आपल्याकडे ग्रंथ-दुकाने बंद होण्याची उदाहरणे ताजी असतानाच, दूर तिकडे अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात जुन्या-दुर्मीळ ग्रंथ, हस्तलिखितांचे प्रदर्शन ८ मार्चपासून सुरू झाले आहे. यंदाचे ५८ वे वर्ष असलेल्या या प्रदर्शनात दुर्मीळ व सचित्र नक्षीदार हस्तलिखिते, पत्रे, जुनी प्रवासवर्णने, अनेक गाजलेल्या कादंबऱ्यांच्या प्रथम व निवडक डिलक्स आवृत्ती, विविध नकाशे, लढायांची वार्तापत्रे असे विविध प्रकारचे साहित्य पाहायला आणि विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्या प्रदर्शनाची घेतलेली ही नोंद..

‘सम्राट अकबरासाठी म्हणून केलेले रामायणाचे पर्शियन भाषांतर इ.स. १५८० च्या दशकात पूर्ण झाले. त्याच्या दरबारातल्या महनीयांसाठी ते वाचणे प्रतिष्ठेचे होते,’ असे ‘कल्चर ऑफ एन्काउटर्स : संस्कृत अ‍ॅट द मुघल कोर्ट’ या पुस्तकात (प्रकाशक- अ‍ॅलन लेन / पेंग्विन बुक्स) ऑड्रे ट्रश्क या विदुषीने लिहिले आहे. १९ व्या शतकाच्या अंतापर्यंत जवळपास २४ पर्शियन रामायणे अस्तित्वात होती. १५९४ साली एक पर्शियन रामायण अकबराची आई- हमिदाबानू बेगम हिच्या वाचनालयात होते. ते दर्शवणारा शिक्का त्या हस्तलिखितावर आहे. १६०५ साली जहांगीरकडे ते आले. त्यावर जहांगीरने स्वत:च्या अक्षरांत लिहिले आहे : ‘हे प्राचीन भारतातले महत्त्वाचे पुस्तक आहे. माझे वडील- अकबर यांच्या सांगण्यावरून या पुस्तकाचे पर्शियनमध्ये भाषांतर करण्यात आले. विश्वास बसणार नाही अशा कथा यात आहेत.’ यात ५५ चित्रे आहेत व त्या काळी त्याचे मूल्य ५५०० रुपये नक्की करण्यात आले होते. रामायणाची कथा माहीत असतानादेखील कुठल्या भारतीयाला हे पुस्तक पाहावेसे वाटणार नाही?

‘कोडेक्स लाईस्स्टर’ हे लिओनार्दो दा व्हिन्सीचे केवळ ७२ पृष्ठांचे हस्तलिखित बिल गेटस्ने तीन कोटी डॉलर्स (सुमारे दोन अब्ज रुपये!) किमतीला विकत घेतले. ते १६ व्या शतकाच्या पहिल्या दशकात लिओनार्दोने लिहिले होते. त्यात असलेल्या वैज्ञानिक माहितीला आता काही महत्त्व उरलेले नसले तरी बिल गेटस्ला ते विकत घ्यावेसे वाटले. पुस्तक म्हणजे केवळ आतले शब्द वा ज्ञान नव्हे. असे पुस्तक संग्रही असणे प्रेरणादायी व प्रतिष्ठेचे असते, तर कधी आर्थिकदृष्टय़ाही लाभदायी असते! याही पलीकडे पुस्तक संग्रहाची अनेक खोल कारणे आहेत व तो अनेक पुस्तकांचा विषयही आहे.

‘अँटिक्वेरिअन बुकसेलर्स असोसिएशन ऑफ अमेरिका’ या संघटनेच्या पुढाकाराने दुर्मीळ पुस्तके, नकाशे, छायाचित्रे यांचे ५८ वे प्रदर्शन न्यू यॉर्क येथे ८ मार्चपासून सुरू झाले असून उद्या- ११ मार्च रोजी  ते संपणार आहे. इंग्लंडमधील रिक गेकोस्की- ज्याच्याकडील विक्रीसाठी असलेल्या पुस्तकाची सरासरी किंमत ८००० पौंड (सुमारे सहा लाख चाळीस हजार रु.) आहे, न्यू यॉर्कमधले टॅमिनो ऑटोग्राफस्- जे दुर्मीळ पुस्तकांबरोबर प्रसिद्ध व्यक्तींची हस्ताक्षरे व छायाचित्रे विकतात.. अशा प्रकारच्या २०० पुस्तक विक्रेत्यांचे स्टॉल्स या प्रदर्शनात आहेत. शिवाय अनेक दुर्मीळ व सचित्र नक्षीदार हस्तलिखिते, पत्रेदेखील पाहायला व विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यात जुनी प्रवासवर्णने, अनेक गाजलेल्या कादंबऱ्यांच्या प्रथम व निवडक डिलक्स आवृत्ती, विविध नकाशे, अमेरिकेचा शोध, लढायांची वार्तापत्रे असे विविध प्रकारचे साहित्य आहे. जगभरातल्या दुर्मीळ ग्रंथांच्या संग्राहकांना ही वर्षांतून एकदा भरणारी जत्रा म्हणजे पर्वणी असते.

कुठल्या पुस्तकाला दुर्मीळ म्हणावे व त्याची किंमत किती असावी, याचे काही ठरलेले नियम नाहीत. परंतु त्याचा लेखक कोण आहे? पुस्तकात काय आहे? ते किती जुने आहे? त्यावर लेखकाची स्वाक्षरी आहे काय? लेखकाने ते कोणाला भेट दिले आहे? त्याची अवस्था कशी आहे? संग्राहकांना ते किती तीव्रतेने हवे आहे? असे अनेक घटक त्या पुस्तकाची किंमत नक्की करतात. १४५० च्या दशकात योहानेस गटेनबर्गने जर्मनीत छापलेले बायबल हे अर्थातच सर्वात जुने पुस्तक होय. याच्या केवळ ४९ प्रती जगात शिल्लक आहेत. त्याची एक प्रत शेवटची १९७८ साली २२ लाख डॉलर्सला (सुमारे १४ कोटी ३३ लाख रु.) विकली गेली होती. आज त्याची किंमत दोन ते तीन कोटी डॉलर्स आहे व त्या वेळचे एखादे सुटे पान ५० हजार ते दीड लाख डॉलर्सपर्यंत मिळते. हे पुस्तक अर्थातच या प्रदर्शनात उपलब्ध नाही. परंतु बायबलच्या वेगवेगळ्या आवृत्तींचा संग्रह करणारे मोठय़ा संख्येने आहेत. तसेच शेक्सपिअरच्या नाटकांच्या विविध आवृत्तींचेही संग्राहक-वाचक आहे.

सगळे केवळ जुनेच महाग असते असे नव्हे. ‘व्हेअर द वाइल्ड थिंग्स आर’ या अमेरिकन लेखक मॉरिस सेन्डॅकने लिहिलेल्या लहान मुलांसाठीच्या पुस्तकाची १९६४ साली प्रकाशित झालेली पहिली प्रत येथे विक्रीसाठी आहे. लेखकाने ते पुस्तक त्याच्या मित्राला- लिरॉय रिचमंड याला भेट दिले होते. हे सांगणारी सेन्डॅकची सही त्यावर आहे. सेन्डॅक समलिंगी होता. त्याची किंमत आहे- फक्त २२५०० डॉलर्स (सुमारे १४ लाख ६५ हजार रु.)!

या प्रदर्शनात ‘सोफिया रेअर बुक्स’ ही दुर्मीळ पुस्तके विकणारी डेन्मार्कमधली फर्मही सहभागी झाली आहे. युरोप व अमेरिकेत भरणाऱ्या दुर्मीळ पुस्तकांच्या प्रदर्शनात ते नेहमी भाग घेत असतात. विज्ञान व गणित या विषयांतील दुर्मीळ पुस्तके व हस्तलिखिते ही त्यांची विशेषता आहे. जॉन फ्लॅमस्टीड याने बनवलेला ३००० ताऱ्यांचा नकाशा १७१९ साली त्याचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीने १७२५ साली तो प्रसिद्ध केला. परंतु सोफिया बुक्सकडे असलेल्या नकाशामागे एक कहाणी आहे, ज्यात मोठय़ा व्यक्ती गुंतलेल्या आहेत.

जॉन फ्लॅमस्टीड आयझॅक न्यूटनचा समकालीन. रॉयल ग्रीनविच वेधशाळेचा पाया त्याने घातला. फ्लॅमस्टीडने १६८० साली केलेल्या धूमकेतूच्या निरीक्षणाबाबत आधी न्यूटनने मतभेद नोंदवले होते; परंतु नंतर न्यूटनने त्याला मान्यता दिली आणि धूमकेतू सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात असे मत मांडले. मात्र त्यासाठीची निरीक्षणे त्याने फ्लॅमस्टीडचीच वापरली. ती फ्लॅमस्टीडचा एके काळी मदतनीस असलेल्या एडमंड हॅलेने न्यूटनला चोरून दिली. फ्लॅमस्टीडने आपली चंद्राबद्दलची १५० निरीक्षणेही काही अटींवर न्यूटनला वापरायला दिली. परंतु नंतर दोघांत मतभेद झाले, ते टोकाचे होते. न्यूटन व हॅलेने १७१२ साली फ्लॅमस्टीडचा ताऱ्यांचा नकाशा चोरून त्याच्या ४००० प्रती छापल्या. फ्लॅमस्टीडने त्यातल्या ३००० च्या आसपास प्रती मिळवून त्या जाळून टाकल्या व न्यूटनला नम्रतेविषयी सुनावले. पुस्तकाच्या पायरसीची ही आद्य केस असावी. अशा या फ्लॅमस्टीडने बनवलेल्या व न्यूटनने छापलेल्या नकाशाची सोफिया बुक्सकडे असलेली प्रत १७१२ सालातली असून त्याची किंमत आहे- १,८५,००० डॉलर्स (सुमारे एक कोटी २० लाख रु.)!

या प्रदर्शनात किती भारतीय लेखकांची पुस्तके असतील माहीत नाही, परंतु या प्रदर्शनाला काही वर्षांपूवी प्रसिद्ध ग्रंथसंग्राहक प्रदीप सेबॅस्टिअन यांनी भेट दिली होती. त्यांना सत्यजीत रे यांच्या कथांचे एक पुस्तक दिसले म्हणून त्यांनी ते उघडून पाहिले, तर रेंची स्वाक्षरी त्यावर होती! त्या प्रतीची किंमत होती तब्बल १०,००० डॉलर्स (सुमारे सहा लाख ५१ हजार रु.)!

अशा प्रदर्शनांत विक्रेत्यांना त्यांच्याकडची सगळीच दुर्मीळ पुस्तके येथे आणता येत नाहीत, पण कॅटलॉग्स खूप संख्येने असतात. कोणाकडे काय आहे हे समजण्यासाठी ते न लाजता घ्यावेत असे आयोजकांनी सुचवले आहे. बूथ छोटे आहेत. त्यात पुस्तके न पाहता मित्रांबरोबर गप्पा मारत उभे राहू नये. यामुळे ज्या माणसाला ही पुस्तके पाहण्यात व विकत घेण्यात रस आहे त्याची तुम्ही अडचण करत आहात, असे शुलमान या विक्रेत्याने बजावले आहे. हे पुस्तकांचे संग्रहालय नाही. तेव्हा नुसती स्तुती करत पुस्तकासमोर बराच वेळ उभे राहू नका. एखाद्या विक्रेत्यासमोर उभे राहून तेच पुस्तक ‘ऑनलाइन’वर किती किमतीला आहे हे पाहणे असभ्यपणाचे आहे. ते टाळा. विक्रेते खूप लांबून आशेने आलेले असतात. तुम्ही पुस्तक विकत घेतले नाही तर तो विक्रेता तुमच्यासाठी परत दुसरी पुस्तके विकत घेऊ शकणार नाही. यामागचे सारे गणित आर्थिक आहे, हे सांगायला कसलाही संकोच येथे केलेला नाही. परंतु त्याचबरोबर केवळ आर्थिक गुंतवणूक म्हणून पुस्तके विकत घेऊ नका. पुस्तके म्हणजे कंपन्यांचे शेअर्स नाहीत. तुमचे प्रेम व आवडीला प्राधान्य द्या. केवळ एखादेच पुस्तक न घेता हळूहळू पुस्तकांचा संग्रह बनवा. चांगल्या संग्रहाने संग्रहातल्या प्रत्येक पुस्तकाची किंमत वाढते, असा सल्लाही दिला आहे.

‘हॅकेनबर्ग बुकसेलर्स’ने म्हटले आहे की, प्रदर्शनात उगाच इकडेतिकडे रेंगाळण्यापेक्षा तुमच्या आवडीचे विषय नक्की करा व त्या ठिकाणी जास्त लक्ष द्या. जर आवडीचे विषय माहीत नसतील तर विक्रेत्यांबरोबर मोकळेपणाने बोला, असेही त्याने सांगितले आहे. तो तुम्हाला सल्ला देऊ शकतो व अशा बोलण्यातून विक्रेत्यांबरोबर तुमचे एक नाते निर्माण होते आणि त्याचा फायदा दोघांनाही होतो असे अनुभवायला येते. पुस्तकांना हात लावायला संकोच करू नका, पण समोर २५ लाख डॉलर्सचे पुस्तक व खिशात केवळ १०० डॉलर्स असताना तुमचा आत्मविश्वास थोडा गडबडू शकतो. अशा वेळी विक्रेत्याची मदत घ्या व तुमचे हात स्वच्छ असू द्या. काहीही विकत घेतले नाही तरी हरकत नाही. पुस्तकांचा, हस्तलिखितांचा आनंद घ्या. मोठमोठय़ा संग्रहालयांमध्ये जे तुम्हाला पाहायला मिळणार नाही त्याच्या जवळून सहवासाचा आनंद घ्या.

१९७६ साली केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजच्या ग्रंथालयात गणितज्ज्ञ जॉर्ज अ‍ॅन्ड्रय़ूसला एका पडीक खोक्यात शंभरच्या आसपास वहीची सुटी पाने मिळाली. गिचमिड असे त्यावर काही होते. एकही शब्द त्यात नव्हता. सारे केवळ आकडे व चिन्हे! ते वाचायला सुरुवात केली तसे त्याला त्यावर गणितातली ६०० सूत्रे लिहिलेली आढळली आणि तेही चक्क गणिती श्रीनिवास रामानुजन यांच्या हस्ताक्षरातली! त्यांच्या सिद्धता मात्र रामानुजन यांनी दिल्या नव्हत्या. कुठल्या तरी साक्षात्कारी क्षणी ती सूत्रे त्यांना ‘दिसली’ असावीत. त्या पानांनी गणिती विश्वात खळबळ उडवून दिली. अ‍ॅन्ड्रय़ूसने त्याचे पुस्तक (‘रामानुजन्स लॉस्ट नोटबुक’- भाग १ ते ४) नंतर छापले. आज ते हार्डकव्हर १८९० रुपये, पेपरबॅक व किंडलवर ८०० रुपयांना उपलब्ध आहे, पण त्या हस्तलिखिताची किंमत किती करावी याचा विचार राहून राहून मनात येतो.

kravindrar@gmail.com