News Flash

रहस्यरंजनापलीकडली अगाथा..

‘पद्मगंधा प्रकाशन’ने गेल्या काही वर्षांत अगाथा ख्रिस्तीची पुस्तकं मराठी वाचकांना उपलब्ध करून दिली.

अगाथा ख्रिस्तीचं एक अभिजात छायाचित्र,  सोबत इंटरपोलच्या सन्मानार्थ निकाराग्वानं काढलेल्या टपालतिकिटावर हक्र्युल पायरो! 

इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद करताना मूळ इंग्रजीचं सौंदर्य अधिक जाणवलं- पुस्तक, लेखक वा व्यक्तिरेखा अधिक सखोलपणाने उमगल्या, हा अनुभव अनेक अनुवादकांना आला असेल.. इथं तर, रहस्यकथासम्राज्ञी अगाथा ख्रिस्ती हिच्या ‘हक्र्युल पायरो’मालेतील १२ पुस्तकांचा अनुवाद! तो करताना काय उमगत गेलं?

‘पद्मगंधा प्रकाशन’ने गेल्या काही वर्षांत अगाथा ख्रिस्तीची पुस्तकं मराठी वाचकांना उपलब्ध करून दिली. शेवटचे दोन संच प्रत्येकी सहा-सहा पुस्तकांचे. एक संच गेल्या वर्षी आणि दुसरा आणि अखेरचा नुकताच प्रसिद्ध झाला. या प्रकाशनसंस्थेने जेव्हा अगाथा ख्रिस्तीच्या या १२ पुस्तकांचा अनुवाद कराल का, म्हणून विचारलं तेव्हा प्रथमदर्शनी प्रेमात पडतात तसं मी हो म्हणून टाकलं. साधारण तीसेक वर्षांपूर्वी लोकल ट्रेनच्या रोजच्या प्रवासात अगाथाची काही पुस्तकं – त्यात मिस मार्पलच्याही कथा होत्या- वाचली होती – निव्वळ आनंदासाठी! आणि अगाथा ख्रिस्ती खूप आवडली होती. पण तेवढंच. या लेखिकेच्या पुस्तकांचा अनुवाद आपल्याला करायला मिळेल का किंवा तिच्या रहस्यकथांच्या शैलीची चिकित्सा वगैरे असे काही विचार केले नव्हते. पण ती आवडलेली लेखिका म्हणून मनात रुतून मात्र बसली असावी. म्हणूनच तत्काळ हो म्हणून टाकलं असावं, पण त्याचक्षणी अगाथा ख्रिस्तीच्या लेखनाच्या अनुवादाची आव्हानं मनात उमटू लागली असावीत आणि त्यांनीही मोहात पाडलंच असणार. पाडलं होतंच. अरुण जाखडे यांच्या ‘पद्मगंधा’साठी अगाथा ख्रिस्तीच्या बऱ्याच पुस्तकांचे अनुवाद नाटककार, लेखक मधुकर तोरडमल यांनी केले होते, ते अर्थातच माहीत होतं. पण मी ते अनुवाद वाचले नव्हते. स्वत: अनुवाद करत असले तरी जी भाषा वाचता येते, समजते, त्या मूळ भाषेतलंच पुस्तक वाचायला मला जास्त आवडतं. म्हणून मग पुस्तकांचे अनुवाद वाचले जात नाहीत. (यात कुणाला दुष्टपणा वाटेल. स्वत: अनुवाद करून दुसऱ्याच्या माथी मारायचे आणि स्वत: वाचताना मात्र मूळ पुस्तकाचा आग्रह धरायचा, म्हणजे काय? हे बरोबर आहे का? परंतु खरं कारण असं आहे की, वाचक म्हणून मूळ पुस्तकातल्या जगात थेटच घुसावंसं मला वाटतं. आणखी एक कारण म्हणजे इतरांचे अनुवाद वाचताना उगाचच चिकित्सा व्हायची आणि तेही नको वाटतं.) जी भाषा मुळात कळतच नाही त्या भाषेतील पुस्तकाच्या अनुवादावर अवलंबून राहणं ही गोष्ट वेगळी. असो.

अनुवादाला सुरुवात केली तेव्हाही मी ती पुस्तकं आधी वाचली किंवा चाळली नाहीत. कारण अनुवाद करता करता त्यातलं रहस्य उलगडत जायला मला हवं होतं. आणि अनुवाद करता करताच अगाथाच्या या रहस्यकथांचा रहस्यरंजनापलीकडे विचार व्हायला लागला. रहस्य आणि त्याची उकल हा गाभा असला तरी अगाथाला माणसांचे स्वभाव, त्यांची सांस्कृतिक वैशिष्टय़ं यांचं विलक्षण आकर्षण आणि विलक्षण भान आहे असं वाटतं. तिची रहस्यं निर्माण होतात ती आणि त्यांची प्रायव्हेट डिटेक्टिव्ह हक्र्युल पायरोंनी (किंवा मिस मार्पलनीही) केलेली उकल आहे तीच मुळी मानवी स्वभाववैशिष्टय़ांतून. अगाथाला आणि पर्यायाने पायरोंना मानवी स्वभावाचं अचूक ज्ञान आहे. घटनास्थळी सापडलेला केस, बटण, हातरुमाल, बोटांचे ठसे अशा क्लिशेजचा वापर पायरो म्हणजे पर्यायानं अगाथा करीत नाही. ते शांतपणे खुर्चीत बसून विचार करून रहस्याची उकल करतात.

रहस्यकथांच्या भाषेबद्दल फारसं गंभीरपणे बोललं जात नाही. रहस्यकथेला साहित्यिक मूल्य वगैरे आहे-नाही याचा विचार करण्याची तसदीही फारशी कुणी घेताना दिसत नाही. पण अगाथाच्या शैलीनं या समजुतीला छेद द्यायला भाग पाडलंय. या पुस्तकांचे अनुवाद करायला घेतले नसते तर कदाचित मीही हीच समजूत बाळगून असते. फक्त अगाथा एवढी र्वष लोकप्रिय कशी राहते याचं उत्तर सापडलं नसतं. उत्तर शोधलंही नसतं.

जागतिकीकरणाने इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच भाषिक अभिव्यक्तीलाही सोडलेलं नाही. अगाथाची भाषा ही जागतिकीकरणाच्या खूप आधीची – विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातली आहे. त्यामुळे ती आपलं व्यक्तिमत्त्व राखून आहे. त्यामुळेच या भाषेतील अभिव्यक्तीच्या अनुवादाला आव्हानाची एक धार चढते. त्यातले अनेक वाक्प्रचार आजच्या भाषेत क्वचितच सापडतील. ते त्या वेळच्या ब्रिटनच्या प्रवृत्ती आणि वातावरणाचे, त्यात डोकावणाऱ्या इतर युरोपीय संस्कृती-भाषांच्या प्रवृत्ती आणि वातावरणाचे, त्यांच्या आपापल्या अस्मितांचे भाषेत उमटणारे पडसाद आहेत. कधी कधी ते एखाद्या मिथकापोटी जन्माला आलेले असतात, अभिजात साहित्यिक संदर्भ लेवून आलेले असतात. त्यांच्या अर्थगंधाचा मागोवा घेण्याचा, त्यांचे स्रोत शोधून काढण्याचा एक छंदच जडतो मग अनुवाद करता करता. भाषेची इतिहास-भूगोल-संस्कृती-मानवी प्रवृत्तीविशिष्ट कोडी उलगडण्याच्या प्रयत्नाचा हा आनंद म्हणजे अनुवादाच्या जॉबमध्ये मिळालेला बोनस होय.

उदाहरणार्थ, १९३५ मध्ये प्रथम प्रसिद्ध झालेल्या ‘थ्री अ‍ॅक्ट ट्रॅजेडी’मधला सर चार्ल्स कार्टराइट हा रंगभूमीवरचा मध्यमवयीन अभिनेता नवतरुण मिस हर्मियॉन लिटन गोरच्या प्रेमात पडलाय. त्याच्या या प्रेमाचं काय होणार आहे? ती आहे का त्याच्या प्रेमात? त्याला तसं वाटतंय, पण.. या संदर्भात कार्टराइटच्या मित्राला- सॅटर्थवेटला टेनिसनची एक कविता आठवते. कवितेतलं नेमकं कडवं जे अगाथानं उद्धृत केलं आहे ते तसं तळटीप देऊन जसंच्या तसं ठेवताही आलं असतं. पण, मराठी वाचक त्याच्या संपूर्ण संदर्भाला आणि परिणामी त्यातल्या भावतीव्रतेलाही मुकला असता असं वाटलं. म्हणून मी त्या कवितेचा अनुवाद केला. परंतु त्याआधी ती संपूर्ण कविता शोधून काढून वाचली. आणि तो एक विलक्षण अनुभव होता. टेनिसनची ‘लान्सेलॉट आण्ड एलेन’ ही ती कविता. अनुवादित कडवं मुद्दाम खाली देत आहे. –

तिच्या वयाच्या दुपटीहूनही थोर असा सरदार

वण गालावर तलवारीचा कधी काळचा खोल

जखमांच्या अन् खुणा तनूवर, वर्ण रापलेला

परि तिने उचलुनी नजर पाहिले आणि वरिले त्याला

ते प्रेम तियेचे

तिच्या मृत्यूचे

आणि अखेरी

कारण ठरले साचे

काही जाणवतंय? आठवतंय? ऑथेल्लो आणि डेस्डिमोना? शेक्सपिअरनं हे प्रेम-घटित आधीच रंगवून ठेवलंय! एखाद्या लोकगीतासारखी – लोककथेसारखी – बॅलडसारखी – ही दीर्घकविता आहे. जिच्यावर प्रेम केलं त्या आपल्या तरुण कोवळ्या पत्नीला – एलेनला – तिचा सरदार पती संशयावरून ठार मारतो. तिचं कलेवर नावेत ठेवलं आहे. नाव नदीत फिरते आहे. तिच्या कलेवराच्या एका हातात लिलीचं फूल आहे. तिच्या नितळ सौंदर्याचं आणि तितक्याच नितळ निरागस प्रेमभावनेचं जणू प्रतीक. म्हणून ती लिलीमेड. ही कविता आणि शेक्सपिअरचं ‘ऑथेल्लो’ (१६वं शतक) या दोहोंचं मूळ या मिथकात असेल का? तसा उल्लेख कुठे सापडला नाही. पण या दंतकथेची मुळं १३ व्या शतकात सापडतात. किंग ऑर्थर आणि त्याच्या सरदारांच्या आख्यायिकांमध्ये तिचा उल्लेख येतो. आणि दंतकथांप्रमाणेच तिची अनेक व्हर्शन्स सापडतात. अशा लोकप्रिय दंतकथा या अनेकदा पुढच्या काळातल्या प्रतिभावंत लेखक-कवींच्या कलाकृतींमागच्या प्रेरणा बनतात, त्यांचे विषय बनतात. सर थॉमस मॅलरीच्या ‘ल मोर्त द आर्थर’ (१५ वं शतक) आणि टेनिसन (१९वं शतक)च्या प्रसिद्ध ‘आयडिल्स ऑफ द किंग’ – किंग ऑर्थरच्या कथा सांगणाऱ्या त्याच्या दीर्घकविता – या लिलीमेड एलेनच्या शोकांतिकेचे उल्लेख करतात. टेनिसनची ‘द लेडी ऑफ श्ॉलॉट’ ही कवितादेखील या दंतकथेतून स्फुरलेली आहे. ‘ऑथेल्लो’चा उल्लेख नाही सापडला; पण साम्य जाणवत राहिलं. असे जिज्ञासा जागवणारे संदर्भ हवंसं वाटणारं अस्वस्थपण देऊन जातात खरे.

अगाथाच्या कथनात असे साहित्यिक संदर्भ सतत येतात. हर्मियॉन लिटन गोर ही ऑलिव्हर मँडर्स या व्यक्तिरेखेच्या कंजूषपणाचा उल्लेख करताना त्याला ‘शायलॉक’ असं संबोधते आणि त्याबरोबर त्याचं निरीक्षण करणाऱ्या सॅटर्थवेटला तो ज्यू असल्याचं लक्षात येतं. ‘थ्री अ‍ॅक्ट ट्रॅजेडी’मधली मध्यवर्ती व्यक्तिरेखाच मुळी रंगभूमीवर अभिनय करत निवृत्त झालेली पण अर्थातच अभिनय जिच्या रोमा-रोमांत साहजिकच भिनलेला आहे अशी. त्यामुळे शेक्सपिअरच्या नाटकांचे संदर्भ बोलण्यात सहजपणे येतात. हा अभिनय हे या कथेतलं महत्त्वाचं तत्त्व आहे, एवढंच इथं सांगते.

वाक्प्रचार हे त्या त्या संस्कृतीतून बनतात. त्यामुळे एका संस्कृतीतील वाक्प्रचार दुसऱ्या संस्कृतीत आणताना त्या संस्कृतीच्या प्रकृतीला साजेशा प्रतिमांच्या साह्य़ाने त्यांचं रूपांतर करावं लागतं हे वेगळं सांगायला नको. उदा. ‘पॉट कॉलिंग द केट्ल ब्लॅक’साठी ‘कावळ्यानं कोळशाला काळा म्हणण्यासारखं’ आहे असं म्हणावं लागतं. अशा प्रकारची रूपांतरं करणं हाही अनुवादादरम्यान करता येणारा मनोरंजक उद्योग. अगाथाच्या बारा पुस्तकांनी त्याला भरपूर रान मोकळं सोडलं होतं.

अगाथाचं पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं ते पहिलं महायुद्ध संपल्या संपल्या. तिथून पुढे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातलं जग तिच्या पुस्तकांतून व्यक्त होत राहिलं. अगाथा ज्या काळात या कथा लिहीत होती त्या काळातील जागतिक घडामोडींचे संदर्भ, अर्थातच ब्रिटिश आणि युरोपियन दृष्टिकोणातून यात सतत येत राहतात. किंबहुना तिच्या जगाविषयीच्या अनुभवांचं हे सार असतं. पुरातत्त्वशास्त्रज्ञ पतीमुळे अगाथाला मेसोपोटेमिया, इजिप्त अशा पुरातत्त्वसमृद्ध भागांतलं वास्तव्य लाभलं आणि ते तिच्या कथांमधून उतरलं. कधी एखादी व्यक्तिरेखा ब्रिटिशांची प्रमुख वसाहत असलेल्या हिंदुस्तानात जाऊन आलेली असते, लष्करी अधिकारी म्हणून किंवा अन्य प्रकारे, कधी लंडनमध्ये घडलेल्या राजकीय खुनाच्या प्रयत्नातल्या संशयितांमध्ये कुणी तरी लंडनमध्ये वास्तव्य करून असलेला हिंदुस्तानी क्रांतिकारी असतो, कुणाचा मुलगा सिलोनमध्ये असतो, तर कुणी द. आफ्रिकेत. १९३४ मध्ये प्रथम प्रसिद्ध झालेल्या ‘मर्डर ऑन ओरिएण्ट एक्सप्रेस’मध्ये तर आशिया खंड ते युरोप खंड अशा रेल्वे प्रवासात त्या वेळचे अनेक देश, तिथल्या वृत्ती-प्रवृत्तींसह, सूक्ष्म राजकीय, प्रशासकीय संदर्भासहित डोकावतात. ब्रिटनमध्ये घडणाऱ्या घटनांमध्ये हिंदुस्तानातल्या स्वातंत्र्य चळवळीच्या गरम वाऱ्यांच्या झुळकादेखील मधूनच जाणवतात. अमेरिकन आणि ब्रिटिश प्रवृत्तींमधला विसंवाद, अस्मितांची टक्कर बोलण्यात खेळकरपणे पण सहेतुक येत असते.

पहिल्या महायुद्धानंतर शरणार्थी म्हणून इंग्लंडमध्ये येऊन राहिलेल्या व उर्वरित आयुष्यात तिथेच प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणून करिअर करणारा पायरो हा स्वत: बेल्जियन माणूस आणि फ्रेंच बोलणारा. त्याच्या सवयींतून या फ्रेंच प्रवृत्ती तर ओसंडून वाहत असतातच. ब्रिटिश सपकपणा, शिष्टपणा यांच्यावरही हा फ्रेंच भाषेचा आणि राहणीचा अभिमानी, संधी मिळताच टिप्पणी केल्याशिवाय राहत नाही. (त्यामुळे ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या देशातल्या वाचकाला मनोमन ‘बरी जिरवतोय’ असं समाधानही मिळतं. ) आजचं युग जागतिकीकरणाचं असलं, जग जवळ आलं असलं, एकमेकांत मिसळलं असलं तरीही अशा या भााषिक, जातीय, धार्मिक, सांस्कृतिक अस्मितांचे कंगोरे मुळीच बोथट झालेले नाहीत. उलट ते अधिकच टोकदार झाल्याचं ठायी ठायी प्रत्ययाला येत असतं. अगाथाच्या कथांचा अनुभव त्यामुळेही असा कालातीत होऊन गेलेला दिसतो.

त्याचबरोबर हक्र्युल पायरोची व्यक्तिरेखा- संस्कृतिविशिष्ट, पण माणूसपण म्हणून चिरंतन मूल्यांचा आग्रह धरणारी अशी आहे. हे फार महत्त्वाचं आहे. पायरो रहस्याची उकल करतो ते त्याचा व्यवसाय म्हणून, त्याचं आवडतं काम म्हणून, त्याचं मानवतेप्रति एक मिशन म्हणून. अन्याय करणाऱ्याविषयी त्याला चीड आहे, अन्यायाचा बळी ठरलेल्याविषयी अपार करुणा आहे आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी तो झटतो. संशय तो सगळ्यांवरच घेतो. तिथे डावं-उजवं नाही, पण मानवी स्वभावाचं अचूक ज्ञान त्याला नेमकी दिशा दाखवतं. स्पर्धा तो कुणाशीच करत नाही. पोलीस खात्यातले अधिकारी मात्र त्याला प्रतिस्पर्धी समजतात आणि कुरघोडी करू पाहतात. पण पायरो आपल्या चालीनं चालत राहतो आणि आपसूक जिंकतो. बरं, त्या जिंकण्याचंही त्याला कौतुक नाही. त्याला महत्त्व वाटतं ते ‘माणसावर झालेला अन्याय दूर करण्या’चं. खऱ्या गुन्हेगाराला पकडून देण्याचं. तरुणांविषयी, प्रेमी जनांविषयी त्याच्या मनात माया आहे आणि औचित्याचं नेमकं भान आहे. जगातले सारे तिमिर जावे आणि सत्य आणि सुख नांदावे ही इच्छा त्याची प्रेरणा आहे. पायरोच्या व्यक्तिरेखेतून सतत व्यक्त होणारी ‘सत्’वरची अगाथाची ही निष्ठा हे या कथांचं चिरंतन मूल्य बनतं. त्यामुळे एकाचवेळी या रहस्यकथा नुसत्या रहस्यकथा न राहता माणसाच्या कथा होऊन जातात आणि स्थळ-काळातूनही आरपार प्रवास करत राहतात- ओरिएण्ट एक्स्प्रेससारख्या! रहस्याची उकल करण्याच्या बाबतीत तर पायरो निश्चयाचा इतका महामेरू आहे की ‘हार पत्करणं मला मानवत नाही’, असा सार्थ अहंकारही सतत त्याच्या व्यक्तिमत्त्वातून प्रस्फुटित होत असतो. त्याची विनोदी दिसणारी मूर्ती आणि हा सार्थ अहंकार आणि जोडीला त्याची ही चिरंतन निष्ठा यामुळे ही जागतिक साहित्यातली एक लोभस, सर्वप्रिय व्यक्तिरेखा झाली आहे असं वाटतं. शेरलॉक होम्सइतकीच लोकप्रिय.

अगाथा ख्रिस्तीच्या या स्थल-कालातीत वैशिष्टय़ांमुळे या कथांचा अनुवाद हा एक सार्थक प्रयत्न असल्यासारखं वाटतं. आत्तापर्यंत माझ्या कोणत्या अनुवादासंबंधात मी केला नव्हता असा एक प्रयोग या पुस्तकांच्या बाबतीत करून पाहिला. हा अनुवाद आपण केलेला आहे हे विसरून, ही शब्दयोजना आपली आहे हे विसरून त्रयस्थ वाचक म्हणून काही पुस्तकं वाचली. रहस्यकथेत रहस्याची उकल एकदा झाली की मग वाचकाच्या लेखी त्या रहस्यकथेचं अस्तित्व संपतं, एकदा वाचून झालं की दुसऱ्यांदा वाचण्यात रस राहत नाही, असा एक सामान्य अनुभव असतो. पण हिचकॉकचे चित्रपट मी आणि जगातले असंख्य प्रेक्षक पुन:पुन्हा पाहतात हा अनुभव गाठीला आहेत. नेमका हाच अनुभव अगाथा ख्रिस्तीची पुस्तकं देताहेत असाही अनुभव आला, येतो. ‘हूडनइट’- खुनी कोण आहे – हे कळलेलं असूनही त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा पायरोचा प्रवास, मानवी  मनाची तो करत गेलेली उकल ही सगळी प्रक्रिया पुन्हा तेवढाच रस घेऊन अनुभवताना तेवढंच गुंगायला होत होतं. हिचकॉकची ट्रीटमेंट जशी गुंगवून ठेवते तसं.

रेखा देशपांडे

deshrekha@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 2:46 am

Web Title: agatha christie hercule poirot
Next Stories
1 चोहीकडे पाहणारे डावे
2 विज्ञानाचं माहितीरंजन!
3 धाडस दाखवूनही दुर्लक्षित..
Just Now!
X