|| किरण लिमये

अवकाळ आपल्या जगण्याचा स्वाभाविक ओघ बदलतो. हा बदल आपल्याला अनेक मूलभूत तात्त्विक प्रश्नांचा विचार करायला लावतो. आल्बेअर काम्यूची ‘द प्लेग’ ही कादंबरी म्हणजे खोलवर बेचैन करणाऱ्या या प्रश्नांची गोष्ट आहे… 

freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

२०२० मध्ये कोविडची लाट जगभर पसरली तसं आपल्या आयुष्यांचा प्रवाह रोखणाऱ्या या आकस्मिक संकटाचा अर्थ लावण्याची गरज वाढली. या गरजेची एक परिणती म्हणजे कोविडच्या अगोदर आलेल्या महामारीच्या काळाबद्दल असलेले साहित्य लोक पुन्हा वाचू लागले. आल्बेअर (आल्बर्ट) काम्यूच्या ‘द प्लेग’चा खप या काळात वाढला.

पण ‘द प्लेग’ ही आपल्या आयुष्याची गती रोखणाऱ्या कोविडसारख्या एका रोगाबद्दलची, त्या रोगाच्या साथीतल्या एका शहराबद्दलची कादंबरी आहे, हे उथळ विधान होईल. काम्यूने प्लेग हे रूपक म्हणून वापरले आहे. जो अवकाळ काम्यू जगत होता, निरखत होता, त्या अवकाळासाठी वापरलेले हे रूपक आहे. अवकाळ म्हणजे समाजाची जगण्याची अवांछित अवस्था. प्लेग आणि त्यात अडकलेलं शहर यांच्या रूपकातून काम्यू जो अवकाळ पकडतो, त्या काळात माणसाचं स्वातंत्र्य संकोचतं आणि जिवंत राहणं हा नशिबाचा भाग होऊन उरतो.

या अवकाळाचे तपशील, त्याच्या उत्पत्तीची कारणं, त्याचे नायक आणि खलनायक यांच्यात काम्यूला स्वारस्य नाही. अवकाळ आपल्या जगण्याचा स्वाभाविक ओघ बदलतो. हा बदल आपल्याला अनेक मूलभूत तात्त्विक प्रश्नांचा विचार करायला लावतो. या प्रश्नांनी बेचैन होणाऱ्यांसाठी या प्रश्नांची उकल महत्त्वाची असते, कारण त्याशिवाय त्यांना अवकाळानं आणलेल्या हतबुद्धतेतून बाहेर पडता येत नाही. ‘द प्लेग’ म्हणजे खोलवर बेचैन करणाऱ्या या प्रश्नांची गोष्ट आहे.

नावाप्रमाणे ‘द प्लेग’मधला काळ हा प्लेगच्या साथीचा आहे आणि स्थळ आहे ओरान नावाचं शहर. खऱ्याखुऱ्या ओरानमध्ये १८५० च्या सुमारास आलेल्या कॉलराच्या साथीचे संदर्भ वापरत काम्यूनं १९४० च्या दशकात ‘द प्लेग’ लिहिली. दुसऱ्या महायुद्धातील फ्रान्स हिटलरच्या ताब्यात असण्याची पार्श्वभूमी या लिखाणाला आहे. या प्रेरक वास्तवाची तात्त्विक चौकट काम्यू घेतो, आणि कल्पित प्रतितपशील उभारण्याचा झगडा सोडून रूपकाच्या माध्यमातून केवळ केंद्रिभूत तात्त्विक प्रश्नाला हात घालतो. पण रूपकाचा विस्तार खुबीनं आणि नेमक्या तपशिलांनिशी करण्याच्या काम्यूच्या कौशल्यानं हे मुख्यत्वेकरून रूपक असण्याची जाणीव वाचताना होत नाही. कदाचित त्यामुळेच ‘द प्लेग’चा कोविडशी सहज संबंध जोडला गेला असावा.

‘द प्लेग’ची गोष्ट म्हटली तर एकदम साधी आहे. एका शहरातील प्लेगची सुरुवात, साथ तीव्र होणं, त्या साथीतले लोकांचे जगणे आणि मग गोष्टीचा शेवट. ओरान शहराचा बाहेरच्या जगाशी असलेला संबंध प्लेगच्या साथीमुळे तुटतो. मग ओरानमध्ये प्लेगची साथ पसरत जाते. या लाटेमुळे लोकांच्या जीवनात आलेला व्यत्यय, सक्तीचं एकाकीपण आणि लोकांचा आत्मशोध हीच कादंबरी आहे, असे काम्यूच कादंबरीत एका ठिकाणी म्हणतो. दु:खाच्या आणि आत्मशोधाच्या प्रवासाची ही दास्तान, पात्रांना दिलेल्या नेमक्या पाश्र्वकथा, किंचित सिनिकल वाटणारी अलिप्त व निष्कर्षक वाक्ये, आणि पात्रांचे आपापल्या भूमिका मांडणारे संवाद यांतून सखोल तत्त्वकथा बनते.

काम्यू प्रचंड निर्विकारपणे, पण तरीही जिवंत साक्षीभावानं आपल्याला गोष्ट सांगतो आणि तात्पर्यांची गुंतागुंत उभी करतो. स्वातंत्र्य आणि जीवन या दोन्हींचा संकोच करणाऱ्या अवकाळाचे काय करायचे याबद्दल काम्यूचा स्वत:चा एक निष्कर्ष आहे. ‘द प्लेग’मधील मध्यवर्ती पात्र डॉ. रिअच्या मार्फत काम्यूची भूमिका उलगडत जाते. पण काम्यू स्वत:खेरीज इतर भूमिकांना तुच्छतेनं खिजवण्याचा पर्याय निवडत नाही. चूक-बरोबरच्या पलीकडे जाणारी मानवी संवेदनशीलता हे काम्यूच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे. आपल्या जीवनाला अर्थपूर्ण करण्याचा भास करून देणारे अनेक संदर्भ जगड्व्याळ, अनपेक्षित संकटांच्या काळात निरुपयोगी ठरतात, असे तो आपल्या संवेदनशीलतेच्या मदतीनं दाखवून देतो. केवळ आपलं शारीर अस्तित्व टिकवणं हीच आपली अवकाळी प्राथमिकता बनते.

ईश्वराच्या योजनेतून जग जन्माला आले, असं मानणाऱ्या आस्तिक माणसानं अशा अवकाळात काय करावं, हा प्रश्न कादंबरीत एका पाद्र्यामार्फत येतो. आणि काम्यू आस्तिकतेची भूमिका तिच्या अत्यंत टोकाच्या स्वरूपात मांडतो. ‘जर पाद्री डॉक्टरची मदत मागत असेल तर तो विरोधाभास आहे’ असे फादर पानलू म्हणतो, इतकी ही टोकाची भूमिका आहे. सुरुवातीला फादर पानलू ईश्वरानं आत्मपरीक्षण करण्याची, आपल्या आस्तिक्याला परत मिळवण्याची दिलेली संधी म्हणून अवकाळाकडे बघतो. पण नंतर लोकांच्या यातना बघून त्याला जाणवते की, या यातना आणि ईश्वरावरचा विश्वास यांत उघड संबंध नाही. ‘हे असं का?’ असा प्रश्न विचारत या यातनांशी झगडा करण्यापेक्षा त्या यातना ईश्वराचे प्रेम मानून स्वीकाराव्यात, अशी टोकाची भूमिका तो या टप्प्यावर घेतो. आस्तिक माणसाची ही भूमिका अनेकांच्या भूमिकेशी विसंगत आणि अगतिक आहे. पण ती कमालीची प्रामाणिक आहे- ईश्वराच्या निर्णयाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आस्तिकाला नाही, त्यानं त्या निर्णयाचा फक्त स्वीकार करण्याची मुभा त्याला आहे.

फादर पानलूचा अगतिक नियतीवाद काम्यू फार पुढे नेत नाही. कादंबरीत तारू हे एक महत्त्वाचं पात्र आहे. प्लेग सुरू होण्याच्या अगोदर तारू ओरानमध्ये येतो आणि तेथील एका हॉटेलात राहात असतो. त्याची निरीक्षणं आणि पूर्वकथा हा कादंबरीचा लक्षणीय भाग आहे. फादर पानलूच्या भूमिकेबद्दल हा तारू म्हणतो की, आस्तिक मनुष्यासाठी फादरची भूमिका योग्य आहे. पुढे फादर पानलू आपल्या भूमिकेशी एकनिष्ठ राहून, एकाकी धैर्यानं प्लेगला सामोरा जातो. त्याच्या वागण्याच्या योग्यायोग्यतेबद्दल काम्यू थेट काहीच बोलत नाही. पण डॉ. रिअ म्हणतो, ‘माझा ईश्वरावर विश्वास नाही. पण म्हणून मला जगाची काही पडलेली नाही असं मात्र नाही. जिथं शक्य आहे तिथं गोष्टी सुधाराव्यात असं मला वाटतं.’

आज कोविडच्या काळातही ईश्वराबद्दल अशी चुटपुटती अगतिक मते, कोप आणि परीक्षा ऐकू आली होती. पण अशा मतांना मध्यवर्ती स्थान मिळाले नाही. आपल्याला करोना विषाणूसोबत जगायला शिकायचं आहे, हे अनेकदा केलं जाणारं हतबल विधान फादर पानलूच्या अधिक जागृत नियतीवादापेक्षा बरं का वाईट, असा प्रश्न पडला.

अवकाळाकडे बघण्याची ही नियतीवादी भूमिका. दुसरी आहे ती अवकाळाकडे युद्ध, स्वत:ला सिद्ध करण्याची वेळ अशा तप्त भूमिकांतून पाहणे आणि अवकाळातील मानवी निर्णयांना त्याग, शौर्य अशा रंगांचे ठिपके देणे. मागच्या सव्वा वर्षात आपण हा दृष्टिकोन पुरेसा अनुभवला आहे. कादंबरीतला पत्रकार रॅम्बेर जेव्हा प्लेग रुग्णांसाठी मदतपथके स्थापन करण्याच्या डॉ. रिअ आणि तारू यांच्या निर्णयाकडे ‘उच्च संकल्पनेसाठी त्याग’ अशा दृष्टिकोनातून पाहतो, तेव्हा डॉ. रिअ त्याला सांगतो की, लोकांना केलेली मदत हे मानवी सौहार्द आहे आणि आपल्याला त्यात कितीही विसंगती दिसली तरी सौहार्द हाच प्लेगशी झगडायचा मार्ग आहे. रिअ स्वत: डॉक्टर असल्याने लोकांच्या यातना कमी करण्याचे काम करत राहणं हेच त्याच्यालेखी सौहार्द आहे, असंही तो सांगतो.

डॉ. रिअची ही भूमिका गांधीवादी आणि कर्मयोगवादी आहे असे कुणी म्हटले आहे का, हे तपासलं पाहिजे. कारण दोहोंमध्ये थेट साधर्म्य आहे. काम्यू स्वत: कम्युनिस्ट होता. पण राजकीय हिंसेबाबत, विशेषत: एखाद्याला मारणं गरजेचं आहे असं मानून केल्या जाणाऱ्या संस्थात्मक हिंसेबाबत त्याची मते नकारात्मक होती. कादंबरीत तारूच्या पात्राच्या रूपानं काम्यू हिंसेबाबतची त्याची भूमिका मांडतो. तारूच्या पात्राद्वारे तो एक अत्यंत प्रभावी प्रश्नही उभा करतो : ईश्वर न मानणारा संत असू शकतो का? हा प्रश्न हे काम्यूच्या रूपकवापराचे अत्यंत प्रभावी उदाहरण आहे. एकीकडे अमुक प्रकारचे लोक मारण्यायोग्य असतात असे ठरवणारी निर्घृण विचारसरणी आहे, पण त्यातही जरुरीपुरत्या हिंसेचा स्वीकार आहेच. ही जरुरीपुरती हिंसा बहुतेक समाजापासून दडवून ठेवली जाते आणि तिला स्वीकारार्हतेचा मुलामा दिला जातो. पण म्हणून या मर्यादित हिंसेचा बळी ठरलेल्या माणसाचा अनुभव उदात्त वा कमी वेदनादायी ठरत नाही. या हिंसेची जबाबदारी शेवटी ती हिंसा गरजेची आहे असं मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आहे. पण समाजरचनेची कुठलीही चौकट हिंसेचा पूर्ण निषेध करताना दिसत नाही. सगळ्याच चौकटी ‘मारणारे आणि मरणारे’, ‘हिंसा करणारे आणि हिंसा सोसणारे’ अशा प्रकारचे विभाजन करतात आणि त्याचं समर्थनही करतात. माणसांना अशा गटांत न विभागता माणसाकडे पाहण्याला तारू ‘संत होणे’ म्हणतो.

वास्तविक धर्माकडे अशी सर्वांना सामावून घेणारी चौकट आहे. अनेक धर्मांत शांतीच्या विलक्षण अवस्थेला पोहोचलेली व्यक्ती, तिच्या संपर्कात येणारी क्रूर व्यक्ती आणि क्रूर व्यक्तीशी वागणारा समाज यांच्या गोष्टी आहेत; उदाहरणार्थ, बुद्ध आणि अंगुलीमाल, वाल्या कोळी, ख्रिस्त आणि अपराध्याला दगड मारणारा जमाव. ‘एखादा माणूस कोण आहे याचा निर्णय ईश्वर करणार, तुम्ही-आम्ही नाही’ हे श्रद्धेचं टोक कोणत्याही व्यक्तीचा धिक्कार न करता तिला स्वीकारण्याची मुभा देतं. इतकी मुभा आज पावित्र्याच्या शिखरावर असलेल्या लोकशाहीच्या चौकटीतही नाही. उदाहरणार्थ, लोकशाहीतला तुरुंगवास हा अपराधी आणि निरपराधी व्यक्तींमधली भिंत अधिकाधिक पक्की करतो असाच काही अपवाद वगळता येणारा अनुभव आहे.

स्वत:च्या आयुष्याचं नियमन करण्यासाठी मानव पात्र नाही, असं मानणारी धर्माची चौकट स्वीकारली नाही तरीही, कुणाचाच बळी समर्थनीय न ठरवणारी एखादी व्यवस्था अस्तित्वात येऊ शकेल का, हा तारूचा प्रश्न आहे. काम्यू त्याचंही उत्तर देत नाही. तो डॉ. रिअच्या वागण्याची वाट अधोरेखित करतो.

डॉ. रिअ हे काम्यूच्या जीवनदृष्टीचं प्रतीक आहे. कामूच्या जीवनदृष्टीत मानवी अस्तित्वाला अंगभूत अर्थ नाही. आपली सुखशोधांची धडपड ही आपल्याला नैमित्तिक ध्येये पुरवत राहते आणि ही ध्येये गाठण्याची धडपड अंगभूत अर्थाची पोकळी भरून काढते. ही धडपड अव्याहत चालू राहील अशा दृष्टीनं प्रयत्न करणं हेच समाजाचा विचार करणाऱ्यानं पाहायचं आहे. दुसऱ्याला त्याच्या धडपडीसाठी मुभा देणं, मदत करणं, त्यातला अडथळा न बनणं हेच मानवी सौहार्द आहे आणि माणसांमधले सौहार्द जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत राहणं हेच या धडपडीवर टाच आणणाऱ्याला दिलेलं उत्तर आहे. डॉ. रिअच्या कृतीतून, निरीक्षणातून, संवादातून हे सौहार्द काम्यूनं जिवंत केलं आहे.

काम्यूच्या कादंबरीतील प्लेग हे माणसाच्या सुखशोधाच्या धडपडीला मर्यादा घालू पाहणाऱ्या अनपेक्षित संकटांवरचे रूपक आहे. ही संकटे मानवनिर्मित असतील किंवा नसतील, ती सगळ्या समाजाला व्यापतील किंवा काही थोड्या व्यक्तींना ग्रासतील; पण कादंबरीच्या शेवटी काम्यू म्हणतो तशी ती येतच राहणार. आजवरचा प्रवास तर तसाच आहे. आपण अशा अवकाळाचा हतबल किंवा धीरोदात्त स्वीकार करू शकतो, अवकाळाची मंगल-अमंगल अशी लढाई बनवू शकतो किंवा सहज मानवी सौहार्दानं एकमेकांना सोबत करू शकतो. जशी धडपड आपापली आहे, तशी निवडही.

kiranlimaye11@gmail.com