भाऊसाहेब आजबे

दिल्लीतील आप-विजयाचे कौतुक अनेकांना असेलही; पण मोदी यांच्या भाजपने २०१४ पेक्षाही अधिक मोठा निवडणूक-विजय २०१९ मध्ये मिळवला होता, ही वस्तुस्थिती त्यामुळे झाकोळत नाही. त्या मोठय़ा विजयाची रोचक चिकित्सा करणाऱ्या पुस्तकाविषयी..

Why did Sunetra Pawar say The relationship will improve after the election
सुनेत्रा पवार का म्हणाल्या… निवडणुकीनंतर नात्यात सुधारणा होईल
Bhim Army Chandrasekhar Azad
भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद सपा आणि बसपाच्या उमेदवारांना टक्कर देणार; नगीना मतदारसंघ कोण जिंकणार?
Rahul Gandhi
पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी इच्छुक?
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका

सन २०१४ची लोकसभा निवडणूक ही तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) सरकारविरोधात पेटत गेलेला राग आणि ‘अच्छे दिन’ची आशा यांच्यातील सरळ सामन्यासारखी होती. तेव्हा बदल होईल हे अपेक्षितच होते. पण जो बदल झालो तो आश्चर्यचकित करणारा होता. त्यामुळेच अनेक निरीक्षक, तज्ज्ञ त्या निवडणुकीकडे ‘क्वचित कधी तरी घडणारी घटना’ (ब्लॅक स्वान इव्हेंट) म्हणून पाहात होते. म्हणजे  २०१९च्या निवडणुकीत २०१४च्या निकालाची पुनरावृत्ती होणार नाही असा त्यांचा होरा होता. शिवाय २०१९चा संदर्भ पूर्णत: वेगळा होता. ‘अच्छे दिन’ तर नाहीच, पण बेरोजगारीच्या प्रमाणाने गेल्या ४५ वर्षांतील उच्चांक गाठला होता, शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती बदललेली नव्हती, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे जीडीपीचा दर कोसळला होता. तर दुसरीकडे डिसेंबर २०१८ मध्ये भाजपशासित राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये सत्ताबदल होऊन काँग्रेस सत्तेत आले होते. परिणामी भाजपला या निवडणुकीत फटका बसेल असा अंदाज होता. २२०च्या पलीकडे भाजप जाणार नाही असा काँग्रेसच्या धुरीणांसह, के. चंद्रशेखर राव यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्यांना विश्वास होता. प्रत्यक्ष २३ मे या निकालाच्या दिवशी, भाजपला तब्बल ३०३ जागा मिळाल्या!

ऑगस्ट-सप्टेंबर २०१८ मध्ये भाजपने पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखाली देशभरात जवळपास साडेपाच लाख मतदारांचे सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणाअंती भाजपला २९७ ते ३०३ जागा मिळतील असे भाकीत करण्यात आले होते. हे भाकीत खरे कसे काय ठरले याचे तपशिलात उत्तर हवे असेल, तर राजदीप सरदेसाई यांचे ‘२०१९ : हाऊ मोदी वन इंडिया?’ (मोदींचा विजय कसा झाला) हे पुस्तक वाचायला हवे.

खासगी वृत्तवाहिन्या भारतात सुरू झाल्या तेव्हापासून म्हणजे गेली २५ वर्षे इंग्रजी वृत्तवाहिनीवर आपण पाहात असलेला चेहरा म्हणजे राजदीप सरदेसाई. दिल्लीतील सत्ताकेंद्रात जसा त्यांचा वावर आहे तसा प्रत्यक्ष जमिनीशीही त्यांचा तितकाच संबंध आहे. राजकीय घडामोडींशी असा पक्का सांधा असल्यामुळे त्यांची या घडामोडींकडे पाहण्याची दृष्टी समग्र, साकल्याची आहे. ती दृष्टी या पुस्तकातही दिसते. स्वत: राजदीप उदारमतवादी दृष्टिकोन असणारे आहेत. पण त्यांचा हा दृष्टिकोन त्यांच्या कथनाच्या आड येत नाही. सर्व घटकांना त्यांनी पुरेसा अवकाश दिला आहे.

पुस्तकातील लेखन विश्लेषणात्मक निबंधांसारखे नसून हा घडलेल्या घटनांचा वृत्तांत आहे, घटनांना प्रभावित करणारे सूत्रधार आहेत, सत्तावर्तुळातील व्यक्तींशी झालेली संभाषणे आहेत, आनुषंगिक सर्वेक्षणे आणि आकडेवारीचा माफक तपशील आहे. यात भाजपच्या यशाचे सूत्र जसे सापडते तसेच विरोधकांच्या अपयशाची कारणमीमांसाही दिसते.

२०१४ची निवडणूक जिंकल्यानंतर भाजपने अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली लगेच २०१९च्या निवडणुकीची सुरुवात केली. पाच वर्षांतील राजकीय चढउतार, महत्त्वाच्या घटना, निवडणुका या सर्वाचा संदर्भ २०१९च्या निवडणुकीला असल्यामुळे पाच वर्षांचे राजकीय प्रवासवर्णन या पुस्तकात आहे. ते सुरू होते अमेरिकेतून..

सप्टेंबर २०१४ मध्ये अमेरिकेतील मॅडिसन स्क्वेअर इथे मोदींनी, त्या देशात स्थायिक झालेल्या भारतीयांना संबोधित केले. त्या वेळी लेखक तिथे उपस्थित होते. वातावरण कसे मोदीमय होते याचा वृत्तांतसुद्धा त्यांनी पुस्तकात दिला आहे. इथेच राजदीप यांना धक्काबुक्की झाली होती त्याचे वर्णन पुस्तकात सौम्यपणेच करतात. तक्रारीचा सूर लावत नाहीतच, उलट ‘परिस्थिती समजून घेण्यात मी कमी पडलो’ असे म्हणतात. ‘फक्त मोदीच – आम्ही मोदीमय’ ही स्थिती काही केवळ मॅडिसन स्क्वेअरच्या अमेरिकी भारतीयांची नव्हती. कशी, ते दुसऱ्या टोकाच्या प्रसंगातून राजदीप सांगतात. राय बरेली इथे एक ८० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मतदार आजी निवडणूक अधिकाऱ्याशी वाद घालत असतात. त्यांना मोदींना मत द्यायचे असते, पण मोदींचे नाव वा फोटो मतदानयंत्रावर त्यांना दिसत नाही. असा लोकांचा मनोअवकाश मोदींनी पाच वर्षे व्याप्त केला. यालाच लेखक ‘‘टिमो’ (देअर इज मोदी ओन्ली) फॅक्टर’ असे म्हणतात. या ‘टिमो’ घटकाचा प्रभाव कायम राहिल्याचे का दिसले, त्याला यश का व कसे मिळाले याचा लेखाजोखा या पुस्तकात आहे. त्यापैकी एक लिहिण्यास नाजूक भाग असा की, ‘मोदींना पर्याय नाही’ अशी जनभावना तयार होण्यामागे मोदींचे करिश्मा असणारे व्यक्तिमत्त्व जसे आहे तशीच, तो करिश्मा टिकवून ठेवणारी यंत्रणादेखील आहे. ही यंत्रणा मोदींना पर्याय उभा राहू नये म्हणून नियोजनबद्ध रीतीने विरोधकांचे – विशेषत: राहुल गांधींचे चारित्र्यहनन करण्याचे कामही करते. या यंत्रणेवर नियंत्रण ठेवणारा सारथी म्हणजे अमित शहा.

१९८२ साली मोदी ३२ आणि शहा १८ वर्षांचे असताना त्यांची पहिल्यांदा भेट झाली. काँग्रेसचे गुजरातमध्ये वर्चस्व असण्याचा तो काळ. १९८७ मध्ये दोघांनी मिळून अहमदाबाद पालिकेच्या निवडणुकीत भाजपला यश मिळवून दिले. निवडणूक यंत्रणा प्रभावीपणे राबवण्याचा त्यांचा तो पहिला अनुभव. मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर गृह खात्यासह इतर अनेक खाती अमित शहा यांच्याकडे होती. (त्या वेळी गृहमंत्री या नात्याने त्यांनी नेमकी काय भूमिका पार पाडली याचा अत्यंत सविस्तर धांडोळा राजदीप घेत नाहीत, ते काम ‘गुजरात फाइल्स’ (राणा अयुब) या पुस्तकाने यापूर्वीच केलेले आहे!) राजदीप यांचे पुस्तक सांगते की, दोघांची जुळून आलेली ‘केमिस्ट्री’ हे भाजपच्या २०१९च्या यशामागचे एक प्रमुख कारण आहे.

नरेंद्र मोदी यांचा वाराणसीतील ‘रोड शो’ (वर) आणि विजयानंतर मुखवटाधारी कार्यकर्ता (खाली)

निवडणूक यंत्रणेसाठी पसा हे इंधन आहे. एका आकडेवारीनुसार २०१९च्या लोकसभा निवडणुकीत २७ हजार कोटी खर्च केले गेले. त्यापैकी तब्बल ४५ टक्के (सुमारे १२ हजार कोटी रु.) हा एकटय़ा भाजपचा प्रचार-खर्च आहे. फेसबुक, गूगल जाहिराती, टीव्ही, वर्तमानपत्रातील जाहिराती, उमेदवारांना भाजपने दिलेले पैसे यांची कोटीची कोटी उड्डाणे पाहता पक्ष सधन असण्याचा भाजपला फार मोठा लाभ मिळतो यात शंका नाही. २०१९ची निवडणूक ही ‘निवडणूक रोखे’ योजनेद्वारे गुप्तदानाला अधिकृत प्रतिष्ठा दिल्यानंतरची पहिलीच लोकसभा निवडणूक होती. या निवडणुकीआधी काँग्रेसला मिळालेल्या अधिकृत  देणग्या भाजपच्या १० टक्केही नाहीत यावरून असमतोल लक्षात यावा. याचा थेट परिणाम निवडणुकीवर दिसतो. याचे एक उदाहरण म्हणजे लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात भाजपचे सरासरी ३००-४०० फलक (होìडग) होते; तुलनेत काँग्रेसचे ३० ते ४०च्या वर नव्हते. काँग्रेसला निधीअभावी स्टीव्ह जार्डिग या रणनीतीकाराची इच्छा असूनही निवडणुकीत मदत घेता आली नाही.

‘मीडिया’शिवाय मोदींना त्यांचा करिश्मा टिकवून ठेवता आला नसता. आपल्या विरोधात बातम्या देणाऱ्या वाहिन्या-वर्तमानपत्रांच्या जाहिराती बंद करणे, त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांत सहभागी न होणे, माहिती व नभोवाणी मंत्रालयाने दररोज पत्रकारांच्या विश्लेषणाचे, ट्वीटचे अहवाल तयार करणे, आपल्याला अनुकूल वाहिनीच्या मालकाला खासदारपद देणे आदी मार्गानी मोदींनी बहुतांशी मीडियाला मुठीत ठेवले आहे, ही माहिती पुस्तकात आहे, हे विशेष.

पत्रकार परिषद न घेण्याचा मार्ग अवलंबून मोदींनी आपल्याला अडचणीत आणण्याचा मार्गही बंद केला आहे.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर भाजपकडून केला जातो. ‘नमो अ‍ॅप’, ट्विटरवरील फेक अकाऊंट, फेसबुकवरील असंख्य पेजेस, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, एकटय़ा बंगालमध्ये ५० हजारांपेक्षा अधिक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप भाजपने तयार केले आहेत, असे या पुस्तकात नमूद आहे. यांच्या माध्यमातून दर क्षणाला भाजपचा प्रचार चालू असतो. सरकारचे गुणगान आणि विरोधकांविषयी अपप्रचार या माध्यमातून अखंडपणे केला जातो. याचबरोबर प्रत्यक्ष जमिनीवरील यंत्रणेचीही पक्की बांधणी भाजपने केली आहे. कार्यकर्त्यांचे विस्तृत जाळे, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी पन्नाप्रमुख, ‘टेलीकॉिलग’ची व्यवस्था अशी भक्कम यंत्रणा भाजपने उभारलेली आहे. विविध योजनांच्या २२ कोटी लाभार्थीपर्यंत थेट ही यंत्रणा पोहोचली. थोडक्यात मतदारांच्या मनात काय चालले आहे हे पाहणे ते त्यांच्या मनात आपल्याविषयी सकारात्मक भाव निर्माण करणे आणि विरोधकांविषयी नकारात्मक भाव निर्माण करणे यासाठीची यंत्रणा भाजपने उभी केली आहे. भाजपने २०१९च्या निवडणुकीसाठी १२० असे मतदारसंघ शोधले होते जे २०१४च्या निवडणुकीत त्यांनी जिंकले नव्हते, पण ते जिंकण्याचा निर्धार केला होता.. प्रत्यक्षात यापैकी ८२ मतदारसंघांत भाजपचे उमेदवार उभे राहिले आणि त्यातील ५६ निवडून आले. भाजपच्या नियोजनबद्ध प्रयत्नांचे हे एक उदाहरण! अशी आकडेवारीसह उदाहरणे पुस्तकात अनेक ठिकाणी आहेत.

दुसरीकडे विरोधकांमध्ये एकीचा अभाव. विरोधकांमध्ये असा एकही चेहरा नाही जो मोदींच्या तोडीस तोड असेल. काँग्रेसबाबत संघटनात्मक मरगळ, अंतर्गत सुंदोपसुंदी, जमिनीवरील स्थितीविषयी नेत्यांनी राहुल गांधींची केलेली दिशाभूल, त्यांचे चुकलेले अंदाज याचाही भाजपला  अर्थात लाभ झाला. विरोधी पक्ष निवडणूक ही त्या-त्या मतदारसंघातील स्थानिक उमेदवाराची आहे असे समजत होते, तर भाजप प्रत्येक मतदारसंघात मोदीच उभे आहेत असे चित्र निर्माण करत होता. यात मोदींचा विजय होणे अटळ होते.

याचा अर्थ मोदी-शहा कायम अजिंक्य आहेत असा मात्र नाही. लोकसभेपूर्वीच्या तीन िहदी भाषिक राज्यांनी आणि लोकसभेनंतरच्या महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड विधानसभा निवडणुकांनी ते दाखवले आहे. या निवडणुकांचा संदर्भ पुस्तकात आहे, ही एक जमेची बाजू. (दिल्ली निवडणुकीत हेच पुन्हा दिसले असले, तरी पुस्तक नोव्हेंबर २०१९चे आहे!) राज्यांमधील निवडणूक स्थानिक प्रश्नांवर लढल्यास आणि राज्यात सक्षम नेतृत्वाचा पर्याय असल्यास मोदी-शहांची जादू निवडणुकीत चालत नाही हेच यातून अधोरेखित झाले आहे. मोदी-शहांच्या विरोधात टक्कर ही ‘२४ तास, सातही दिवस’ चालणारे पूर्णवेळ राजकारण आणि सक्षम यंत्रणा उभी केल्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही हे मात्र नक्की.

मात्र ते राजकारण कसे हवे हा या पुस्तकाचा विषय नाही. मोदी-शहांच्या राजकारणाच्या बहुआयामी स्वरूपावर अत्यंत रोचक पद्धतीने हे पुस्तक प्रकाश टाकते. त्यातूनच, त्यांच्या राजकारणाला शह देण्याच्या शक्यता आणि आव्हानेही ते अधोरेखित करते. विशेषत:, लोकसभा निवडणुकीच्या आगे-मागे झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने या शक्यता आणि आव्हाने सूचकपणे वाचकांपर्यंत पोहोचतात.

‘२०१९ – हाऊ मोदी वन इंडिया’

लेखक :  राजदीप सरदेसाई

प्रकाशक :  हार्पर इंडिया

पृष्ठे: ३९२ , किंमत : ५१९ रुपये