जॉर्ज सॉण्डर्स हे यंदाच्या ‘मॅन बुकर पारितोषिका’चे विजेते, त्यांचे कौतुक आता सुमारे पंधरवडय़ाभरानंतर ओसरू लागले असतानाच इंग्रजी कादंबऱ्यांसाठीच्या या बहुचर्चित आणि बहुप्रतिष्ठित पुरस्काराने ज्यांना यंदासुद्धा हुलकावणीच दिली, त्या स्कॉटिश लेखिका अ‍ॅली स्मिथ पुन्हा चर्चेत आल्या आहेत. मॅन बुकर पुरस्कारासाठी आतापर्यंत तीनदा नामांकन मिळूनही स्मिथ यांच्या कादंबऱ्या या पुरस्कारापासून दूरच राहिल्या होत्या. २००१ साली आलेली ‘हॉटेल वर्ल्ड’ ही बहुचर्चित कादंबरी असो वा २००५ सालातील ‘द अ‍ॅक्सिडेन्टल’ किंवा अगदी अलीकडची- २०१४ सालची ‘हाऊ टू बी बोथ’, या तीनही कादंबऱ्या मॅन बुकरच्या नामांकन यादीत पोहोचल्या; मात्र त्या पुरस्काराला गवसणी घालू शकल्या नाहीत. त्यामुळे निदान यंदा अंतिम लघुयादीत पोहोचलेली स्मिथ यांची कादंबरी ‘ऑटम’ ही मॅन बुकर पटकावेल, अशी आशा त्यांच्या वाचकवर्गाला होती. पण पुन्हा हुलकावणीच! मात्र स्मिथ यांच्या ‘ऑटम’नंतरच्या ‘विन्टर’ या नव्या कादंबरीच्या प्रकाशनाची आलेली बातमी त्यांना पुन्हा चर्चेत आणणारी ठरली आहे!

‘विन्टर’चे प्रकाशन पुढील वर्षी होणार असल्याचे यापूर्वी सांगितले जात होते; मात्र ती पुढील आठवडय़ात, २ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. त्यामुळे वाचकांना एकाच वर्षांत स्मिथ यांच्या दोन कादंबऱ्या वाचायला मिळणार आहेत.

‘ऑटम’नंतरच्या कादंबरीचे नाव ‘विन्टर’ असणे स्वाभाविकच होते, कारण या दोन्ही कादंबऱ्या ॠतुचक्रावर आधारित कादंबरी-चतुष्टयाचा भाग आहेत. ‘विन्टर’ दुसरी. पण त्याहीनंतरच्या दोन कादंबऱ्यांची नावे ‘स्प्रिंग’ आणि ‘समर’ अशीच असतील का, हे गुलदस्त्यात आहे.

‘ऑटम’मधली तरुण सोफिया ‘विन्टर’मध्ये वयस्कर झाली आहे. या सोफियाचा ‘ऑटम’मधला वृद्ध मार्गदर्शक-मित्र डॅनिएल हा आता नाहीच. ब्रेग्झिटोत्तर समूहमनाला कवेत घेणारी कादंबरी असा ‘ऑटम’चा गौरव करण्यात आला. आता ‘विन्टर’मधून ‘पोस्ट ट्रथ’ (सत्यापार/ सत्योत्तर) युगभान व्यक्त झाले असल्याचे सांगितले जाते. हे सत्यापार जग कुठले? तर निदर्शने-आंदोलने यांची विरोधसंस्कृती १९७० च्या दशकापासून हळूहळू क्षीण होत गेल्यानंतरचे! सोफियाची बहीण आयरिस- हीदेखील आता सत्तरीच्या वयाची- जगाबद्दल विवेकीपणेच विचार करीत असूनदेखील ‘मूर्ख थेरडी’ ठरू लागली असतानाचे!