स्थलांतरित लोकांचे केवळ दुर्गुणच दाखवायचे, त्यांची संख्या वाढते आहे म्हणून आपले’- म्हणजे मूळ रहिवाशांचे काय होणार अशा भीतीचा बागुलबोवा उभारायचा आणि त्यावर मात करण्यासाठी राजकारणातील विरोधी पक्षाला नेस्तनाबूत करणे कसे अत्यावश्यक आहे याचा पाढा वाचायचा.. हाच प्रकार एका अमेरिकी पुस्तकाने केला आहे आणि हे पुस्तक तिकडे बेस्टसेलरदेखील ठरते आहे..

अमेरिकेत बाहेरून अनेक लोक येऊन स्थायिक झाले आहेत हे सर्वश्रुतच आहे. पण ते लोक मुख्यत्वे पश्चिम युरोपातून आलेले होते किंवा आफ्रिकेतून आणलेल्या गुलामांची प्रजा होती. सिनेटर एडवर्ड केनेडीने १९६४ साली कायदा बदलून इतर अनेक देशांतूनही लोक येऊ  शकतील अशी योजना करून ठेवली. अ‍ॅन कोल्टर या लेखिकेने ‘अ‍ॅडिओस अमेरिका- द लेफ्ट’स् प्लॅन टु टर्न अवर कंट्री इन्टु अ थर्ड वर्ल्ड हेलहोल’ या पुस्तकात त्याचे दुष्परिणाम दाखवण्याचा अट्टहास केला आहे (अमेरिकेत डेमोक्रॅटसना ‘लेफ्ट’ असे संबोधतात.). मेक्सिको आणि इतर दक्षिण अमेरिकेतून- बेकायदा किंवा कायदेशीर रीतीने -आलेले लोक कसे गुन्हेगारी करतात ते तुरुंगातल्या संख्यांवरून तिने दाखवले आहे. मिनिसोटा आणि मेन या अगदी उत्तरेच्या थंड प्रांतांत एकेक लाख सोमाली निर्वासितांना वसवले आहे. त्यांपैकी बहुतेक बेकार आहेत. त्यांच्या दुष्कृत्यांचे तिने वाभाडे काढले आहेत. चीन, भारत, व्हिएटनाम, सगळे अरब आणि आफ्रिकन देश, अगदी पूर्व युरोपातून  देखील ‘निकृष्ट संस्कृतीतल्या लोकांचे’ लोंढे अमेरिकेत येत आहेत, असे या लेखिकेचे आग्रहाचे म्हणणे आहे. राजकारण्यांबरोबर प्रसारमाध्यमांनाही तिने यासाठी जबाबदार धरले आहे.

beed lok sabha marathi news, beed lok sabha election 2024
बीडमध्ये सामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आरक्षणाचाच मुद्दा प्रचारात प्रभावी
What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था मूलभूत संकल्पना, परिशिष्टे आणि सरनामा
samajwadi party
समजावादी पक्ष आणि अपना दलमध्ये जागावाटपावरून मतभेद; इंडिया आघाडीवर परिणाम होणार?

प्रस्तुत परीक्षणात त्या सगळ्यावर टिप्पणी न करता भारतातून अमेरिकेत आलेल्या लोकांबद्दल लेखिकेने केलेल्या उल्लेखावरच भर दिला आहे.

लाकीरेडी बालिरेडी (मूळचे ‘रेड्डी’?) नावाच्या कोटय़धीश भारतीयाने अल्पवयीन मुली भारतातून आणून अमेरिकेत वेश्या व्यवसायास लावल्या; त्याबद्दल त्याला, त्याच्या भावाला आणि वहिनीला आठ वर्षांची सजा झाली होती. यासाठी एक पूर्ण प्रकरणच लिहिले आहे. साक्षीदार म्हणून अमेरिकन पोलिसांनी आंध्रातून स्त्रिया आणल्या तर त्यांनी उलट बालीरेडीच्या बाजूने साक्ष दिली. लेखिकेच्या मते, आश्चर्य हे की रेडी, त्याचा भाऊ, वहिनीसकट त्या स्त्रियांनाही अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. डॉक्टर सतीश नारायणप्पा बाबू या भारतीयाने अमेरिकेत केलेल्या अफरातफरीचेही वर्णन आले आहे. गेल्या दीड दोन वर्षांत भारतात सहा-सात स्त्रियांवर, ज्यात चार युरोपियन होत्या, बलात्कार झाले त्याचा उल्लेख करण्यास लेखिका विसरली नाही. त्याचा अमेरिकेच्या इमिग्रेशनशी काही संबंध नसला तरी एकंदर स्त्रियांकडे बघण्याची भारतीय मनोवृत्ती आणि ‘बलात्कारी संस्कृती’ दाखवून देण्याचा तिचा प्रयत्न आहे. एका १३ वर्षांच्या मुलीच्या बापाने तिच्याशी संबंध ठेवू इच्छिणाऱ्या पुरुषांनी संपर्क साधावा अशी एक खोटी जाहिरात अमेरिकन गुप्त पोलिसांनी दिली. त्याला नेमका एका भारतीय वंशाच्या माणसानेच प्रतिसाद दिला. सिलिकॉन व्हॅलीत आलेले भारतीय कसे यशस्वी झाले हे निशा बापट आणि इतर भारतीय लेखकांनी याआधी नमूद केले आहे; त्यावर ‘भारतीय स्वत:ला फार शहाणे समजतात’ असा टोमणा लेखिका मारते. त्यासाठी, ‘भारतीयांचा आयक्यू (बुद्धय़ांक) ८२ म्हणजे पाकिस्तानी किंवा सोमाली आणि इतर मागासलेल्या लोकांपेक्षाही कमी आहे,’ असा पुरावा देते. भारतीय स्थलांतरित अमेरिकेतील दारिद्रय़रेषेच्या वर असतात एवढा एकच उल्लेख आपल्याला अनुकूल जाणवतो.

लेखिकेच्या मते फक्त ब्रिटन आणि उत्तर युरोपातून आलेले स्थलांतरितच अमेरिकेत राहण्यास लायक आहेत. आफ्रिकेतून आणलेले गुलाम अमेरिकन संस्कृतीत पूर्ण मिसळून गेले आहेत; इतकेच नव्हे तर त्यांची संस्कृती हीच खरी अमेरिकन संस्कृती, ही गोष्ट लेखिकेस मान्य आहे.

हे पुस्तक सॅन बर्नार्डिनो आणि आता ऑरलँडो इथे झालेल्या हत्याकांडांच्या आधी लिहिले गेले आहे. लेखिकेने अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या अनेक उमेदवारांची इमिग्रेशनबद्दलची मते नोंदवली आहेत; पण त्यात हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प या आघाडीच्या उमेदवारांना का वगळले आहे हे कळत नाही. डेमोक्रॅटसना मते मिळत नाहीत म्हणून ते मतदारच बदलत आहेत असे स्पष्ट मत लेखिकेने नमूद केले आहे. लेखिकेची अनेक पुस्तके न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलर यादीत आली होती. प्रस्तुत पुस्तकावरही ‘न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलर’ असं छापलं आहे.

लेखिकेची मते एकतर्फी आहेत, हे उघड आहे. त्यांना सडेतोड उत्तरेही देता येतील. अमेरिकेतील स्थलांतरितांबद्दल आढावा घेण्यास लेखिकेचा अभ्यास खूपच कमी पडतो अथवा निवडणुकीच्या तोंडावर तिने मुद्दामच तसे लिहिले असावे. म्हणून या पुस्तकाला महत्त्वही तितपतच दिले पाहिजे.

 

अ‍ॅडिओस अमेरिका- द लेफ्टस् प्लॅन टु टर्न अवर कंट्री इन्टु अ थर्ड वर्ल्ड हेलहोल

लेखिका : अ‍ॅन कोल्टर

प्रकाशक : रीजेनेरी पब्लिशिंग, वॉशिंग्टन डीसी

पृष्ठे : ३९२ ; किंमत : २७.९९ डॉलर*

 

* पुस्तक इंटरनेटवरून १३४० रुपयांपासून पुढे उपलब्ध असले, तरी भारतात ते आणण्याचा खर्च मिळवल्यास आणखी किमान १५०० रुपये वाया जातील.

 

मिलिंद परांजपे
captparanjpe@gmail.com