Maha Shivaratri Date Time Puja Muhurat: दरवर्षी शिवभक्त महाशिवरात्रीची आतुरतेने वाट बघतात. त्यामुळेच हिंदू धर्मात महाशिवरात्र खूप महत्त्वपूर्ण मानली जाते. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्र १५ फेब्रुवारी (रविवारी) रोजी साजरी केली जाईल. त्या दिवशी महादेवांची मनोभावे पूजा-आराधना केली जाते. जो भक्त या दिवशी व्रत करून महादेवाचे मनोभावे स्मरण करतो, त्याच्यावर महादेव नेहमी प्रसन्न असतात.

महाशिवरात्र तिथी

महाशिवरात्र तिथीची सुरुवात : १५ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ०५ वाजून ०४ मिनिटांनी सुरू होईल.
महाशिवरात्र तिथीची समाप्ती : १६ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ०५ वाजून ३४ मिनिटांपर्यंत असेल.

१५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत केले जाईल आणि १६ फेब्रवारी रोजी त्याचे पारण केले जाईल.

महाशिवरात्र जलाभिषेक शुभ मुहूर्त

प्रथम प्रहर पूजा – १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजून ११ मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून २२ मिनिटांपर्यंत असेल.

द्वितीय प्रहर पूजा – १५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजून २३ मिनिटांपासून ते १६ फेब्रुवारी मध्यरात्री १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत असेल.

तृतीय प्रहर पूजा- १६ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजून ३५ मिनिटांपासून ते पहाटे ३ वाजून ४६ मिनिटांपर्यंत असेल.

चौथ्या प्रहराची पूजा- १६ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजून ४६ मिनिटांपासून ते सकाळी ६ वाजून ५९ मिनिटांपर्यंत असेल.

महाशिवरात्री का साजरी केली जाते?

एका पौराणिक कथेनुसार, भगवान शंकर आणि पार्वती यांचा ज्या दिवशी विवाह झाला, तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस, असे म्हटले जाते. तसेच या दिवसाबद्दल अजून एक कथा प्रचलित आहे. ती गोष्ट म्हणजे ‘समुद्रमंथनाची’ कथा. या कथेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराने समुद्रमंथनातून निघालेले विष प्राषन करून सृष्टीचे रक्षण केले होते.

महाशिवरात्रीचा पूजा विधी

  • या दिवशी ब्राह्म मुहूर्तावर स्नान करून घरातील पूजेच्या ठिकाणी घरातील शिवावर पाणी आणि पंचामृताने अभिषेक करावा.
  • त्यानंतर अक्षता, पान, सुपारी, चंदन, लवंग, वेलची, भस्म, धतुरा, बेलपत्र, कमलगट्टा, सफेद फूल इत्यादी देवाला अर्पण करावे.
  • शिवलिंगासमोर धूप, दीप लावून आरती करून घ्यावी.
  • त्यानंतर महादेवाच्या स्तोत्रांचे आणि मंत्रांचे पठण करावे.

महाशिवरात्रीचे महत्त्व

महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भाविक उपवास करतात, शंकराची पूजा करतात. हा दिवस केवळ आपल्या भारत देशातच नव्हे, तर नेपाळ आणि इतर दक्षिण आशियाई देशांमध्येदेखील साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या उत्सवाबद्दल प्रचलित असलेल्या विविध पौराणिक कथांप्रमाणेच शिवरात्रीच्या नृत्य परंपरेलाही खूप महत्त्व आहे. इतकेच नाही, तर त्याला थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमीदेखील आहे. महाशिवरात्रीला कोणार्क, खजुराहो, पट्टाडकल, मोढेरा व चिदंबरम यांसारख्या प्रमुख हिंदू मंदिरांमध्ये वार्षिक नृत्य उत्सव आयोजित करण्यात येतो.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)