Which mulank are good at saving money : अंकशास्त्रानुसार, काही मूलांक असे आहेत जे प्रत्येक पैशाच्या बाबतीत अत्यंत काटेकोर मानले जातात. या लोकांना उधळपट्टीचा तिरस्कार असतो आणि ते आपले पैसे खूप काळजीपूर्वक गुंतवतात. या अंकांमध्ये पहिला मूलांक ४ आणि दुसरा ८ हा आहे. ही मंडळी पैशाच्या बाबतीत खूप संवेदनशील मानली जातात. चला तर या मूलांकाबद्दल अधिक जाणून घेऊयात…

मूलांक ४ (४, १३, २२ किंवा ३१ )

मूलांक ४ चा अधिपती ग्रह राहू आहे. जसा राहू गूढ आहे, त्याचप्रमाणे ही मंडळी रहस्यमय असतात. ही मंडळी पैशाच्या बाबतीत अत्यंत शिस्तप्रिय असतात, पैसे हुशारीने खर्च करतात. अत्यंत आवश्यक असल्याशिवाय पैसे खर्च करणे टाळतात. स्वतःवर खर्च करण्यासही कचरतात. त्यांना नेहमी भविष्याची चिंता असते, म्हणून ते भविष्यासाठी पैसे वाचवतात. मात्र, पैसे वाचवण्याचा हाच गुण त्यांना श्रीमंत होण्यासही मदत करतो. या मूलांकाचे बहुतेक लोक आपल्या पैशांचा हिशोब ठेवण्यासाठी डायरी ठेवतात, डिजिटल ॲप वापरतात. जर तुम्ही कधी त्यांच्याकडून पैसे उधार घेण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही अयशस्वी होऊ शकता. त्यांच्या खिशातून पैसे काढणे म्हणजे हातातून लोणी काढण्यासारखे आहे.

मूलांक ८ (८, १७ किंवा २६)

या मूलांकाचा अधिपती ग्रह शनी आहे. शनीला एक गंभीर, शिस्तप्रिय देवता मानले जाते. शनीप्रमाणेच, मूलांक ८ असलेले लोकही जीवनात आणि आर्थिक बाबतीत शिस्तप्रिय असतात. अनावश्यक खर्च टाळतात, त्यांची ही सवय इतरांना कंजूसपणा वाटू शकते. पण, पैसे वाचवण्यामागे त्यांचा हेतू आपले भविष्य सुधारणे हा असतो. गरजेनुसार पैसे खर्च करतात. पण, जर कोणी त्यांना अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करण्यास सांगितले तर ते मागे हटतात. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी, ते मैत्री टाळतात, जे लोक पैसे उधार घेण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून अंतर ठेवतात. पैसे वाचवण्याचा हा गुण त्यांना श्रीमंतही बनवतो.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही..)