रमा हर्डीकर – सखदेव rama.hardeekar@gmail.com

केवळ लेखकपणाचे अनुभव, भटकंतीत दिसलेला भारत, हिमालयातला निसर्ग, झाडं-पक्षी-प्राणी यांच्याबद्दलच नव्हे, तर घराच्या पत्र्यावर होणारा पावसाचा आवाज वा खोलीत ऐकू येणारं रातकिडय़ांचं ‘गाणं’.. या आणि अशा कितीतरी छोटय़ा छोटय़ा गोष्टींविषयी व त्यातल्या सहजसौंदर्याविषयी रस्किन बॉण्ड यांनी लिहिलेले निबंध या पुस्तकात वाचायला मिळतात..

‘मलाही निबंध वाचायला आवडायचं नाही,’ असं रस्किन बॉण्ड यांनीच आपल्या नव्या निबंधसंग्रहाच्या प्रस्तावनेत म्हटलं आहे! त्या संग्रहाचं नाव आहे – ‘अ टाइम फॉर ऑल थिंग्स’! या प्रस्तावनेत ते पुढे म्हणतात की, ‘जॉर्ज ऑर्वेल आणि सॉमरसेट मॉम यांसारख्या लेखकांचे निबंध वाचल्यावर माझं हे मत बदललं. बरेचदा लेखकांच्या कथांपेक्षा त्यांचे निबंध अधिक सूक्ष्मपणे जीवनविषयक निरीक्षणं नोंदवतात.’

बॉण्ड यांचं बरचंसं लिखाण निसर्गविषयक आहे. त्यांच्या लेखनातून त्यांचं निसर्गातल्या प्रत्येक घटकाविषयी असणारं प्रेम आपल्याला दिसतं. घरी खिडकीपाशी बसून लिखाण करताना असो किंवा दूरवर एकटय़ानं चालायला जाताना असो, बॉण्ड यांना लहानातल्या लहान गोष्टी आणि प्रसंगांतलं सौंदर्य पाहायची सवय लागली. ते म्हणतात की, ‘अगदी लहानसहान गोष्टीत खूप काही तरी दडलेलं असू शकतं किंवा एखाद्या अनपेक्षित ठिकाणी आपल्याला एकदम काही तरी गवसतं. असं काही सापडलं, की त्याचं कथेत रूपांतर करण्याऐवजी ते निबंधासारख्या तुकडय़ात लिहायला बरेचदा जास्त मजा येते.’

पुस्तकाचे विषयानुरूप सात भाग केलेले आहेत. हिमालयातला निसर्ग, राजस्थानचा समुद्र, डोंगरांत केलेली भटकंती, झाडं आणि पक्षी-प्राणी यांच्यासोबतचे अनुभव हे विषय पहिल्या भागात हाताळले आहेत. नंतर बॉण्ड यांना एक लेखक म्हणून आलेले अनुभव, त्यांचं जीवन दुसऱ्या भागात आलं आहे. मग आपले कुटुंबीय, मित्र यांच्याविषयी लेखकानं लिहिलं आहे. याचबरोबर हिमालयात आणखी उंचीवरच्या भागात केलेली भटकंती, गंगा नदी, बद्रीनाथ, तुंगनाथ, हृषीकेश या ठिकाणांची वर्णनं आणि अनुभव याविषयी चौथ्या भागात लिहिलं आहे. पाचवा भाग हा भारतातले लोक आणि ठिकाणं यांविषयीचा आहे. सहाव्या भागातले निबंध हे हलक्याफुलक्या विनोदी शैलीतले आहेत, तर शेवटच्या भागात बॉण्ड यांचे विचार, त्यांचं तत्त्वज्ञान आलेलं आहे.

अत्यंत सुंदर, ओघवत्या भाषेतून बॉण्ड यांनी कथन केलेले साधे प्रसंगही रंजक वाटतात. आपणही रोज सूर्यप्रकाश, वारा, ढग, पाऊस, झाडं-पक्षी पाहत-अनुभवत असतो; पण याच गोष्टी त्यांच्या लेखणीतून भेटल्या की वेगळ्याच दिसतात. रानगुलाबांच्या ताटव्यांमधून टेकडीच्या उतारावरून खाली गेल्यावर सापडलेला जंगलातला झरा, त्याच्या काठावरच्या दगडांवर उडय़ा मारणारा फोर्कटेल पक्षी, आणि सुगंधी गवतावर झोपून ओकच्या पानांच्या जाळीतून निळ्या आभाळाकडे पाहत राहणारा लेखक.. हिमालयातली ही निसर्गवर्णनं आपल्याला भुरळ घालतात आणि खुणावत राहतात.

लेखक कधी डोंगरावरून उगम पावणाऱ्या एखाद्या ओहोळाचा माग काढत दरीत उतरून जातो, तर कधी झऱ्यावर दिसलेल्या बिबटय़ाबद्दल सांगतो. झाडं आणि लेखकाच्या परस्पर नात्याबद्दल तर लेखकाने फारच तरल वर्णन केलं आहे. कुंडय़ांमधल्या फुलझाडांची मायेनं काळजी घेणारा, आजारी झाडांना बरं करणारा आणि रस्ता बांधायचं काम सुरू झाल्यावर कित्येक झाडांची कत्तल झालेली पाहून उद्विग्न झालेला लेखक आपल्याला वेगवेगळ्या निबंधांतून भेटतो. केवळ झाडं किंवा हिमालयाच्या बर्फाच्छादित टेकडय़ाच नाही, तर घराच्या पत्र्यावर होणारा पावसाचा आवाज वा खोलीत ऐकू येणारं रातकिडय़ांचं ‘गाणं’.. या आणि अशा किती तरी छोटय़ा छोटय़ा गोष्टींविषयी बॉण्ड यांनी त्यांच्या खास शैलीत लिहिलं आहे.

एका लहानशा टेकाडावर लेखकानं कधी तरी मातीत खुपसलेल्या बीपासून चेरीचं झाड उगवतं आणि काही वर्षांत कसं छान वाढतं, या अनुभवाविषयी त्यांनी सुंदर लिहिलं आहे. बॉण्ड लिहितात : ‘ही जागा माझ्यासाठी जादुई आहे. गवतावर झोपून या चेरीच्या पानांतून आकाशातले तारे पाहिले, की आकाश, माती आणि एका लहानशा चेरीच्या बीमध्ये सामावलेल्या शक्तीचं दर्शन घडतं.. हे जग खूप मोठं आहे आणि कुठे ना कुठे मोठमोठय़ा घटना सतत घडत असतील, पण मी मात्र ती सगळी जादू इथे या ठिकाणी घडताना अनुभवली आहे!’

लेखक म्हणून जगताना येणारे वेगवेगळे अनुभव हलक्याफुलक्या शैलीत बॉण्ड यांनी टिपले आहेत. ‘सध्याच्या काळात हाताने लिहिणारा मी एकटाच लेखक उरलो असेन,’ असं ते गमतीनं म्हणतात. ‘फक्त लिखाण करून उदरनिर्वाह चालवणं ही मुळीच सोपी गोष्ट नाही. पण हिमालयातल्या पर्वतांनी माझ्यावर कायमच प्रेम केलं आहे आणि माझ्या लेखनाला मदत केली आहे,’ असं ते प्रांजळपणे म्हणतात. लिखाण न स्वीकारता परत पाठवणारी मासिकं, प्रकाशकाकडून आलेलं पत्र किंवा मानधनाचा धनादेश यांची वाट पाहण्यासाठी पोस्टमनच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला लेखक आजच्या डिजिटल काळातल्या पिढीला खराच वाटत नाही!

साध्या वाक्यांतून रस्किन बॉण्ड आपलं जीवनविषयक तत्त्वज्ञान किती सहजपणे सांगून टाकतात, हे या पुस्तकातल्या किती तरी निबंधांतून वारंवार दिसून येतं. काही वर्षांपूर्वी एका कथेत लिहिलेल्या मजकुरामुळे काही कारणांमुळे बॉण्ड यांना अटक झाली होती. त्या वेळी आपल्याला स्वॉलो पक्ष्यांनीच वाचवलं, असं ते म्हणतात. ते कसं? तर, पोलीस ठाण्यातल्या कोणत्याही गोष्टींची भीती न बाळगता किती तरी स्वॉलोज् तिथल्या व्हरांडय़ात घरटी बांधण्यात मग्न झालेल्या त्यांना दिसल्या. त्यांचं ते रोजचं काम पाहून बॉण्ड यांना खूपच दिलासा मिळाला आणि मनाला उभारी मिळाली. याबद्दल पुढे ते म्हणतात, तिथल्या पोलिसाला त्या पक्ष्यांच्या अस्तित्वाचा पत्ताच नव्हता. त्यामुळे बॉण्ड यांना त्याची कीवच आली, कारण त्या पोलिसाला कधीच इतक्या साध्या आणि लहानशा गोष्टीतून दिलासा मिळू शकला नसता.

असे किती तरी प्रसंग दिसताना साधेसे दिसले, तरी आपल्याला अंतर्मुख करून जातात. बॉण्ड यांनी आपल्या वडिलांविषयी अत्यंत हळवेपणाने लिहिलं आहे. ते वाचताना नकळत आपल्याही डोळ्यांत पाणी उभं राहतं. लहानपणीचे किस्से, मित्र, आजोबांनी पाळलेले प्राणी, आजीची फुलबाग अशा दिल्लीच्या, देहरादूनच्या आणि मसुरीच्या किती तरी जुन्या गोष्टी आपल्याला यात वाचायला मिळतात.

बॉण्ड हे तीर्थयात्रा करणारे भक्त वा केवळ सगळ्याचा उपभोग घ्यायला आलेले पर्यटक नसल्याने त्यांनी गंगा आणि हिमालयातल्या इतर नद्या आणि त्यांच्या काठावरची ठिकाणं, तिथला निसर्ग, गावं, लोक, मंदिरं यांचं वर्णन वेगळ्या दृष्टिकोनातून केलं आहे. त्यांच्या या दृष्टिकोनावर कोणताही बाह्य चश्मा नाही.

बॉण्ड यांची विनोदाची शैली हलकीफुलकी आहे. त्यांचे विनोद हे आपल्याला गालातल्या गालात हसायला लावतात. ‘मी इतकी पुस्तकं लिहिली, पण मी कधीच बेस्टसेलर लेखक झालो नाही,’ असं बॉण्ड म्हणतात. त्याचं कारण काय? तर ते म्हणतात- ‘मला स्वयंपाक येत नाही!’ पुढे ते गमतीत म्हणतात की, ‘मला कोणी कुकबुक लिहायला लावलंच तर त्याचं नाव असेल- ‘फिफ्टी डिफरंट वेज् ऑफ बॉयलिंग अ‍ॅन एग, अ‍ॅण्ड ऑदर डिजॅस्टर्स’!’ एका निबंधात ते लिहितात : ‘हिल स्टेशनला राहायचा तोटा म्हणजे सुट्टय़ा लागल्या की अचानक सगळ्या नातेवाईकांना व मित्रांना आपली आठवण येते आणि ते सामानसुमान घेऊन थेट घरी हजर होतात!’ अशा नकोशा पाहुण्यांना कसं घालवायचं, याबद्दल त्यांनी गमतीदार किस्से सांगितले आहेत.

शेवटच्या भागाचा मथळा आहे- ‘थॉट्स फ्रॉम अ विंडो’! रस्किन बॉण्ड म्हणतात, ‘एखादं घर निवडताना मी त्यातल्या खोल्यांना असलेल्या खिडक्या बघतो. जर खिडकीतून छान दृश्य दिसत असेल, तर त्या खोलीतलं माझं आयुष्य खूपच जास्त चांगलं व्यतीत होतं.’ त्यांच्या मसुरीतल्या पहिल्या घराच्या खिडकीतून जंगलाचं मनोहर दृश्य दिसायचं आणि पक्ष्यांच्या मंजूळ सुरावटी खालच्या दरीतून ऐकू यायच्या. याच खिडकीपासच्या टेबलावर बसून बॉण्ड यांनी उत्तम लिखाण केलं. या खिडकीतून खोलीत येणाऱ्या पाहुण्यांविषयीही त्यांनी लिहिलं आहे. हे पाहुणे म्हणजे भिंतीवर चढणाऱ्या वेली, रातकिडे, पक्षी, खारी आणि वटवाघळंसुद्धा! या भागात बॉण्ड यांनी डिप्रेशनबद्दलचे आपले विचारही मांडले आहेत. ते म्हणतात, ‘आपल्याकडे वय वाढलं म्हणजे माणूस ज्ञानी झाला असा लोकांचा समज आहे! म्हणून कधी कधी लोक मला डिप्रेशन कसं घालवावं, याचा सल्ला विचारतात!’ पक्षीनिरीक्षक आणि सुतारकाम करणारे लोक हे अगदी आनंदी असतात, असं बॉण्ड यांचं निरीक्षण आहे. पण यातल्या विनोदाची मजा चाखायला हे लिखाण मुळातूनच वाचायला हवं.

शेवटच्या लेखात बॉण्ड यांनी वयाचा ऐंशी वर्षांचा टप्पा पार केल्यानंतरचे विचार मांडले आहेत. ते लिहितात : ‘मी तीस वर्षांचा झालो तेव्हा मला वाटायचं, की मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजली आहेत! तेव्हा मी लेख लिहिला होता -‘थॉट्स ऑन रिचिंग थर्टी’! पण आज ऐंशी वर्ष ओलांडल्यावरही मी माझ्या मनात डोकावतो, तेव्हा कोणतेही ‘थोर’ विचार माझ्या मनात येत नाहीत! तेव्हा प्रिय वाचकहो, तुमचा विचार तुमचा तुम्हीच करा!’ असं म्हणून बॉण्ड या निबंधाचा शेवट करतात.

या पुस्तकात ठिकठिकाणी आपल्याला रस्किन बॉण्ड यांचं सरळसाधं तत्त्वज्ञान वाचायला मिळतं. त्यांना जसं साध्या दैनंदिन गोष्टींतलं सौंदर्य भावतं, तसंच ते त्यांनी मांडलं आहे. कोणताही आव न आणता मोकळेपणाने आपले अनुभव आणि विचार मांडले आहेत. बॉण्ड यांची इंग्रजी सुंदर आहे, ती वाचत राहावीशी वाटते. साध्या शब्दांतून, सरळसोप्या वाक्यांतून ते हिमालयातला निसर्ग जिवंत करतात. कधी किंचित विनोदी, कधी कारुण्याची झालर असलेलं, कधी स्मरणरंजनात्मक,

कधी हळवं असं हे लेखन खास ‘बॉण्ड’शैलीतलं आहे. मात्र, त्यांच्या कथा, आत्मचरित्र आणि इतर साहित्य वाचलेल्या वाचकांना किंवा नवीन काही तरी शोधू पाहणाऱ्या वाचकाला यात तोचतोचपणा जाणवू शकतो किंवा हे लिखाण काहीसं संथ वाटू शकेल, कारण आज शहरात आपण जे आयुष्य जगतो ते पूर्णत: याविरुद्ध आहे. पण हेच याचं वैशिष्टय़ही म्हणता येईल. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून दोन क्षण सगळा ताण विसरायला हे लहान लहान लेख आपल्याला मदत करू शकतील. कोणतंही पान उघडून काही मिनिटांत एखादा निबंध वाचून तुम्ही ताजेतवाने व्हाल अशी जादू बॉण्ड यांच्या लिखाणात आहे. शेवटी त्यांच्या पुस्तकाविषयी, एकूणच लिखाणाविषयी, त्यांच्या तत्त्वज्ञानाविषयी आणि हे वाचताना आपल्याला मिळणाऱ्या आनंदाविषयी त्यांच्याच या एका वाक्यात असं म्हणता येईल की, ‘It’s the simple things in life that keep us from going crazy!’

लेखिका अनुवादक आणि ग्राफिक डिझायनर म्हणून काम करतात. त्यांचा ईमेल :

‘अ टाइम फॉर ऑल थिंग्स : कलेक्टेड एसेज् अ‍ॅण्ड स्केचेस्’

लेखक : रस्किन बॉण्ड

प्रकाशक : स्पीकिंग टायगर

पृष्ठे: ३९०, किंमत : ४९९ रुपये