Zodiac Signs Who Love To Argue: तुमच्या मित्रपरिवारात किंवा कुटुंबात अशी एखादी व्यक्ती नक्कीच असेल, ज्यांना छोटीशी गोष्टही मोठी चर्चा किंवा वादाचा विषय बनवायची सवय असते. एखादी साधी गोष्ट सांगितली तरी त्यावर लगेच तर्क-वितर्क सुरू होतात. विषय संपण्याऐवजी चर्चा आणखी लांबत जाते.

काही लोक शांतपणे प्रत्येक परिस्थिती हाताळतात, तर काहींना प्रत्येक गोष्टीमागचं ‘लॉजिक’ शोधून त्यावर आपली बाजू मांडायला आवडते. ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींच्या व्यक्तींमध्ये वादविवाद करण्याची प्रवृत्ती तुलनेने अधिक असल्याचे मानले जाते. अर्थात, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. मात्र या ३ राशींमध्ये प्रत्येक गोष्टीवर आपलं मत मांडण्याची आणि तर्क करण्याची प्रवृत्ती दिसू शकते. तर मग जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या राशी…

मिथुन राशी: बोलण्यात माहिर, प्रत्येक मुद्द्याला दुसरी बाजू!

मिथुन राशीचा संबंध बुध ग्रहाशी जोडला जातो. बुध हा संवाद, बुद्धिमत्ता आणि तर्काचा कारक मानला जातो. त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना बोलायला, चर्चा करायला आणि आपलं मत मांडायला आवडतं. एखाद्या छोट्याशा मुद्द्यावरही हे लोक लगेच दुसरी बाजू शोधू शकतात. समोरच्याने आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न केला, तरी मिथुन राशीची व्यक्ती त्यात आणखी एक मुद्दा काढू शकते.

विशेष म्हणजे, त्यांच्या दृष्टीने प्रत्येक चर्चा म्हणजे भांडण असेलच असं नाही. वादविवाद हा संवादाचा एक भाग आहे, असं त्यांना वाटू शकतं. त्यामुळे समोरच्याला चर्चा संपवायची असली तरी मिथुन राशीच्या व्यक्तीचा ‘पण माझं म्हणणं ऐकून घे…’ हा सिलसिला सुरूच राहू शकतो. नातेसंबंधांमध्येही एखाद्या छोट्या मुद्द्यावरून मोठी चर्चा रंगण्याची शक्यता असते.

कन्या राशी: प्रत्येक गोष्टीत दिसते चूक

कन्या राशीचाही संबंध बुध ग्रहाशी जोडला जातो. या राशीच्या व्यक्ती बारकाईने निरीक्षण करणाऱ्या आणि परिपूर्णतेला महत्त्व देणाऱ्या मानल्या जातात. घरातील एखादं काम असो किंवा ऑफिसमधील एखादी गोष्ट, कुठे थोडीशी चूक किंवा कमतरता दिसली की त्यांचं लक्ष लगेच तिकडे जातं. त्यानंतर सुरू होतो ‘हे असं केलं असतं तर अजून चांगलं झालं असतं’ असा सल्ल्यांचा सिलसिला!

कन्या राशीच्या व्यक्तींना वाटतं की त्या समोरच्याला सुधारण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी बोलत आहेत. मात्र समोरच्या व्यक्तीला त्याच गोष्टीचा ‘किच-किच’ किंवा सतत टोमणे असा अनुभव येऊ शकतो. त्यांच्या बोलण्यात अनेकदा तर्क आणि कारणं असतात. त्यामुळे स्वतःची बाजू पटवून देताना त्या सहज माघार घेत नाहीत. परफेक्शनच्या नादात छोट्या गोष्टीवरून चर्चा वाढू शकते.

वृश्चिक राशी: मनाला लागलं की विषय संपत नाही!

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना ज्योतिषशास्त्रात जिद्दी, भावनिकदृष्ट्या तीव्र आणि मजबूत इच्छाशक्तीच्या मानलं जातं. या राशीवर मंगळाचा प्रभाव मानला जात असल्यामुळे त्यांच्यात जोश आणि आक्रमकपणा दिसू शकतो. एखाद्याचं बोलणं मनाला लागलं किंवा स्वतःच्या स्वाभिमानाला धक्का बसल्यासारखं वाटलं, तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं त्यांना सहज जमत नाही. छोटी गैरसमजूतही कधी कधी मोठ्या चर्चेचं कारण बनू शकते. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास, संशय किंवा गैरसमज यांसारख्या गोष्टी आल्या तर वृश्चिक राशीच्या व्यक्तींची प्रतिक्रिया तीव्र होऊ शकते. स्वतःची बाजू योग्य असल्याचं वाटत असेल तर त्या आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याची शक्यता असते. त्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तीशी एखाद्या संवेदनशील विषयावर चर्चा करताना शब्द जपून वापरणं आणि गैरसमज लगेच दूर करणं फायदेशीर ठरू शकतं.

राशीवरून व्यक्तीचा स्वभाव ठरतो का?

ज्योतिषशास्त्रात ग्रह-राशींच्या आधारे व्यक्तिमत्त्वाबाबत काही मान्यता सांगितल्या जातात. मात्र प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव केवळ राशीवर अवलंबून नसतो. व्यक्तीचं संगोपन, अनुभव, परिस्थिती आणि व्यक्तिमत्त्व यांचाही त्यावर मोठा प्रभाव असतो. त्यामुळे तुमच्या ओळखीची व्यक्ती यापैकी एखाद्या राशीची असेल, तर तिच्या प्रत्येक वादाचं कारण फक्त राशीला देणं योग्य ठरणार नाही.