31 October 2020

News Flash

स्त्री-आरोग्याचे मनो-सामाजिक पैलू

भारतीय कुटुंबव्यवस्थेची भावनिक अंगाने जपणूक करण्याचा संपूर्ण भार स्त्रीवर आहे.

देवयानी देशपांडे ddevyani31090@gmail.com

मानसिक अनारोग्य हे विद्यमान भारतासमोरील गंभीर आव्हान आहे. त्याबाबत अधिकाधिक संशोधन होणे ही काळाची गरज आहे. तसा प्रयत्न करणाऱ्या, मुख्य म्हणजे ‘मानसिक अनारोग्याचा स्त्रीकेंद्री विचार’ या अनवट मार्गाने या समस्येची मांडणी करणाऱ्या पुस्तकाचा हा परिचय..

‘तुम्ही स्त्री असणे हा तुम्हाला मानसिक आजार होण्याचा प्रमुख निकष आहे’- हे विधान खचितच विचार करण्यास प्रवृत्त करणारे आहे. स्त्रीला तिच्या आयुष्यात वठवाव्या लागणाऱ्या विविधांगी भूमिका आणि आता तिने श्रमजीवी वर्गाचाही महत्त्वपूर्ण भाग असणे या बाबींचा परामर्श घेतला जात असला, तरी त्याच्या सुप्त आणि मूक परिणामांवर तितकेसे मंथन झालेले नाही. अलीकडेच ‘लॅन्सेट’ नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अभ्यासातून एक तथ्य उघडकीस आले आहे. जगभरातील मानसिक अनारोग्याचे सर्वाधिक ओझे चीन आणि भारत या दोन देशांवर आहे. पैकी, चीनमध्ये सहा टक्क्यांपेक्षाही कमी लोक मानसिक अनारोग्यावर उपचार घेतात आणि भारतामध्ये दहापैकी केवळ एका व्यक्तीला मानसिक आरोग्यासाठी विशेषज्ञाचा सल्ला घेण्याची आवश्यकता वाटते. सामाजिक लांच्छन आणि संसाधनांची कमतरता या बाबींमुळे या दोनही देशांमध्ये कोटय़वधी लोकांना मानसिक अनारोग्यावर कोणतेही उपचार मिळत नाहीत असे तथ्य या संशोधनातून समोर आले आहे. मानसिक अनारोग्य हे विद्यमान भारतासमोरील गंभीर आव्हान आहे. या दिशेने अधिकाधिक संशोधन होणे ही काळाची गरज आहे. त्यातही मानसिक अनारोग्याचा स्त्रीकेंद्री विचार या अनवट मार्गाने अभ्यास केला तर?

या कालसुसंगततेचे भान ठेवून, पेशाने संशोधक असलेल्या महिमा नायर यांनी ‘अगेन्स्ट ऑल ऑड्स : सायकोसोशल डिस्ट्रेस अ‍ॅण्ड हिलिंग अमंग विमेन’ या पुस्तकरूपाने स्त्रियांच्या मानसिक ताणतणावावरील संशोधनाचा तपशील वाचकांसमोर मांडला आहे. भारतातील गरिबी आणि वंचिततेच्या समस्या स्त्रियांमधील मानसिक तणावाशी संबंधित आहेत, असे काही अभ्यासांतून उघडकीस आले आहे. मात्र भारतातील न्यून सामाजिक-आर्थिक स्तरांतील स्त्रियांच्या त्रस्ततेची दखल घेणारे कोणतेही संशोधनप्रकल्प अद्याप हाती घेण्यात आले नाहीत, असे लेखिका म्हणते. सामान्यत: विवाहित, कृषिक्षेत्रात काम करणाऱ्या आणि कमीत कमी शिक्षित स्त्रिया नराश्याने सर्वाधिक ग्रस्त आहेत, अशी मांडणी लेखिकेने केली आहे.

या संदर्भात, प्रस्तुत पुस्तकाचे तीन भाग होतात. एखाद्या व्यक्तीचे अस्वाभाविक वर्तन म्हणजे काय आणि तत्संबंधी समाजशास्त्रीय, सांस्कृतिक, मानसशास्त्रीय, इत्यादी सिद्धान्तांची मांडणी हा पहिला भाग. पुढील भागात लेखिकेने ‘जहांगीरपुरी’ हे अभ्यासक्षेत्र का निवडले, याबाबत खुलासा आणि संशोधनाचा लक्ष्यगट असलेल्या स्त्रियांच्या प्रतिक्रिया नमूद केल्या आहेत आणि तिसऱ्या व शेवटच्या भागात लेखिकेने अभ्यासपूर्ण निष्कर्ष नोंदवला आहे.

भारतीय कुटुंबव्यवस्थेची भावनिक अंगाने जपणूक करण्याचा संपूर्ण भार स्त्रीवर आहे. अनेक भूमिका पार पाडता पाडता एखादी स्त्री मानसिक विकृतीच्या आहारी गेली तर ती बाब सहजी कोणाच्या आणि खुद्द त्या स्त्रीच्यादेखील ध्यानात येत नाही. उपरोक्त साऱ्या बाबींचा परामर्श महिमा नायर लिखित ‘अगेन्स्ट ऑल ऑड्स : सायकोसोशल डिस्ट्रेस अ‍ॅण्ड हििलग अमंग विमेन’ या शोधग्रंथात घेतला आहे. सामाजिक-आर्थिक परिस्थिती आणि स्त्रियांचे मानसिक आरोग्य या बाबी परस्परसंबंधित आहेत, स्त्रियांची समाजातील स्थिती आणि शहरीकरणसंबंधी घटकांचा स्त्रियांच्या मनो-सामाजिक नराश्य पातळीवर परिणाम होतो, या मुद्दय़ांच्या चर्चा या ग्रंथात हाताळल्या आहेत. स्त्रियांच्या मनो-सामाजिक समस्या नेमक्या समजून न घेता त्यावर वैद्यकीय उपचार केले जातात, हा मुद्दादेखील लेखिकेने अभ्यासांती मांडला आहे. या संदर्भात, अभ्यास क्षेत्रांतील स्त्रियांच्या अनेक कथनांचा उल्लेख प्रस्तुत ग्रंथात आढळतो.

संशोधनासाठी गुणात्मक संशोधनपद्धती व प्रतिक्षिप्त लोकबंधात्मक संशोधन आणि विविध स्त्रीवादी परिप्रेक्ष्य ही पद्धती मीमांसाशास्त्रे वापरली आहेत. जहांगीरपुरी हे अभ्यासक्षेत्र डोळ्यांसमोर ठेवून लेखिकेने प्रामुख्याने स्त्रियांच्या काही कथा त्यांच्याच शब्दांत वाचकांसमोर मांडल्या आहेत. जहांगीरपुरी याच क्षेत्राची निवड का केली, याचेही स्पष्टीकरण लेखिकेने दिले आहे. १९७०च्या दशकामध्ये शासनाने दिल्लीच्या परिघीय प्रदेशातील झोपडपट्टी पुनर्वसनाचा निर्णय घेतला. दिल्लीच्या उत्तरेकडील जहांगीरपुरी ही त्यापैकी एक वस्ती होती. साहजिकच तिथे विविध प्रकारचे लोक एकत्र आले होते. जागेची कमतरता, तुटपुंज्या नागरी सोयीसुविधा, आरोग्यरक्षणार्थ घ्यावयाच्या खबरदारीचा अभाव, अशा एक ना अनेक बाबींमुळे येथील लोक विविध प्रकारच्या ताणतणावाला सामोरे जात होते.

एक संशोधक म्हणून लेखिकेला आलेले अनुभवदेखील उल्लेखनीय आहेत. विषय मानसिक ताण-तणावाशी संबंधित असल्याने सुरुवातीला कोणीही मोकळेपणे लेखिकेशी बोलले नाही. संशोधन नेमके कशावर आहे, इत्यादी तपशील त्यांना समजावून सांगितल्याने त्यांचे अवघडलेपण नाहीसे होणार नाही; उलट, ‘आपण त्यांच्यातीलच एक होऊन, त्यांच्या बोलण्यातून पुढे येणाऱ्या माहितीतून आपल्या संशोधनाचे आधार शोधावे असे शेवटी मीच ठरवले,’ असे लेखिका म्हणते.

लेखिकेच्या अभ्यासक्षेत्रातील स्त्री नेमकी कोणकोणत्या प्रश्नांनी त्रस्त आहे, याचा शोध घेण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. कोणाचे तरी वर्चस्व किंवा समाजातील दुय्यम स्थान यांमुळे भोगावे लागणारे सामाजिक परिणाम नेमकेपणाने समजून घेतले जात नाहीत आणि तो अनुभवदेखील सभान घेतला जात नाही. अशा विचारापल्याडच्या किंवा ज्याला कोणतीही वाचा फोडली गेली नाही अशी सामाजिक यातना जगण्याचाच एक भाग होते. या व्यथेतून एखादी विकृती खुणावते, असा विचारदेखील दुरापास्त होऊन बसतो.

विवक्षित व्यक्तींची कोणतीही कृती नियमबाह्य़ (तथाकथित सामाजिक मान्यतांना धरून नसेल) असेल, तर त्या व्यक्तीला मानसिक रुग्ण ठरवले जाते. स्वत:शीच बोलणे, घरकामाला नकार देणे, आरडाओरडा करणे किंवा एकदम शांत होणे अशा सूक्ष्म बाबींचादेखील यामध्ये समावेश होतो. याखेरीज, उदासीनता, शारीरिक दुखणे, इत्यादी बाबींना देखील वेडगळपणा म्हटले जाते. याला कोणतेही सामाजिक-सांस्कृतिक कंगोरे असतील असा विचार केला जात नाही. शिवाय अशा मानसिक आजारांचा गांभीर्याने विचार होत नाही, हा खरा संशोधनाचा विषय होय. सिद्धान्त मांडणीच्या पहिल्या भागात मानसिक अनारोग्यावर उपलब्ध लेखननोंदींची मांडणी केली आहे. यामध्ये समाजशास्त्रातील एमिल डरखीम, टालकॉट पार्सन्स, एर्विग गॉफमन इत्यादींचे दृष्टिकोन, मानववंशशास्त्रीय आधार, स्त्रीवादी दृष्टिकोन, मानसशास्त्रीय परिप्रेक्ष्य नमूद केले आहे. मानववंशशास्त्रीय आधारांनुसार, विवक्षित व्यक्तींची तणावाची लक्षणे, ती लक्षणे सांगण्याची पद्धती, मानसिक आव्हानाला तोंड देण्याची पद्धत आणि इच्छाशक्ती या साऱ्या बाबींवर संस्कृतीचा प्रभाव असतो. स्त्रीवादी टीकाकारांच्या मते, एखादी स्त्री पितृसत्ताक पद्धतीला आव्हान देत असेल, तर तिला मानसिकदृष्टय़ा विकृत अथवा व्याधिग्रस्त ठरवले जाते. मात्र, अलीकडे याकडे पाहण्याचा समग्र दृष्टिकोन आकारास येत आहे असे लेखिका म्हणते. या नव्या दृष्टिकोनाला वैद्यक-मनो-सामाजिक दृष्टिकोन असे म्हणता येईल. म्हणजेच स्त्रीच्या वर्तनाचा नेमका अर्थ लावताना जैविक, मानसिक आणि सामाजिक बाजूंचा परामर्श घेणे होय.

उपरोक्त सिद्धान्तांव्यतिरिक्त, शहरीकरणाचा आणि मानसिक आरोग्याचा संबंधदेखील अधोरेखित केला आहे. विकसनशील देशांमध्ये स्त्रीला पत्नी, आई, इत्यादी अनेक भूमिका एकाच वेळी पार पाडायच्या असतात. अशातच, आता या देशांमधील स्त्री कमावती झाली आहे. त्याबरोबरीने, घरगुती कामे आणि मानसिक तणावाचा संबंधदेखील लेखिकेने ध्यानात आणून दिला आहे. त्यातही शहरी भागातील गलिच्छ वस्तीत राहणाऱ्या स्त्रीची परिस्थिती अधिकच गंभीर आहे. भारतीय समाजातील मानसिक अनारोग्यासंबंधीचे समज-गैरसमज ध्यानात घेऊन धोरणात्मक अंगानेदेखील काही पावले उचलण्यात आली. यामध्ये, १९४६च्या भोरे समितीचा अहवाल, १९६२ सालचा मुदलियार समितीचा अहवाल, १९७४ साली श्रीवास्तव समितीने केलेल्या शिफारशी अशा बाबींचा लेखिकेने आवर्जून उल्लेख केला आहे. अशा अनेक बाबींमुळे प्रस्तुत ग्रंथ माहितीपूर्ण, अभ्यासाधारित आणि विचारप्रवृत्त करणारा ठरेल याबाबत कोणतेही दुमत नाही.

एखाद्या व्यक्तीच्या वर्तनावर सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय यांसारख्या स्थूल आणि शेजार, नातेसंबंध यांसारख्या सूक्ष्म बाबींचा प्रभाव एकाच वेळी होत असतो. या साऱ्या परिस्थितीत व्यक्तीच्या सामाजिक स्थितीचा तिच्या आरोग्यावर परिणाम होतो. कोणत्याही यातनेची सामाजिक पाळेमुळे ध्यानात येत नाहीत किंवा अंगवळणी पडतात. यामुळे त्रस्ततेची पातळी अधिकाधिक गंभीर होत जाते. यावर उपाय म्हणून पूर्वी मंत्रपाठ, प्रार्थना यांसारख्या मानसिक-आध्यात्मिक बाबींचा आधार घेतला जात असे. हा समुदायांतर्गत एक नैसर्गिक उपचार होता. मात्र, पाश्चिमात्य मानसशास्त्रीय पद्धतींनी अशा दैशिक पद्धती मागे पाडल्या, हे सूत्रदेखील लेखिकेने ध्यानात आणून दिले आहे.

आजवर आपण सर्वच मानव्यशास्त्रांचा अलग अलग अभ्यास करत आलो. मात्र, या विषयाच्या अनुषंगाने मानव्यशास्त्रांच्या आंतरशाखीय अभ्यासाचे महत्त्व पुनश्च अधोरेखित होते. कोणत्याही प्रश्नाचा समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशा साऱ्याच अंगांनी विचार होणे ही काळाची गरज आहे. अन्यथा मानव मानसिक, भावनिक आणि पर्यायाने सामाजिकदृष्टय़ा एकाकी होणे प्राप्तच आहे. अलीकडे स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमाचे बदलते स्वरूप, धोरणनिर्मिती प्रक्रियेला आलेले महत्त्व, मानव संसाधनावर देण्यात येणारा भर, इत्यादी बाबीदेखील साऱ्याच मानव्यशास्त्रांचे एकत्रित महत्त्व अधोरेखित करतात. लेखिकेचे अभ्यासक्षेत्र आणि संशोधनाचा लक्ष्यगट मर्यादित असला, तरी मानसिक, सामाजिक अथवा कोणत्याही धाटणीचा प्रश्न सोडवण्यासाठी मानवाने मानव्यशास्त्रापासून दुरावू नये, असाच व्यापक संदेश जणू या ग्रंथातून देण्यात आला आहे.

‘अगेन्स्ट ऑल ऑड्स : सायकोसोशल डिस्ट्रेस अ‍ॅण्ड हिलिंग अमंग विमेन’

लेखिका : महिमा नायर   

प्रकाशक : सेज-योदा, नवी दिल्ली

पृष्ठे: २७६, किंमत : ७९५ रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 1:27 am

Web Title: against all odds psychosocial distress and healing among women book review zws 70
Next Stories
1 बुकबातमी : हक्क की कर्तव्य?
2 बुकमार्क : एका कादंबरीची दुसरी बाजू..
3 इतिहासाचा इतिहास
Just Now!
X