आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्षभरात ज्या साहित्य पुरस्कारांकडे लेखक-प्रकाशक-वाचकांचे लक्ष लागलेले असते, त्यापैकी ‘आंतरराष्ट्रीय डब्लिन साहित्य पुरस्कार’ हा एक. पुरस्काराच्या प्रवेशिका पाठविण्याची पद्धती व त्याच्या भरघोस सन्मानवृत्ती (तब्बल ७५ लाख रुपये)मुळे चर्चेत असणाऱ्या या पुरस्कारासाठीची पहिली नामांकन यादी दरवर्षी शेवटच्या तिमाहीत जाहीर होते. तोच शिरस्ता राखत यंदाची पहिली यादी नुकतीच जाहीर झाली. मूळ इंग्रजी किंवा इंग्रजी अनुवादित नव्या कोऱ्या कादंबऱ्यांतून निवडलेल्या १५० कादंबऱ्यांच्या या लांबोडक्या यादीत यंदा चार भारतीय लेखकांच्या कादंबऱ्यांनी स्थान पटकावले आहे.

डब्लिन हे आर्यलडच्या राजधानीचे शहर. तिथल्या महानगरपालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे यंदाचे २३ वे वर्ष. गेल्या २२ वर्षांत १३ वेळा मूळ इंग्रजी कादंबऱ्या, तर नऊ वेळा इंग्रजी अनुवादित कादंबऱ्यांवर या पुरस्काराची मोहोर उमटली आहे. दरवर्षी तब्बल १७७ देशांत पसरलेल्या ४०० सार्वजनिक ग्रंथालयांकडून या पुरस्काराच्या प्रवेशिका भरल्या जातात. नवी दिल्लीच्या ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर लायब्ररी’कडून पाठविलेल्या प्रवेशिकांतून यंदा दोन कादंबऱ्यांची निवड झाली आहे. त्यातली पहिली आहे- सुदिप्त दास यांची प्रेमकथा आणि विज्ञानकथा यांचा मेळ घालत लिहिलेली ‘द एक्स्ट्रॉ टेरेस्ट्रियल डिलिव्हरी’; तर दुसरी कादंबरी- नमिता गोखले यांची ‘थिंग्ज टू लीव्ह बीहाइन्ड’, त्यांच्या ‘हिमालयन’ कादंबरीत्रयीतील शेवटची असणारी ही कादंबरी  मिथके आणि वास्तव यांच्यातील द्वंद्व मांडणारी आहे.

भारतातून अधिकृतरीत्या गेलेल्या या दोन कादंबऱ्या. परंतु त्याव्यतिरिक्त आणखी दोन सर्वार्थाने भारतीय म्हणाव्या अशा कादंबऱ्या या यादीत आहेत. भारतीय वंशाचा युवा अमेरिकन कादंबरीकार करण महाजन याची दिल्लीकेंद्री कथानक असलेली ‘द असोशिएशन ऑफ स्मॉल बॉम्बस्’ आणि मुंबईतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या जीवनाचा वेध घेणारी मूळ मुंबईकर असलेल्या व आता कॅनडात वसलेल्या अनोश इराणीची ‘द पार्सल’- या त्या दोन कादंबऱ्या. दोन वर्षांपूर्वी अनपेक्षितपणे भारतीय वंशाच्या अखिल शर्माने हा पुरस्कार पटकावला होता. यंदा तर चार भारतीय लेखकांच्या कादंबऱ्या यादीत आहेत, त्यामुळे आता पुढील वर्षी एप्रिलमध्ये जाहीर होणाऱ्या अंतिम यादीकडे सर्वाचे लक्ष आहे.