Financially Smart Women Numerology: प्रत्येकाला वाटतं आपल्या आयुष्यात पैशांची कधीच कमतरता भासू नये. कमाई वाढावी, योग्य वेळी पैसा उपयोगी पडावा आणि भविष्य सुरक्षित असावं; पण वास्तव वेगळंच असतं. सर्वांनाच पैसा कमावणं जमतं, मात्र तो टिकवणं आणि योग्य ठिकाणी वापरणं प्रत्येकाला जमतंच असं नाही. इथेच काही लोक इतरांपेक्षा वेगळे ठरतात… आणि यामागे एक रोचक कारण सांगितलं जातं अंकशास्त्र!

अंकशास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्मतारखेवरून निघणारा मूलांक तिच्या स्वभावावर, निर्णयक्षमतेवर आणि आर्थिक वर्तनावर काही प्रमाणात प्रभाव टाकतो अशी मान्यता आहे. विशेषतः काही मूलांक असलेल्या मुली पैशांच्याबाबतीत अधिक शहाणपणाने निर्णय घेतात, अशी शक्यता व्यक्त केली जाते. कोणत्या आहेत त्या जन्मतारखा? चला, जाणून घेऊया…

मूलांक ५ : नियोजनबद्ध आणि व्यवहारकुशल

ज्या मुलींचा जन्म ५, १४ किंवा २३ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ५ मानला जातो. या मुली व्यवहारकुशल आणि वास्तववादी असतात. त्या केवळ पैसा कमावण्यावर लक्ष केंद्रित करत नाहीत, तर तो योग्य ठिकाणी गुंतवण्यावर भर देतात.

दीर्घकालीन नियोजन करण्याची त्यांची क्षमता चांगली असते. खर्च करण्यापूर्वी अनेकदा विचार करण्याची सवय त्यांना असते, त्यामुळे आर्थिक स्थैर्य टिकवण्याची शक्यता अधिक असते असं मानलं जातं.

मूलांक ८ : कमाईसोबत पैसा वाढवण्याची कला

मूलांक ८ असलेल्या मुली (८, १७, २६ तारखेला जन्मलेल्या) पैसा कमावण्याबरोबरच तो वाढवण्यातही कुशल मानल्या जातात. त्यांना ऐश्वर्य आवडतं, पण खर्च करताना त्या नियोजन पाळतात.

त्यांच्याकडे बचत आणि गुंतवणुकीचा समतोल राखण्याची क्षमता असते; अशा मुली दीर्घकाळ उत्पन्न देणारे निर्णय घेतात अशी धारणा आहे. उदाहरण म्हणून अनन्या बिर्ला यांचं नाव घेतलं जातं; त्यांची आर्थिक समज आणि ब्रँड व्यवस्थापन कौशल्य यासाठी त्या ओळखल्या जातात.

मूलांक १ : जोखीम घ्यायची तयारी, पण हिशोबी पद्धतीने

१, १०, १९ किंवा २८ तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक १ असतो. या मुली आत्मविश्वासू आणि धोरणात्मक विचार करणाऱ्या असतात. त्या जोखीम घ्यायला घाबरत नाहीत, पण ती जोखीम हिशोबाने घेतात.

व्यवसायिक दृष्टिकोन आणि दीर्घकालीन दृष्टिकोन यामुळे मोठा आर्थिक पाया उभारण्याची क्षमता त्यांच्यात असते असं मानलं जातं. यासाठी नीता अंबानी यांचं उदाहरण अनेकदा दिलं जातं.

मूलांक ४ : संधी ओळखणाऱ्या, पण खर्चावर नियंत्रण गरजेचं

४, १३, २२ किंवा ३१ तारखेला जन्मलेल्या मुली मूलांक ४ मध्ये येतात. या मुली करिअरमध्ये नवीन संधी पटकन ओळखतात आणि पैसे कमावण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधतात.

मात्र, अचानक होणारा खर्च ही त्यांची कमकुवत बाजू मानली जाते. जर त्यांनी यावर नियंत्रण ठेवलं, तर आर्थिक प्रगती मोठ्या प्रमाणात होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जाते.

शेवटी एक महत्त्वाची गोष्ट…

अंकशास्त्र हे निश्चित भविष्य सांगत नाही, तर केवळ काही प्रवृत्तींचा अंदाज व्यक्त करतं. एखादी जन्मतारीख तुम्हाला श्रीमंत किंवा गरीब बनवत नाही; खरा फरक पडतो तो तुमच्या सवयी, शिस्त आणि निर्णयांमुळे.

म्हणूनच या सर्व गोष्टींकडे केवळ एक शक्यता म्हणून पाहणं योग्य ठरतं. पण, तरीही… तुमची जन्मतारीख या यादीत आहे का?

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)