अरब देशांत ‘लोकशाहीचा वसंत’ आणू पाहणाऱ्या चळवळींना आता दहा वर्षे होतील.. त्या चळवळींचे काय झाले? याचा धांडोळा घेणाऱ्या पुस्तकाची ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांनी करून दिलेली ही सविस्तर, सटीक ओळख..
कैरोच्या ताहरीर चौकास २०११ साली आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले होते. कारण इजिप्शियन जनतेने उठाव करून अध्यक्ष मुबारक यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. रोजच्या रोज झुंडीच्या झुंडी येत. लष्कर तटस्थ राहिले, पण पोलिसांनी मात्र दडपशाही चालवली होती. बराच रक्तपात, धरपकड होत होती.
विरोधी शक्ती विविध मतप्रणालींच्या होत्या. या वातावरणाचा फायदा घेणारी मुस्लीम ब्रदरहूड ही कट्टर धर्मवादी संघटना काही दिवस अलिप्त राहिली, पण नंतर तीही सामील झाली. थोडय़ाच दिवसांत अध्यक्ष मुबारक यांनी राजीनामा दिला. यामुळे इजिप्तमध्ये स्वातंत्र्याची पहाट उजाडणार या विचाराने जगभरातून स्वागताचे संदेश येऊ लागले. अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांनी जाहीरपणे स्वागत केले.
रॉबर्ट वर्थ हे ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे वार्ताहर कैरोत जे घडत होते त्यांचे साक्षीदार होते. त्यांना अरबी भाषा अवगत असून इजिप्तमधील व विशेषत: कैरोतील स्वतंत्र विचारांचे लोक, ब्रदरहूडच्या वरच्या थरातील अधिकारी, सरकारी वर्तुळातील पदाधिकारी, जाणते विद्यार्थी व त्यांचे शिक्षक यांत वर्थ यांची ओळख होती. डॉक्टर बेलतागी हा ब्रदरहूडचा एक उगवता तारा. ताज्या उठावात पक्षाच्या मर्यादा ओलांडून काम करण्यात तो पुढे होता. त्याच्याशी वर्थ यांचे निकटचे संबंध होते.
तथापि वर्ष पुरे होण्याच्या आत इजिप्तचा वसंत ग्रीष्माच्या मार्गाला लागला. ताहरीर चौकात स्वातंत्र्याबद्दलच्या भाषणात सामील होणारे आणि स्वातंत्र्याच्या शेरोशायरीत दंग झालेले वीर एकमेकांचे वाभाडे काढू लागले. अनेक जण तर आयसिसमध्ये सामील होऊन सीरिया इत्यादी देशांकडे निघून गेले.
लष्कराने हजार एक इस्लामवाद्यांचे शिरकाण केले तेव्हा इजिप्तच्या लष्कराविरुद्ध आंदोलन करणारे वर्षभरातले स्वातंत्र्यवादी लष्कराला धन्यवाद देताना दिसले. लिबियातील स्वातंत्र्यवादी असेच आशावादी होते आणि उत्साही होते. त्यांच्यात फाटाफूट होऊन ते एकमेकाचे गळे घोटू लागले. सीरियात अनेक पंथ तयार झाले व त्यांत एकमेकांचा संघर्ष चालू आहे. येमेनमध्ये टोळ्या आहेत आणि त्या एकमेकाविरुद्ध झगडत असतात. म्हणजे स्वातंत्र्य वगैरे सर्वास तिलांजली.
योजना नाही, संघटना नाही आणि कार्यक्रमाचा मागमूस नाही. असे असल्यावर दुसरे काय होणार? या सर्व घटनांचे साक्षीदार वर्थ हे सर्व पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांनी टिपणे ठेवली होती व आता पुस्तक प्रसिद्ध केले. इजिप्तमध्ये उठाव करणाऱ्यांविरुद्ध लष्कर तटस्थ राहिले. दडपशाही पोलिसांनी केली म्हणून लष्करास धन्यवाद मिळाले. पण वर्थ यांनी दाखवून दिले आहे की, हे सर्वच संगनमताने झाले होते. लष्कर मागे राहिल्याचे दिसले तरी ते गुप्तपणे सूत्रे हलवत होते. इतकेच नव्हे तर मुस्लीम ब्रदरहूडला सत्ताधारी होऊ देण्यास लष्कराने विरोध न करून आपल्या बाजूने लोकमत भक्कम केले. मुस्लीम ब्रदरहूड व लष्कर यांच्यात सहकार्य कधी नव्हते. मिळालेले अधिकार शहाणपणाने वापरण्याची बुद्धी ब्रदरहूडला नव्हती. तिच्या पदाधिकाऱ्यांनी व त्यातही प्रमुख मोर्सी यांनी ताळतंत्र सोडला. तेव्हा योग्य संधी मिळताच लोकांच्या रक्षणासाठी लष्कराने हस्तक्षेप केला, त्याचे स्वागत झाले.
या सर्वामागे इजिप्शियन लष्कराच्या गुप्त शाखेचे प्रमुख सिसी हे होते. त्यांनी आपल्या लष्करी साहाय्यकांना अगोदरच सांगून ठेवले होते की, मुबारक आपल्या मुलाला वारस म्हणून नेमणार आहेत. तसे झाले तर लोकांचा उठाव होईल व त्या वेळी लष्कर लोकांच्या बाजूचे असेल. इजिप्तचा वसंत फुलण्यामागे ही हवा होती.
ब्रदरहूडचे प्रमुख कार्यकर्ते आपल्याच जगात वावरत होते. मोर्सीच्या धोरणामुळे व वागण्यामुळे विरोध वाढत जाऊन टॅन्क आले तरी बेलतागीसारख्यांना कल्पना नव्हती. नंतर तर बेलतागीची राजकीयदृष्टय़ा जागृत मुलगी गोळी लागून मरण पावली आणि पुढे त्यालाच तुरुंगवास घडला. पण या अराजकापासून लष्कराने वाचवले म्हणून सर्वसाधारण लोक लष्कराचे स्वागत करू लागले. त्या आधी बेलतागीची भाषा बदलत गेल्याचे व ती धर्मवाद्यांना अनुकूल होत असल्याचे वर्थ यांना जाणवले.
इतकेच नव्हे तर अमेरिकेसह इजिप्तच्या राजकीय वसंताचे कौतुक करणारे देश लष्कराच्या राजवटीचे स्वागत करू लागले आणि दहशतवाद्यांशी मुकाबला करत असल्याबद्दल आर्थिक मदत वाढवण्यासाठी पुढे आले. स्वातंत्र्यासाठीच्या उठावाचा निकाल का व कसा लागला यासंबंधी वर्थ यांनी बराच तपशील दिला असला तरी त्या खोलात जाण्याची गरज नाही.
लिबिया व इतर काही देशांत झालेल्या उठावांचा कसा बोजवारा उडाला याचा तपशील देताना वर्थ प्रारंभीच सांगतात की, टोळीवादाचा अतिरेक, द्वंद्व आणि जन्मोजन्मीचा तंटा यातून लिबिया, येमेन, टय़ुनिशिया इत्यादी देश पूर्णत: पोखरले आहेत. लिबियाच्या गडाफीने याचा फायदा घेऊन दीर्घ काळ अर्निबध सत्ता भोगली. पण लष्कर, पोलीस, संघटना या सर्वाचाच अभाव असल्यामुळे तो अखेरीस मारला गेला. याची पुरेशी माहिती न घेता ओबामांच्या सरकारने केवळ स्वत:च्या लष्करावर भरवसा ठेवून हस्तक्षेप करून फक्त स्वत:च्याच देशाला कोंडीत टाकले.
अल् जझिरा चित्रवाणीमुळे या सर्व देशांतील बंडखोरांची ताकद गडाफी अजमावू शकत होता. दूरचित्रवाणी, फेसबुक इत्यादींचा उपयोग केवळ उठाव करणाऱ्यांना होत नव्हता तर सत्ताधाऱ्यांनाही होत होता. लिबियात थोडय़ा अवधित हजारो, लाखो बंडखोर जमा झाले. पण ना एकी, ना खरे शस्त्रबळ. यामुळे गडाफीसारख्यांना तुंबळ युद्ध करणे सहज शक्य होत होते. त्याने राजकीय जीवन इतके बरबाद केले होते की अद्याप त्यास मूळ धरणेही अवघड झाले आहे. लिबिया गेल्या शतकात कधी एक झाला नाही. दीर्घ काळच्या अस्थिरतेमुळे एकसंध लिबिया असे काही निर्माणच झाले नाही. अशा देशांत हस्तक्षेप करण्याचे परिणाम वर्थ यांच्यासारख्यांनी लोकांपुढे आणणे योग्य होईल.
सीरियात सुन्नी, अलवी आणि ख्रिश्चन अशी विभागणी आहे. सुन्नी लोक शहरात मध्य भागात राहतात व भोवतालच्या टेकडय़ांवर अल्ोवी व ख्रिश्चन यांची खेडी आहेत. सीरियन लोक काही सांगोत, सुन्नी व अल्ोवी यांतील दुही वाढत गेली आहे. सीरियाचे अध्यक्ष आपल्या हुकूमशहा व क्रूर पित्याची गादी चालवत आहेत. इंग्लंडमध्ये ते नेत्रविशारद झाले पण मूळचा वंशवाद संपला नाही.
आसाद यांनी लष्करी धर्तीवर संघटना तयार केली. तिने सुन्नी लोकांचे २०११ पासून पद्धतशीर शिरकाण चालवले आहे. आसाद यांचे लष्कर आणि लष्करी धर्तीवरची संघटना यांनी टॅन्क, वैमानिक हल्ले इत्यादीचा वापर करून गावेच्या गावे, विभागच्या विभाग उद्ध्वस्त केले आहेत. गेल्या पाच वर्षांत लाखो बळी पडले. वर्थ यांनी या भयानक राजवटीचे आपल्या पुस्तकात वर्णन केले आहे.
येमेनची स्थिती काहीशी वेगळी. साना या येमेनच्या राजधानीच्या एका भागात काही जणांचा घोळका जमला होता. वर्थ यांनी त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली. तेव्हा सईद हा साठएक वर्षांचा गृहस्थ उत्तरे देऊ लागला. त्याच्या हातापायावर अनेक वळ होते, जखमांच्या खुणा होत्या. इतके लोक का जमले म्हणून विचारले असता सईद म्हणाला की, राज्याचा प्रमुख शेख महमद अहमद मन्सूर आमची जमीन बळकावतो आणि मुले पळवून नेतो. तक्रार करणाऱ्यांना डांबून ठेवले जाते आणि काही काळानंतर सुटका होते. काही जण कधीच परत येत नाहीत.
त्याच्या आधी त्याचा बाप असाच निर्घृण होता. दुष्कृत्यांत रमलेला शेख हा नाणावलेला कवी आहे. त्याच्या अनेक कविता प्रणयाच्या आहेत तर दुसऱ्या प्रशंसापर कविता अध्यक्षासंबंधी आहेत. अध्यक्षास दुसरा परमेश्वर मानले आहे. यामुळे खूश होऊन अध्यक्ष अल्ी अब्दुल्ला सालेह यांनी साठएक हजार लोकांची मालकी शेखला दिली. त्याचे खासगी लष्करही आहे.
येमेन हा देश मध्ययुगात वावरत असतो. लोकशाही राज्य म्हटले जात असले तरी लोकशाही हा नुसता देखावा आहे. सालेह व त्याचे नातेवाईक यांनी अब्जावधी डॉलर्सची लूट केली आहे. मुबारक या इजिप्तच्या हुकूमशाहापेक्षा हे सर्व अधिक श्रीमंत आहेत.
अत्याचारांनी परिसीमा गाठल्यामुळे २०१० सालच्या फेब्रुवारीत साना या राजधानीत असंख्य लोक जमा झाले. सालेह व त्याचे नातेवाईक संपत्तीत लोळत असले तरी सामान्य नागरिक भुकेकंगाल आहेत. देशाची आर्थिक दुर्दशा आणि लोकांच्या उठावामुळे निर्माण होणारी अस्थिरता यांचा उपयोग सालेह अमेरिकेसारख्या देणगीदार देशांना गंडवण्यासाठी करत आला आहे.
अल् काइदाचा सालेहने कौशल्याने उपयोग केला आहे. अमेरिकेने मुबलक पैसा आणि लष्करी साहित्य यांची बरसात केली व चालवली आहे. सालेहने येमेनमधील निरनिराळे शेख, सेनाधिकारी, राजकारणी, जिहादी आणि अनेकांवर गुन्हेगारीचा शिक्का मारला आणि मग एकाविरुद्ध दुसरा असे तट पाडून भांडणे लावून देण्याचा खेळ चालू ठेवला.
येमेन अगोदर माहीत झाले ते ओसामा बिन लादेनचे पूर्वज त्याचे रहवासी होते असे जाहीर झाल्यामुळे. पण शांततेचे नोबेल पारितोषिक येमेनच्या राजवटीविरुद्धच्या उठावात पुढे असलेल्या तावाकोल करमान या सामाजिक कार्यकर्तीला २०१० साली मिळाल्यावर येमेनमधील इतर घडामोडींचाही जगाला विचार करावासा वाटला.
उठावात सईद हा एक होता. त्यास वर्थ यांनी जेव्हा विचारले की, तू कशासाठी लढतोस? त्याचे उत्तर होते, राज्यसंस्थेसाठी. ते इस्लामी नको आणि समाजवादीही नको तर ब्रिटन व युरोपातील इतर आधुनिक राज्यसंस्थेसारखे. सईद लहानपणी ब्रिटिश नियंत्रित एडनमध्ये राहत होता. शिक्षण मोफत होते, रस्ते, वीज, हॉस्पिटलची व्यवस्था होती. एडन हे पहिल्या प्रतीचे बंदर होते, यामुळे व्यापार वाढत होता व नोकऱ्यांची वाण नव्हती. पण शिकून तयार झालेल्यांना परकीय राज्य नकोसे झाले.
यातून तरुण लष्करी अधिकाऱ्यांनी इजिप्तच्या नासेरकडून स्फूर्ती व मदत घेऊन २६ सप्टेंबर १९६२ रोजी बंड केले. ब्रिटिश राज्य सोडून गेले. नंतर जे राज्य आले ते अस्थिरतेचे व सतत होणाऱ्या बंडाळीचे. सईद हा त्या राजवटीविरुद्ध लढणाऱ्या पथकातील एक झाला.
यातूनच पुढे म्हणजे २०११ च्या फेब्रुवारीत साना या मुख्य शहरात लोकांनी जमून उठाव केला. तो दडपणाऱ्यांनी बराच रक्तपात केला असता सालेह याने नेहमीप्रमाणे बनवाबनवीचा खेळ सुरू केला. उठाव करणाऱ्यांच्या छावण्या उभारल्या गेल्या. त्यात अनेक अल् काइदावाले होते. वर्थ लिहितात की, अल् काइदावाल्यांनी हे पाहिले होते की, कैरोतील मुबारकविरोधी खरा उठाव लोकांनी नाही तर लष्कराने केला होता आणि लष्कराच्या मागे अमेरिका उभी होती. अल् काइदाने येमेनमध्ये हेच केले. हा लोकांचा उठाव म्हणजे आणखी एक अरबी वसंत असल्याचा भास निर्माण केल्यामुळे अमेरिका व पाश्चात्त्य देश खूश् झाले. वस्तुत: त्यामागे अल् काइदा होती. लोकांच्या मते तर या सर्वाचा सूत्रधार सालेह हाच होता. मग सालेहशी सौदी अरेबियाचा करार होऊन सालेह सहकुटुंब सुरक्षित राहिला. तीन वर्षांनी याच सौदी अरेबियाने येमेनवर बॉम्बफेक केली.

वर्थ यांनी अखेरीस म्हटले आहे की, सौदी अरेबिया व इराण यांची संदोपसुंदी होणार. या वातावरणात ते येमेनच्या शेखला भेटले व येमेन कोठे जाणार, असे विचारले. थोडा विचार केल्यासारखे दाखवून तो म्हणाला, येमेनकडे. म्हणजे जैसे थे.

गोविंद तळवलकर
govindtalwalkar@hotmail.com

 

ए रेज फॉर ऑर्डर
लेखक : रॉबर्ट वर्थ,
प्रकाशक : फरार, स्ट्रॉस आणि गिरो,
पृष्ठे : २५९. किंमत : २६ डॉलर (भारतात किंडलवर ३७५ रु. पुठ्ठाबांधणी पुस्तक : १७८९ रु.)