध होईल याकडे तुमचा कल असतो. निर्मितीक्षमता आणि सर्जनशीलता तुमच्यात आढळते. भरपूर काम करणे तुमचा स्थायी भाव, तसाच आराम सुद्धा तुम्हाला मनापासून आवडतो. जे चांगले, उत्तम ते तुम्हाला हवे असा तुमचा ध्यास असतो.
तुमच्या वागण्या- बोलण्यात सहजता आणि आपलेपणा असतो. तुम्ही समूहात सर्वांना हव्याहव्याशा वाटता. तुमच्या असण्याने घरात जिवंतपणा आणि चैतन्य असते. परिस्थितीची चाचपणी करून तुम्हाला काम योग्यप्रकारे साधता येते. तुम्हाला नाविन्याची आस असते. सतत काही ना काही करण्यात तुम्ही मग्न असता. कामाच्या वेळी भरपूर काम आणि आरामाच्या वेळी भरपूर आरामही तुम्ही करता. स्वतःचे जीवन सुखी आणि संपन्न करण्याकडे तुमचा कल असतो. तुम्ही खऱ्या अर्थाने जीवनाचा उपभोग घेता. वेळप्रसंगी कष्ट सोसायची देखील तुम्ही तयारी असते. तर अशा दीर्घोद्योगी, आशावादी आणि व्यवहारकुशल अशा या वृषभ राशीला ऑक्टोबर महिना कसा जाणार जाणून घेऊ…
वृषभ राशीचे ऑक्टोबर महिन्याचे राशिभविष्य (taurus october 2026 horoscope)
या महिन्यातील पितृपक्षात महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ येईल. ११ ऑक्टोबरला घटस्थापनेच्या दिवशी कला, क्रीडा, न्याय क्षेत्रात मोठे नाव कमवाल. विद्यार्थ्यांना अभ्यास आणि परीक्षा यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. उत्तम मार्गदर्शनाचा लाभ मिळेल. नोकरी व्यवसायात जोखीम पत्करून आर्थिक समस्या सोडवाल. विवाहासंबंधीत चर्चा यशस्वी होतील.
दसऱ्याच्या दिवशी भाग्याचे दरवाजे उघडतील. गुंतवणूकदारांना भरघोस लाभ संभवतो. गुरुची साथ चांगली मिळेल. प्रवासाची दगदग होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे ताण तणाव वाढेल. वेळेचे योग्य नियोजन करणे गरजेचे ठरेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका. वैद्यकीय सल्ला उपयोगी पडेल. ३१ ऑक्टोबरला गुरू चतुर्थातील सिंह राशीत प्रवेश करेल. गुरुबल कमजोर होईल.
असा वृषभ राशीचा ऑक्टोबर महिना असणार आहे.
